चोळ नाडू: कावेरी खोऱ्यातील यात्रा भाग १:विषय प्रवेश

गङ्गे च यमुने चैव गोदावरि सरस्वति । नर्मदे सिन्धु कावेरि जलेऽस्मिन् संनिधिं कुरु ॥ भारताच्या या परमपवित्र नद्यांच्या काठाने 'भारतीय' संस्कृती बहरली. प्रत्येक नदीच्या तीरावर निराळी मंदिरे, निराळी पूजा, निराळा आचार, निराळा विचार पण आत्मा एकच, तो भारतीय. कावेरीच्या तीरावरील मंदिर, आचार, विचाराचा घेतलेला हा वेध, चोळ नाडू ..... 



भारतीय संस्कृती नद्यांच्या काठाने बहरली. सिंधू-सरस्वतीच्या काठी वेदांचा ध्वनी निनादला. गंगा-यमुनेच्या तीरावर भगवद्गीतेचा स्वर उमटला. गोदावरीच्या तीरावर श्रीरामाची पावले उमटली. नर्मदेच्या तीरी वेदांताचा विचार प्रकटला. आणि कावेरीच्या तीरी एका बाजूला अळवार वैष्णवांच्या विशिष्टाद्वैताचा आणि दुसऱ्या बाजूला नयनार शैवमताचा विचार पुढे आला. 

कावेरीने तामिळनाडूचा मध्य भाग व्यापला आहे. आपल्या त्रिभुज प्रदेशाने या क्षेत्राला तिने सुजलाम, सुफलाम केले आहे. कावेरीमुळेच या क्षेत्रात एक सांस्कृतिक सलगता आहे. समृद्धी आहे. प्राचीन काळ ते आधुनिक काळापर्यंत सलग मानवी वस्ती आहे. बहुतांश काळ स्थैर्य आहे. 

या प्रदेशात एका राजवंशाने एक सहस्रकाहून अधिक काळ राज्य केले. हे घराणे स्वतःस प्रभू श्रीरामाच्या सूर्यवंशी इक्ष्वाकु वंशाचे मानत असे. प्रामुख्याने शिवपूजक असलेल्या या राजवंशाने या प्रदेशाला स्थैर्य, सुख, शांती याबरोबरच पराक्रम, कीर्ती यांचा वारसा दिला. याच वारशात आला, पोन्नीयीन सेल्वन, म्हणजेच कावेरीचा लाडका पुत्र.  

त्याचे नाव अरुणमोळीवर्मन. वर्मा किंवा वर्मन हे भारतीय संस्कृतीत प्रत्येक क्षत्रियास भूषणावह उपनाव.  पण त्याचे कार्य, त्याची कीर्ती इतकी थोर की त्यास नामाभिधान मिळाले राजराजा! चोळ राजवंशाच्या सहस्त्रकाहून अधिक कालखंडातील कदाचित सर्वात थोर, पराक्रमी, आणि सर्वकिर्तीमान सम्राट. 

कावेरीच्या या लाडक्या पुत्राने या तंजावर नगरीत आपल्या आराध्य दैवताचे भव्य मंदिर उभारले. ते आज भारतातील सर्वात उंच शिखर असलेले मंदिर आहे. 

कावेरीचा त्रिभुज प्रदेश शैव आणि वैष्णव मताचा पुरस्कार करणाऱ्या नयनार आणि अळवार संत, साधक, भाविक आणि सामान्यजनांसाठी पवित्र क्षेत्र आहे. या प्रदेशात वैष्णव दिव्य देसम स्थानांपैकी आद्य स्थान श्री रंगनाथस्वामी पासून ते शिव पंचभूत देवस्थानांपैकी आकाश आणि जल तत्त्वांचे स्थान आहे. चोळ राजांच्या पराक्रमाच्या गाथा सांगणारी तंजावर, गंगैकोंडचोळपुरम, दारासूरम येथील शिल्पसमृद्ध भव्य मंदिरे आहेत. 

दक्षिण देशी चोळांच्या बरोबरच आलटून पालटून कांचीचे पल्लव, मदुराईचे पांड्य आणि चेर यांचे प्रभुत्व राहिले. यातील प्रत्येकाने आपापल्या प्रभुत्वाच्या प्रदेशात भारतीय मंदिर, शिल्प, स्थापत्यशैलीतील एकाचढ एक आश्चर्ये ठरावीत अशी मंदिरे उभारली. पल्लवांनी महाबलीपूरमची मंदिरे, पांड्यानी मीनाक्षी - रामेश्वरम.

भारतीय राजघराणी एकमेकांशी युद्धे करत. ही युद्धे आपले सामरिक बळ सिद्ध करण्यासाठी, प्रदेश विस्तारण्यासाठी असत. पण म्हणून जीत प्रदेशातील-राज्यातील मंदिरे, लेण्या, मूर्ती तोडण्याची, त्यांस क्षती पोचवण्याची भारताची पद्धत नाही. 

आपली पद्धत, जीत राजाने खोदलेल्या लेण्याशेजारी तितकेच, किंबहुना अधिक सुंदर लेणे खोदून तेथे आपल्या पराक्रमाचा शिलालेख कोरून (पक्षी नाशिक येथील नहपानाचा लेणीशेजारी गौतमीपुत्र सातकर्णीच्या लेणीत आपला शिलालेख) ठेवणे. आपली पद्धत, जीत राजाने खोदलेल्या-बांधलेल्या कैलास मंदिरासारखे पण त्याहून भव्य-दिव्य मंदिर खोदून, जागतिक आश्चर्य निर्माण करणे (पक्षी राष्ट्रकूटांनी पल्लवांच्या केलेल्या पराभवानंतर पल्लवांनी बांधलेले मंदिर पाहून वेरूळचे कैलास खोदणे.) ही आहे. आपली पद्धत, जीत प्रदेशातील मंदिराच्या सौंदर्यात, भव्यतेत, दिव्यतेत भर घालण्याची आहे. कावेरीच्या प्रदेशातील चोळ राजवंश निर्मित मंदिरांत पांड्य, नायक आणि साक्षात मराठ्यांनी घातली आहे. 

एक सहस्रकाहून अधिक काळ राज्य करुन, आग्नेय आशियापर्यंत आपला सामरिक, सांस्कृतिक विस्तार सिद्ध करुन चोळ राजवंश लयास गेला. तसेच हळूहळू पांड्य, पल्लवही लयास गेले. त्यामागे निरनिराळी कारणे आहेत. त्या वंशात अक्षम राजांचा आलेख आणि इतर प्रदेशात सक्षम राजांचा, राजवंशांचा उदय हे प्रमुख कारण होते. 
मान्यखेटक-कंधारचे राष्ट्रकूट, पुढे द्वारसमुद्रचे होयसळ यांच्या उदयामुळे राजकीय केंद्र बदलले. 


पुढे उत्तर-पश्चिमेकडून इस्लामी आक्रमणाची टोळधाड आली. ती महाराष्ट्राने-कन्नडा प्रदेशाने अंगावर झेलली. दक्षिणेस फारशी झळ बसू दिली नाही. ती टोळधाड नुसतीच अंगावर झेलली नाही तर यशस्वी प्रतिकार केला आणि विजयनगर स्थापले. इस्लामी टोळधाडीचा रेटा वाढू लागला तसे विजयनगर साम्राज्य क्षीण झाले, कावेरीच्या आश्रयास आले. विजयनगर साम्राज्याच्या अस्ताबरोबर मात्र एक काळरात्र अवतरल्यासारखी झाली. ६५ वर्षांच्या काळरात्रीनंतर उषःकाल झाला, शिवसुर्याचा जन्म झाला. 

त्या शिवसुर्याचा पिता दक्षिणेत स्थिरवासी झाला. बंगळुरू येथून दक्षिणीयांचे राज्य दक्षिणीयांचे हाती या मताचा पुरस्कार करत आपल्या द्वितीय पुत्राच्या मनात हिंदू राज्याची आपली मनोकामना बिंबवत राहिला. ज्येष्ठ पुत्र महाराष्ट्रदेशी अभिषिक्त छत्रपती झाला तर कनिष्ठ पुत्र कावेरीच्या तीरी तंजावर येथे राजा झाला. त्याच्या वंशाने या पवित्र, प्राचीन प्रदेशाला आधुनिक काळाकडे आणले. अशी ही सुजलाम-सुफलाम प्रदेशातील सांस्कृतिक सलगता आहे. 

याच प्रदेशात भव्य-दिव्य-पवित्र मंदिरांचे-संस्कृतीचे प्रत्यक्षदर्शन घेतले. त्याचीच ही गाथा. Stay Tuned..... 

Comments