चोळ नाडू: भाग 3 : श्री रंगनाथ स्वामी; शिल्प-आक्रमण-पराक्रम

गङ्गे च यमुने चैव गोदावरि सरस्वति । नर्मदे सिन्धु कावेरि जलेऽस्मिन् संनिधिं कुरु ॥ भारताच्या या परमपवित्र नद्यांच्या काठाने 'भारतीय' संस्कृती बहरली. प्रत्येक नदीच्या तीरावर निराळी मंदिरे, निराळी पूजा, निराळा आचार, निराळा विचार पण आत्मा एकच, तो भारतीय. कावेरीच्या तीरावरील मंदिर, आचार, विचाराचा घेतलेला हा वेध, चोळ नाडू ..... 


शान्ताकारम् भुजगशयनम् पद्मनाभम् सुरेशम्

विश्वाधारम् गगनसदृशम् मेघवर्णम् शुभाङ्गम्।

लक्ष्मीकान्तम् कमलनयनम् योगिभिर्ध्यानगम्यम्

वन्दे विष्णुम् भवभयहरम् सर्वलोकैकनाथम्॥

श्रीरामाच्या वंशाकडे असणारा श्री रंगनाथाचा विग्रह श्रीरंगमला स्थापित कसा झाला. श्री रंगनाथाचा लहानशा 'मढू'ला (म्हणजे मंदिराला. "श्री विठ्ठलाचा मढू बांधियेला" असा पंढरपुरी बाराव्या शतकातील मूळ उल्लेख आहे. त्यावरून...) भव्यता दिली ती धर्मवर्मा, किळीवाळवन यांनी आणि पुढे शिखर सोन्याने मढवले ते चोळांनी. त्यानंतरच्या प्रत्येक राजवंशाने मंदिराच्या भव्यतेत, दिव्यतेत, शिल्पसमृद्धीत भरच घातली. ती काय? श्री रंगनाथावरही इस्लामी आक्रमणाची टोळधाड आली. त्याची कहाणी या भागात... 

चोळांनंतर पांड्य, होयसळ, नायक, विजयनगर आणि मराठ्यांनी पुढची बांधकामे केली. 

मंदिरातील शिल्पकला ही केवळ कलात्मक नाही, तर त्या-त्या काळातील सामाजिक घडामोडी आणि राजकीय परिस्थितीचे जिवंत चित्रण मानली जाते. भारतातील अनेक मंदिरे अशा शिल्पांच्या माध्यमातून आपला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवत आली आहेत.

भारतीय मंदिरसंस्कृती ही केवळ भक्तिभावाचे केंद्र नसून, इतिहासाचे स्मरणचित्र जतन करणारी सामूहिक स्मृती म्हणूनही ओळखली जाते. शिल्पकलेच्या प्रत्येक ओळीमध्ये त्या काळातील राजकीय घडामोडी, व्यापारी संबंध आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीची नोंद दडलेली असते. कागद दुर्मिळ असलेल्या युगात समाजाने आपला भूतकाळ दगडात कोरून ठेवला. त्या शिल्पांमध्ये कला, कथा आणि काळ या तिन्हींचे विलक्षण मिश्रण आढळते.

पूर्वीच्या शतकांत भारत आणि चीन या दोन प्राचीन संस्कृतींच्या भूभागांमध्ये थेट सीमा नसली, तरी ब्रह्मदेश आणि तिबेटसारख्या प्रदेशांतून समुद्री व स्थलीय मार्गांच्या माध्यमातून व्यापारसंबंध विस्तारत होते. दक्षिण चिनी समुद्राकडून येणारे व्यापारी भारतात प्रवेश करताना महाबलीपुरम्, चिदंबरम्, तिरुचेंडूर आणि तूतुकुडी यांसारख्या समृद्ध बंदरांचा वापर करत असत. दक्षिण भारतीय राजघराण्यांनी परकीय व्यापाऱ्यांशी सुसंवाद साधला आणि त्यांना व्यापारासाठी जागा उपलब्ध करून दिली. या परस्परसंवादातून आर्थिक तसेच सांस्कृतिक आदानप्रदान विकसित झाले.

या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर मंदिरातील शिल्पकला अनेकदा घडामोडींचे प्रतीकात्मक वर्णन करते. श्रीरंगम परिसरात आढळणारे एक शिल्प अशा प्रतीकात्मक कलानिर्मितीचे सुंदर उदाहरण मानले जाते. त्यात घोड्यावर स्वार झालेला एक राजपुत्र युद्धप्रवासास निघाल्यासारखा भासतो. त्याच्या मागे चालताना, घोड्याचा भार स्वतःच्या खांद्यावर घेतलेला एक राजा दिसतो  दक्षिण भारतातील पारंपरिक राजेशाही पोशाखामुळे त्याची ओळख स्पष्टपणे सूचित होते. त्याच्यासोबत दोन परदेशी व्यापारी चालताना दर्शवले आहेत, आणि मागील बाजूस सूचित केलेली घटना ही सावधगिरीचा संदेश देणारी वाटते. राजाला दगा देण्याचा संकेत देणारे दृश्य कलाकाराने अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे.

शिल्पकाराने या सर्व व्यक्तीरेखांची मांडणी अशी केली आहे की, राजकीय सहकार्य, प्रवासातील साथीदार, आणि साम्राज्याच्या गतिशील परिस्थितीचे अनेक स्तर एका दगडात एकवटले गेले आहेत. हा दगड जणू त्या काळातील मानवी अनुभवांचे एक निःशब्द दस्तऐवजच बनतो.

या प्रकारातील शिल्पकलेचा उद्देश मनुष्यस्वभाव, राजकारण आणि परकीय संबंध यांमधील गुंतागुंतींचे कलात्मक भाष्य करणे एवढाच असावा. दगडात साकारलेली ही दृश्ये आजही आपल्याला त्या प्राचीन जगात नेऊन सोडतात जिथे कला म्हणजे इतिहास, आणि इतिहास म्हणजे स्मरणरूपात जतन केलेली कला.

श्री रंगनाथ उत्सव मूर्ती 

श्रीरंगमचे श्रीरंगनाथस्वामी मंदिर वैष्णवांसाठी प्राणप्रिय असून, त्याचे रक्षण स्थानिक समुदायाने शतके जपले आहे. एकेकाळी सोन्याने सुशोभित असलेल्या या मंदिरावर दिल्लीच्या इस्लामी सुलतानांच्या मोहिमांदरम्यान बाराव्या–तेराव्या-चौदाव्या शतकात तीन मोठी आक्रमणे झाली. मराठेशाहीच्या उदयापूर्वीच दक्षिणेकडील होयसळ, काकतीय आणि यादव साम्राज्ये आक्रमणांत कोसळली, तर मंदिराच्या संरक्षणाची जबाबदारी स्थानिक वैष्णवांनी स्वतःवर घेतली.

सन १३११ मध्ये मलिक कफूरच्या आक्रमणादरम्यान मुख्य विग्रहाचे संरक्षण करण्यात आले; मात्र ‘नम्मपेरूमाळ’ ही उत्सवमूर्ती दिल्लीला नेली गेली. त्या काळाशी संबंधित अनेक कथा प्रचलित आहेत. इस्लामी आक्रमकांनी नेलेली मूर्ती शोधण्यासाठी श्रीरंगमची एक तरुणी दिल्लीपर्यंत गेली, तसेच नर्तक-गायकांच्या जत्थ्याने अप्रतिम कलाविष्कार सादर करून सुलतानाकडून मूर्ती परत मिळवली. परतीच्या प्रवासात ती मूर्ती हरवली; त्यामुळे धर्मकार्य सुरु ठेवण्यासाठी तशीच दुसरी मूर्ती तयार करण्यात आली. सुमारे साठ वर्षांनंतर मूळ मूर्ती पुन्हा सापडली आणि मंदिरात दोन्ही मूर्तींचा इतिहास निर्माण झाला.

दुसऱ्या मोठ्या आक्रमणात सुमारे बारा हजार वैष्णवांनी मंदिररक्षणासाठी प्राणार्पण केले. देवदासी वेल्लईच्या धैर्यपूर्ण कृतीमुळे मूर्ती सुरक्षित स्थळी पोहोचू शकली; तिच्या स्मरणार्थ ‘वेल्लई गोपुरम’ आजही वेगळे ओळखले जाते. तिसऱ्या आक्रमणाच्या काळात मूर्ती तिरुमलाला हलवण्यात आली आणि त्यानंतर विजयनगर साम्राज्यामुळे मंदिराला स्थैर्य प्राप्त झाले.

श्रीरंगम आजही या सर्व घटनांची स्मृती जपते. मंदिराच्या रक्षणासाठी योगदान देणाऱ्यांचे स्मरण तसेच सुलतानाच्या मुलीचे ‘थूळुका नच्चियार’ या रूपातील स्थान याचे उदाहरण आहे. हा इतिहास केवळ संघर्षांचा नाही; तर श्रद्धा, संरक्षण आणि परंपरा जपण्याच्या सामूहिक संकल्पाचा दस्तऐवज आहे.

एका बाजूला आपला धर्म, आचार वाचविण्यासाठी अचाट धैर्याने लढणाऱ्या सामान्यांच्या कथा आपल्याला प्रेरित करतात. या कथा आपल्यापर्यंत पोचल्या तर... इतिहास, कथा जतन करण्याच्या बाबतीत, तो लिहून ठेवण्याच्या बाबतीत भारतीय हे ढिसाळ होते, आहेत असा आक्षेप, दुष्प्रचार केला जातो. कारण भारतीय इतिहास, कथा जतनाची मौखिक परंपरा ज्ञात नसते. किंवा त्याचे महत्त्व नाकारण्याची पाश्चात्य दृष्टी वरचढ झाली असते. पण दक्षिण भारतीय मंदिरे याला अपवाद आहेत. कारण, रंगनाथ काय, बृहदीश्वर काय किंवा इतर अनेक भव्य मंदिरांच्या भव्य भिंती या तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नडा, आणि मराठी भाषेतील शिलालेखांनी भरलेल्या आहेत. 

भारतीय भूमीवरील या सर्वात मोठ्या जिवंत मंदिरावर बोलावे, लिहावे, ऐकावे तेवढे थोडे आहे. पण आपले शब्द तोकडे पडतात. जसे माझे पडले आहेत. सांगण्यासारखं खूप आहे पण सुचत नाही. मांडता येत नाही. त्यामुळे इथे विराम देऊन पुढल्या भागात चिदम्बरम येथील श्री नटराज मंदिराचा वेध... 

चोळ नाडू भाग ४: थिलाई नटराज.. 

Stay Tuned 



Comments