चोळ नाडू: भाग २ : श्री रंगनाथ स्वामी

गङ्गे च यमुने चैव गोदावरि सरस्वति । नर्मदे सिन्धु कावेरि जलेऽस्मिन् संनिधिं कुरु ॥ भारताच्या या परमपवित्र नद्यांच्या काठाने 'भारतीय' संस्कृती बहरली. प्रत्येक नदीच्या तीरावर निराळी मंदिरे, निराळी पूजा, निराळा आचार, निराळा विचार पण आत्मा एकच, तो भारतीय. कावेरीच्या तीरावरील मंदिर, आचार, विचाराचा घेतलेला हा वेध, चोळ नाडू ..... 


अनन्तमादिपुरुषं अच्युतं च वरप्रदम् ।

आनन्दं च सदानन्दं तं वन्दे चाघनाशनम् ॥

ॐ नमो भगवते वासुदेवाय

ब्रह्म या सृष्टीचा निर्माता, श्रीविष्णू सृष्टीचा संरक्षक आणि शिव महादेव सृष्टीचा संहारक. तो सृष्टी संहार नवनिर्मितीसाठी करतो. 

सृष्टीचा रक्षणकर्ता तो श्रीविष्णू देवशयनी ते प्रबोधिनी एकादशी या काळात क्षीरसमुद्रात योगनिद्रा घेतो. भारतीय परंपरेत हा काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो. हा चातुर्मास भारतीय परंपरेतील सनातन धर्मात आणि बौद्ध, जैन आदि पंथात निरनिराळ्या नावांनी, पद्धतींनी येतो. पण सर्वांसाठी तो पवित्र मास आहे. कारण श्रीविष्णू योगनिद्रेत असतो आणि निऋती-वरुण उपखंड व्यापून असतात. म्हणजेच मान्सून असतो. 

पावसाळ्यात दळणवळण सुविधा बंद होत असत, कृषीकार्य जोमात असते, हवामान रोगराईस अनुकूल होत असे म्हणून श्रीविष्णूच्या योगनिद्रेसह, सामान्यजनही 'ठायीच बैसोनि एकचित्त' करत असत. आषाढात कृषी कार्य, श्रावणात विविध सण-उत्सव, भाद्रपदात श्रीगणेशाची आराधना, अश्विनात आदिशक्तीची आराधना, कार्तिक शुद्ध प्रतिपदेला नववर्षाचे स्वागत, करत कार्तिकी एकादशीला श्रीविष्णू योगनिद्रेतून उठतात. 

सृष्टीचे चक्र असेच सुरु असते. युगानुयुगे. 

भारतीय परंपरा वेद-ब्राह्मणे-उपनिषदे-पुराणे, ष्टदर्शने, यांच्या आधारे या चक्राचा, उगमाचा निरनिराळ्या दृष्टिकोनातून वेध घेतात. या दृष्टिकोनांचे अध्वर्यू तात्त्विक वादविवाद करतात. खंडन-मंडन-संश्लेषण करतात. न्याय-सांख्य एक विचार मांडतात. योग-वैशेषिक एक दृष्टिकोन मांडतात. तर पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा वेदांताचा, अद्वैताचा विचार मांडतात. 

ब्रह्म सत्य जगन्मिथ्या. अहं ब्रह्मास्मि असा तो अद्वैताचा विचार. यातून भक्तिमार्गाचा उदय आणि विस्तार झाला. सगुण साकारापेक्षा निर्गुण-निराकाराची आराधना आणि त्याद्वारे मोक्षाची कल्पना हा एक मार्ग पुढे आला. त्याचे प्रकटीकरण आदि शंकराचार्य स्थापित चार मठ आणि विचार यात दिसते. त्याचा विस्तार महाराष्ट्रात वारकरी संप्रदायात, पूर्वेकडे चैतन्य महाप्रभु, पश्चिमेकडे नरसी मेहता असा दिसून येतो. 

श्री रामानुजाचार्यांचा संग्रहित देह, श्रीरंगम 
(फोटो सौजन्य: इंटरनेट)

याच भक्तिमार्गाचा आणि अद्वैत मताचा एक निराळा अविष्कार रामानुजाचार्यांच्या विशिष्टाद्वैत संकल्पनेत दिसून येतो. अद्वैत मत ब्रह्म सत्य, जगन्मिथ्या मानते. रामानुजाचार्य प्रणित परंपरा हे नाकारते. ब्रह्म (परमेश्वर) एकच आहे.  तो अखंड, सर्वशक्तिमान, सर्वव्यापी आहे. जीव (आत्मा) आणि जग (सृष्टी) हे भिन्न आहेत. पण त्या सर्वव्यापी ब्रह्माचे अंश आहेत. ब्रह्म-जीव-जग हे त्रैगुण्यत्मक एकात्मिक स्वरुपात आहेत. भिन्न अस्तित्व असूनही त्यांचे 'अद्वैत' आहे म्हणून हे 'विशिष्टाद्वैत' आहे. 

या सर्व पार्श्वभूमीवर दक्षिणेतील 'अळवार' वैष्णव परंपरा, विशिष्टाद्वैत दर्शन प्रणित १०८ श्रीविष्णू स्थानांचे 'दिव्य देसम' येते. अळवार परंपरेतील १२ संतांनी पेरुमल म्हणजेच श्रीविष्णूला समर्पित ४००० ओव्या रचल्या. त्यात दिव्य देसम प्रबंध आणि इतर विचार मांडला. त्यानुसार १०६ श्रीविष्णू स्थाने ही भूलोकावर आहेत तर १०७ वे क्षीरसागर आणि १०८ वे स्थान साक्षात वैकुंठ आहे. या दिव्य देसम पेरुमल (विष्णू) स्थानांपैकी आदि रंगा म्हणजे पहिले हे श्रीरंगपट्टण, मध्य रंगा हे शिवसमुद्र आणि अंत्य रंगा म्हणजे श्री रंगनाथ स्वामी. श्रीरंगम. 

राजगोपुरम 

कावेरी आणि तिची उपनदी कोल्लिडम यांनी तयार केलेल्या श्रीरंगम बेटावर श्रीविष्णूचा विग्रह स्थापित झाला. कसा? 

रावणवधानंतर श्रीरामाने विभीषणाला लंकेचा राजाभिषेक केला. श्रीराम वानरसेना आणि विभीषण सहवर्तमान अयोध्येस परतले. अयोध्येस श्रीरामाचा राज्याभिषेक झाला. श्रीरामाने विभीषणास श्रीविष्णूचा विग्रह दिला. लंकेस जात असताना तो श्रीरंगम येथे ठेवला गेला आणि तिथे जो स्थापित झाला तो आजतागायत तिथेच आहे. त्रेतायुगापासून पेरुमल तिथे स्थापित आहे. अशी एक कथा. 

विग्रह त्रेतायुगापासून असला तरी या देवस्थानाला आता असलेले भव्य स्वरुप चोळ राजवंशाने दिले. चोळ वंशातील धर्मवर्मा,  किळीवाळवन राजाने प्रथम भव्य मंदिर बांधले. त्यात भारतीय परंपरेप्रमाणे नंतर आलेल्या, प्रभुत्वास गेलेल्या प्रत्येक राजवंशाने या देवस्थानाच्या भव्यतेत भरच घातली. ही भर घालणाऱ्यांत मदुराईचे पांड्य, द्वारसमुद्रचे होयसळ, विजयनगर-नायक राजे, मराठे यांचा समावेश आहे. या प्रत्येक वंशाचे, त्यांच्या काळाचे स्थापत्य वैशिष्ट्य ठळकपणे दिसून येते. 

हे देवस्थान १५५ एकर परिसरात पसरलेले आहे. अच्युतदेवरायाने बांधलेल्या २३९ फूट उंच भव्य-दिव्य राजगोपुराच्या आतही काही हजार वर्षांपासूनची अखंड वस्ती आहे. संपूर्ण परिसरात शिल्पसमृद्ध अशी ५० मंदिरे, ९ पुष्करणी आहेत.

साक्षात रंगनाथाचे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे. रंगनाथाचे गर्भगृह दक्षिणाभिमुख आहे. गर्भगृहात शेषशायी विष्णूची भव्य मूर्ती आहे. तसेच धातूची उत्सव मूर्तीही आहे. भाविकांची गर्दी, नित्यपूजा यांमुळे मिळणाऱ्या काही सेकंदाच्या अवधीत त्या मूर्तीचे भव्य-दिव्यत्व पूर्णपणे पाहता येईलच असे नाही. मी गोवत्स द्वादशीला गेलो होतो. आदल्या दिवशी रमा एकादशीचा पेरुमालाला अभिषेक झाला होता. त्यादिवशी भाविकांची अलोट गर्दी दर्शन घेऊन गेली होती. त्यामुळे मी गेलो तेव्हा त्यातल्या त्यात यथासांग पाहता आले. 

मूर्तिशास्त्रातले ऋषी देगलूरकर गुरुजी म्हणतात, गाभाऱ्यातल्या मूर्तीचे उघड्या डोळ्यांनी दर्शन घ्यावे. ती मूर्ती डोळ्यात साठवून घ्यावी. पण शेषशायी विष्णूची मूर्ती पाहून भान हरपते. एक तर डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात किंवा आपोआप डोळे बंद होतात. बंद डोळ्यांच्या पडद्यावर ती मूर्ती पाहण्याचा प्रयत्न सुरु होतो. 

श्री रंगनाथाच्या मुख्य मुर्तीसह अर्धमंडप, बाह्य मंडप आणि विमानदेखील (छत) वैशिष्ट्यपूर्ण आहे. अर्धमंडप सहा शिल्पसमृद्ध खांबांनी सजला आहे. सहाच का? ते भारतीय परंपरेतील षटदर्शनांचे प्रतीक. बाह्यमंडप १८ सुंदर खांबांवर स्थित आहे. १८च का? ते १८ पुराणांचे प्रतीक. 

२१,६०० सोन्याच्या कौलांनी सजलेले विमान 

चोळ सम्राट परान्तक याने रंगनाथाचे विमान सोन्याने मढवले आहे. रंगनाथाचे विमान २१,६०० पंचाक्षर मंत्र गठित सोन्याच्या कौलांनी मढवलेले आहे. ते ७२,०००० खिळ्यांनी जुळवलेले आहे. मनुष्यदेह एका दिवसात २१,६०० वेळा श्वास घेतो. प्राण ७२,००० नस-नाडी द्वारे शरीरात पसरतो. म्हणून २१,६०० सोन्याची कौले आणि ७२,००० खिळे. 

श्री रंगनाथाचा विग्रह श्रीरामाच्या इक्ष्वाकु वंशाकडे होता. तो त्यांनी विभीषणाकडे दिला. तो श्रीरंगम येथे रंगनाथ म्हणून स्थापित झाला. या रंगनाथाला भव्यदिव्य स्वरुप चोळ राजवंशाने दिले. चोळ राजवंश स्वतःला इक्ष्वाकु वंशीय मानत असे. जानेवारी २०२४ मध्ये अयोध्या येथे श्रीरामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीर्घ अनुष्ठान केले होते. त्या अनुष्ठानातील एक प्रमुख स्थान होते, श्री रंगनाथ स्वामी..... 


To Be Continued .... 

Stay Tuned. 


Comments