गङ्गे च यमुने चैव गोदावरि सरस्वति । नर्मदे सिन्धु कावेरि जलेऽस्मिन् संनिधिं कुरु ॥ भारताच्या या परमपवित्र नद्यांच्या काठाने 'भारतीय' संस्कृती बहरली. प्रत्येक नदीच्या तीरावर निराळी मंदिरे, निराळी पूजा, निराळा आचार, निराळा विचार पण आत्मा एकच, तो भारतीय. कावेरीच्या तीरावरील मंदिर, आचार, विचाराचा घेतलेला हा वेध, चोळ नाडू .....
जटाटवीगलज्जलप्रवाहपावितस्थले
गलेऽवलम्ब्य लम्बितां भुजङ्गतुङ्गमालिकम् ।
डमड्डमड्डमन्निनादवडमर्व्यं
चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवः शिवम् ॥
उत्पत्ती, संरक्षण आणि संहार. काळाचे हे तीन टप्पे. प्रत्येक टप्प्याचा एक अधिपती, स्वामी ठरलेला आहे. परंपरेने तो ठरवला आहे. ब्रह्म हा सृष्टी निर्माता, श्रीविष्णू हा संरक्षक तर शिव महादेव हा संहारक. हा संहार नवनिर्मितीचा अवकाश निर्माण करण्यासाठी आवश्यक असतो.
ब्रह्मा-विष्णू-महेश या त्रिमूर्ती पैकी ब्रह्माकडे सृष्टी उत्पत्तीच्या कार्यासह ज्ञान परंपरा आहे. ती ज्ञान परंपरा ब्रह्माच्या शक्तीच्या म्हणजेच सरस्वती-शारदेच्या रुपात आहे. श्रीविष्णू कडे संपत्ती-समृद्धीची परंपरा आहे. श्रीविष्णूची शक्ती लक्ष्मी या स्वरुपात ती ध्वनित होते. महेशाकडे परंपरा आली ती कलागुणांची.
भारतीय परंपरेनुसार संगीत हे नृत्य-नाट्य-गायन अशा सर्वांचा समुच्चय आहे. या संगीत परंपरेत तांडव हे सर्वाधिक कठीण सादरीकरण आहे. वैश्विक परिप्रेक्ष्यात पाहता ताल-लयबद्ध स्वरुपात तांडव करु शकणारा तो एकच महादेव आहे. महादेव करतो त्या संहारातही एक तालबद्धता असते, असे परंपरा मानते. शिव हा भारतीय परंपरेनुसार संगीताचा अधिपती आहे.
भारतीय संगीताच्या अधिपतीचे भारतातील सर्वात महत्त्वाचे देवस्थान, सध्याच्या तामिळनाडू मध्ये चिदम्बरम येथे श्री नटराज मंदिर आहे.
चिदम्बरम हे कावेरीच्या त्रिभुज प्रदेशातील समुद्राच्या जवळ असलेले गाव. येथे अनेक खारफुटीची वने होती आणि आहेत. त्यांना तिल्लाई म्हणतात. पौराणिक काळात या तिल्लाई मध्ये तामसी साधू तंत्रसाधना करत असत. भगवान शिव जेव्हा भिक्षाटनाच्या स्वरूपात तेथे आले, तेव्हा त्या तामसी ऋषींनी त्यांना हटवण्यासाठी जादूटोण्याच्या साहाय्याने अनुक्रमे नाग, वाघ आणि अपस्मार नावाचा बुटका पुरुष निर्माण केला.
परंतु शिवांनी त्या तिघांनाही पराभूत केले. नागाला त्यांनी अलंकाराप्रमाणे गळ्यात धारण केले. वाघाला मारून त्याचे चर्म कटीवस्त्र म्हणून धारण केले.
अज्ञान, अविद्या व गर्वाचे प्रतीक असलेल्या अपस्मारावर पाय ठेवून नटराज रूपात आनंद तांडव आरंभ केले. भाविकांचा असा दृढ विश्वास आहे की भगवान शिवांचे हे आनंद तांडव आजही चिदंबरम येथे अखंड सुरू आहे.
नटराजाच्या या स्थलमाहात्म्य सांगणाऱ्या कथेसोबतच हे स्थान भारतीय दर्शन परंपरेतील एका महत्त्वाच्या सांख्य तत्वज्ञानाची परंपरा अखंडित राखणारे एक स्थान आहे.
सांख्य दर्शनानुसार पुरुष हे सृष्टीचे मूळ आहे. पुरुषावर प्रकृतीचे आवरण आहे. सर्व स्थिरचर सृष्टी ही या प्रकृतीची माया आहे. प्रकृती पुढे सात्त्विक, राजस आणि तामस मध्ये विस्तारत जाते. सात्त्विकातून सजीव सृष्टी येते ती पुढे मन आणि पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये अशी विस्तारत जाते. तामस म्हणजेच भूतादि (भूत याचा अर्थ "जे उत्पन्न झाले आहे असे...) मधून निर्जीव सृष्टी आकाराला येते. ती पाच तन्मात्रांमध्ये विस्तारते. या तन्मात्रा म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. या तन्मात्रांचे पंचीकरण होऊन महाभुतांची निर्मिती होते.
पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही ती पंचमहाभूते. प्रत्येक महाभूतामध्ये अर्धा भाग त्या तत्त्वाचा आणि उरलेला अर्धा भाग अन्य चारांचा असतो. ही पंचमहाभूते सृष्टीच्या उत्पत्तीला कारण आहेतच पण त्यांची शक्ती अचाट आहे. कित्येक वेळा ती मानवाच्या संहारालाही कारण होते. या महाभूतांना वश करून घेऊन त्यांच्या शक्तीचा उपयोग मानवाच्या कल्याणासाठी करून घेण्याचा आधुनिक शास्त्रज्ञांचा प्रयत्न आहे. प्राचीन काळीही या महाभूतांना संतुष्ट करण्यासाठी अनेक प्रकारे प्रार्थना केली जाई.
भारतीय परंपरेत ही प्रार्थना पंचमहाभूत तत्त्वांना समर्पित शिव मंदिरांच्या द्वारे होते. दक्षिण भारतात नयनार परंपरेत पंचमहाभूतांना समर्पित पाच उत्तुंग शिवालये आहेत. पृथ्वी तत्त्वाला समर्पित श्री एकांबरेश्वर, वायू तत्त्वाला समर्पित श्री कालहस्ती, अग्नी तत्त्वाला समर्पित तिरुवन्नमलई चे शिवालय, जल तत्त्वाला समर्पित श्रीरंगमचे जम्बुकेश्वर आणि आकाश तत्त्वाला समर्पित आहे, चिदम्बरमचे श्री नटराज.
भारतातील हे एकमेव असे शिवमंदिर आहे, की जेथे गाभाऱ्यात भगवान शिवांची साकार रूपात नटराजाच्या मूर्तीस्वरूपात, साकार-निराकार रूपात स्फटिक शिवलिंग स्वरूपात आणि पूर्ण निराकार रूपात अवकाशस्वरूपात पूजा केली जाते. नटराजांच्या मूर्तीच्या बाजूला एक काळा पडदा आहे, हा काळा पडदा आकाश तत्त्वाचे प्रतीक आहे. हे सर्व जग, ही सर्व सृष्टी प्रकृतीची माया आहे हे त्यातून ध्वनित केले आहे.
पुराण-दर्शन-तत्त्वज्ञानाचा वेध घेत थेट गर्भगृहात गेलो. पण भारतीय मंदिर परंपरा ही थेट गाभाऱ्यात जाण्याची नाही. नागर मंदिर शैलीत सभामंडप, अर्धमंडप, अंतराळ आणि मग गाभारा अशी आहे. तर दक्षिणी शैलीत गोपूर, प्राकार, मंडप, ध्वज, गाभारा आहे.चिदम्बरमचे नटराज मंदिरही दक्षिणी द्रविड शैलीत बांधलेले भव्य-दिव्य मंदिर आहे. शिवभक्त चोळ घराण्यातील राजा परान्तक याने दहाव्या शतकात मूळ मंदिर उभारले. आणि प्रथेप्रमाणे पुढे अनेक राजघराण्यांनी मंदिराच्या शिल्प आणि इतर समृद्धीत भर घातली. चोळ राजघराण्यासाठी हे मंदिर इतके महत्त्वाचे आहे की चोळ वंशातील राजा-सम्राटांचा राजाभिषेक इथेच होत असे. इथले परंपरागत पुजारी पोधु दीक्षितार नावाचे वैदिक ब्राह्मण आहेत. केवळ त्यांनाच चोळ सम्राटांचा विधिवत राज्याभिषेक करायचा अधिकार होता. अगदी आजही चिदंबरमच्या ह्या मंदिरात केवळ पोधु दीक्षितारच सेवा देऊ शकतात.
मंदिराच्या चारही दिशांना भव्य गोपुरे आहेत. ही चारही गोपुरे वेगवेगळ्या राजांनी वेगवेगळ्या शतकात बांधलेली आहेत तरीही सर्व गोपुरे तितकीच उंच आहेत आणि प्रत्येकावर तेरा तांब्याचे कलश आहेत. सध्या आपण ज्या पूर्व गोपुरातून मंदिरात प्रवेश करतो त्या गोपूराच्या भिंतीवर भरतनाट्यम् नृत्याच्या १०८ मुद्रा आहेत, ज्यांना कारण असे नाव आहे.
![]() |
| गोपुरात कोरलेल्या नृत्यमुद्रा |
भगवान शिवांच्या नटराज स्वरूपाकडे पाहताना जणू अखिल विश्वाचे रहस्य उलगडताना दिसते. हे स्वरूप केवळ देवतेचे नाही तर विश्वातील नियमबद्ध हालचालींचे, उर्जेच्या अखंड प्रवाहाचे जिवंत प्रतीक आहे. भक्तांच्या मते, नटराजाचे तांडव म्हणजे विश्वाच्या पाठीवर चालणाऱ्या पंचक्रियांची – सृष्टी, स्थिती, संहार, तिरोभाव आणि अनुग्रह – अद्भुत अभिव्यक्ती!
नटराजाच्या एका तांडवात किती अर्थ दडलेला! शिवांचा डमरू वाजतो, आणि विश्वनिर्मितीचा नाद जागृत होतो. त्यांची अभयमुद्रा स्थिरता आणि रक्षणाचा संदेश देते. हातातील अग्नि संहाराचे तत्त्व सांगतो. सभोवतालचे प्रभामंडळ तिरोभाव म्हणजे विश्रांती व विलयन याचे दर्शन घडवते. उचललेला पाय अनुग्रहाचा – मुक्तीचा मार्ग दाखवणारा दिव्य संकेत!
असं म्हणतात की विज्ञान आणि अध्यात्म यांचा अद्भुत संगम नटराजाच्याच रूपात दिसतो. त्यामुळेच आज जगातील सर्वात प्रगत वैज्ञानिक संशोधन केंद्र स्वित्झर्लंडमधील अत्याधुनिक सीईआरएन पार्टिकल लॅबमध्येही नटराजाची भव्य मूर्ती प्रतिष्ठित आहे. विश्वाच्या गूढ हालचाली समजून घेणाऱ्या वैज्ञानिकांना या मूर्तीचे प्रतीकात्मक महत्त्व फार खोलवर जाणवते.
भाविकांचा दृढ विश्वास आहे की जिथे नटराजाचे हे आनंद तांडव ध्वनित होते, ते चिदंबरम् हे विश्वाला तोलून धरणारे सूक्ष्म केंद्र आहे. आणि अगदी अध्यात्मवेद्यांच्या भाषेत सांगायचे तर पिंडी ते ब्रह्मांडी या तत्त्वानुसार, प्रत्येकाच्या हृदयात एक ‘चिदंबरम्’ असते; जिथे आत्मस्वरूपी नटराजाचे नृत्य सतत चालूच असते… अनादि, अनंत, अविरत.


Comments
Post a Comment