"आज महादेव बीन बजाए...."
"आपल्या संगीताचे मर्मच हे आहे की वाद्याने गावे आणि गळ्यातून वीणा वाजावी... "
"बंदिश-चीजेतले शब्द पहिल्या आवर्तनात एकदा म्हणून झाले की, भारतीय संगीत म्हणजे उरतं ते सुरांचं एक ऍबस्ट्रॅक्ट असं सुंदर साम्राज्य..."
भारतीय संगीताची व्याख्या मांडण्यासाठी पु. ल. देशपांडे यांच्यापेक्षा समर्थ व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. निरनिराळ्या ठिकाणी त्यांनी लिहिलेली- उच्चारलेली ही वाक्ये पुरेशी आहेत. अनेक भाषाशास्त्रज्ञांच्या मते भाषेची सुरुवातच मुळी संगीतापासून झाली. निसर्गातले निरनिराळे आवाज, नाद एकत्र करुन त्यातून पहिले उभे राहिले ते संगीत आणि मग त्यात शब्दांची भर पडत भाषा निर्माण झाल्या.
मानवाचा प्राचीनतम वारसा ते वेद हेही गायले जातात. सामवेद हा ऋग्वेद गावे कसे याचा उलगडा करणारा वेद आहे. भारताच्या वेद-ब्राह्मण-उपनिषदांचे सार भगवान श्रीकृष्णाने सांगितले ती भगवत'गीता' आहे. ही गीता उलगडत असताना भगवान श्रीकृष्ण स्वतःचे वर्णन करताना, स्वतःची भारतीय वेद परंपरेशी सांगड घालताना म्हणतो, वेदांमध्ये मी 'सामवेद' आहे. अशा या सामवेदातून बारा सूर आणि बावीस श्रुतीच्या पायावर उभे असलेले भारतीय संगीत उभे राहिले आहे.
पाया सामवेद असला तरी खरा विकास अभ्यासता येतो तो भरताच्या नाट्यशास्त्रात, शारंगदेवाच्या संगीत रत्नाकरात, अभिनवगुप्ताच्या साहित्यात आणि त्यापुढील सर्व विचार-प्रकटीकरणात. भारतीय संगीत हे सूर-श्रुती-थाट-राग-चलन, आवर्तन अशा सर्व गणितात बंदिस्त असले तरी सदारकर्ता आपल्या मतीने त्याचे निराळे अर्थ लावू शकतो. चौकट न मोडताही विचारांची अमर्याद भरारी मारू शकतो. सुरांचं सुंदर असं ऍबस्ट्रॅक्ट साम्राज्य ते हेच.
याचंच प्रकटीकरण भारतीय संगीतातील निरनिराळ्या घराण्यांत आणि संगीत मांडण्याच्या त्यांच्या पद्धतीत, विचारात, दृष्टिकोनात दिसून येतं. हा निराळा विचार, निराळा विहार केवळ घराणांच्या पुरता मर्यादित नाही. संगीतात सूर-श्रुती-राग-चलन-ताल यांच्या पलीकडे रस, गंध, भाव आणि नाट्य हे घटक सादरीकरणाला परिपूर्णता देतात. आणि व्यक्ती तितक्या प्रकृती या सदारकर्त्या व्यक्तीनुसार ही निराळेपण दिसून येते. तिथे 'एकम सत विप्र: बहुधा वदन्ति.' हा भारतीय विचार प्रकट झालेला दिसून येतो.
म्हणूनच डागर बानी, दरभंगा, बेतिया, तलवंडी अशा धृपद घराण्यांची, आणि त्यातीलही निरनिराळया गायक-वादकांची पद्धत निराळी. ख्याल गायकीत देखील घराणी निराळी आणि व्यक्ती नुसार बदल दिसून येतो. किंबहुना एकाच घराण्याची गायकी शिकलेल्या दोन व्यक्तींच्या सादरीकरणात देखील फरक दिसून येतो. सर्व चौकटीत राहून सृजनात्मक स्वतंत्रता आणि सुरांचं ते ऍबस्ट्रॅक्ट असं सुंदर साम्राज्य.
जिथे परंपरा असतात, चौकटी आखलेल्या असतात तिथे, नियम आखलेले असतात तिथे ते नियम, त्या चौकटींच्या पलीकडे जात, काही नव्या परंपरा आखणारे, अनोखे सृजन घडवणारे देखील असतातच. अशा अपवादांमुळेच नियम सिद्ध होतात. निसर्गातील नाद, आवाज यातून आर्ष संगीत निर्माण झाले. तोच धागा पुढे चालत लोकगीतातील धून, आवाज, नाद यांना शास्त्रकाट्याच्या चौकटीत बसवून ते संगीत अभिजाततेच्या चौकटीत समाविष्ट झाले. ते करणारा आधुनिक काळातील एक संगीत महर्षी म्हणजे पंडित कुमार गंधर्व. आपल्या अफाट विचार, सृजन क्षमतेतून त्यांनी धून उगम राग निर्माण केले. लोकसंगीताला अभिजात संगीताच्या प्रांगणात आणले आणि सुरांचे ऍबस्ट्रॅक्ट साम्राज्य उभे करण्याच्या अफाट शक्यता निर्माण केल्या.
प्रकृती आणि पुरुष हे सृष्टीच्या निर्मितीचे आधार आहेत आणि त्यांच्या आधारे सर्व जग निर्माण झाले आहे आणि चालले आहे अशी सांख्य दर्शनाची मांडणी आहे. या विचाराचे, तत्त्वज्ञानाचे प्रतीक आपल्याला शिवपार्वती, अर्धनारी नटेश्वर स्वरूपात दिसून येते. ते एकजीव आहेत, पूरक आहेत. मग हे तत्त्वज्ञान, हा विचार संगीताच्या प्रकटीकरणात, त्यातही गाण्यात का दिसून येत नाही? असा प्रश्न पडला. त्याचं कारण पुढे आलं ते पुरुष आणि स्त्रीच्या गायकीच्या पट्टीतील भिन्नतेत.
भारतीय संगीत हे मेलडी, म्हणजेच एकाच पट्टीत होणाऱ्या संगीत निर्मितीवर आधारित आहे. तर पाश्चात्य संगीत हे हार्मनी, म्हणजेच निरनिराळ्या पट्टीतील वाद्यांचा एकत्र मेळ यावर आधारित आहे. आपल्या संगीताचे मर्मच हे आहे की वाद्याने गावे आणि गळ्यातून वीणा वाजावी... या उक्तीचा हा अर्थ आहे. या प्रश्नाचे उत्तर आधुनिक काळातील अलौकिक संगीतकार पंडित जसराज यांनी शोधले, ते मूर्च्छना भेद या संकल्पनेत.
भारतीय संगीतात रागांच्या अशा अनेक जोड्या आहेत जिथे गायिका आणि गायक त्यांच्या आवाजाची नैसर्गिक पट्टी न सोडता एकत्रित गाऊ शकतात (उदाहरणार्थ अभोगी/कलावती, चंद्रकौंस/मधूकौंस, भटियार/भैरव इत्यादी). गायिका गात असलेल्या रागाचा मध्यम हा षड्ज मानून गायकाने त्याच्या पुढील स्वर गायले तर जोडीतील तो दुसरा राग होतो. म्हणजे गायिका आणि गायक, प्रकृती आणि पुरुष आपली नैसर्गिक पट्टी न सोडता एकमेकांना पूरक होऊन, एकाच वेळी गाऊ शकतात. या संकल्पनेला आणि अनोख्या कलाविष्काराला नाव मिळाले जसरंगी.
स्वर-श्रुती-राग-नाद-ताल यांची चौकट तीच पण एक निराळा विचार आणि सृजनाचा अनोखा अविष्कार घडला, आणि उभे राहिले सुरांचे एक सुंदर असे ऍबस्ट्रॅक्ट साम्राज्य. भारतीय अभिजात संगीत जितके खोलात जाऊ तितके अधिकच गहिरे होत जाते. बंदिस्त असूनही अमर्याद शक्यता आहेत. त्या शक्यतांचा आपल्या विचाराने, दृष्टीने धांडोळा घेणारे एक नवा अवकाश निर्माण करतात आणि अजरामर होतात. सृजनाची स्वतंत्रता देणारे आणि तरीही विलक्षण रेखीव असणारे हे संगीत म्हणूनच मला अतिशय प्रिय आहे. स्वरांची बढत करत एक आवर्तन पूर्ण करत जितका विचार करत जाऊ तितकं हे अजूनच व्यापक होत जातं आणि अनंताकडे नेऊ लागतं. संगीत, सृजन, स्वतंत्रता यात बरेच काही लिहिताना शेवटी मात्र समेवर येण्याची शक्यता मला दिसत नाहीए. हे ऍबस्ट्रॅक्ट होण्यापूर्वी आवरतं घ्यावं.
जय हो!



Comments
Post a Comment