अपूर्णत्व...


अपवाद नियम सिद्ध करतात. तसंच अपूर्णत्व देखील एखाद्या व्यक्ती, कलाकृतीला पूर्णत्व देऊन जाते. 

मराठी नाट्यसृष्टीला अलौकिक भाषिक लेणं चढवलेले राम गणेश गडकरी. त्यांच्या भाषेने नाट्यच नाही तर साहित्यसृष्टीही समृद्ध केली. त्यांनी खरंतर केवळ चार नाटके संपूर्ण लिहिली. त्यांनी इतिहास घडवला. पण त्यांची तीन अपूर्ण नाटके आहेत. त्यातील गर्वनिर्वाण, वेड्यांचा बाजार ही आहेतच. पण राजसंन्यास हे नाटक त्यांनी पूर्ण लिहिले असते तर तो मराठी भाषेतील एक अलौकिक अविष्कार ठरला असता. अपूर्णत्वच इतकं अलौकिक आहे की ते कलाकृतीला पूर्णत्व देऊन गेलं. 

ते नाटक पुढे कोल्हटकरांनी पूर्ण केलं. 

मुद्दा किशोर कुमारचा आहे. पण यात अपूर्णत्व आले कुठून? आणि असं काय अपूर्ण आहे की ज्यामुळे किशोर कुमार सारखा दैवी देणगी घेऊन आलेला कलाकार पूर्णत्वाकडे जातो? वास्तविक किशोर कुमार यांची कारकीर्द पाहिली तर त्यांनी निर्माण करायला घेतलेल्या आणि पूर्ण झालेल्या चित्रपटांपेक्षा अर्धवट राहिलेल्यांची संख्या जास्त आहे. मग असं काय अपूर्ण आहे? 

एक गाणं! 

नितांतसुंदर बागेश्री रागावर आधारित, "बाजे बाजे, बाजे रे कहीं बांसुरीया" हे गाणं. 


काय नक्की कारण असेल हे अपूर्ण ठेवण्यामागे किंवा राहण्यामागे? पैशा अभावी चित्रपट डब्यात गेला? निर्मात्याला-दिग्दर्शकाला गाणं आवडलंच नाही?.. एवढं सुंदर गाणं आवडत कसं नाही?? असा प्रश्न पडू शकतो. पण असतात काही औरंगजेब! पण प्रश्न कायम उरतोच. अपूर्ण का?

किशोर कुमार, आपल्याला शास्त्रीय संगीतातील काहीही कळत नाही असं कायम म्हणत असत. पण तसं असेल तर शुद्ध शास्त्रीय रागावर आधारित "मेरे नैना सावन भादो, फिर भी मेरा मन प्यासा .." हे शिवरंजनी रागातील गाणं असो की आणखी अनेक, किशोर कुमार यांनी लीलया गायली आहेत. त्यामुळे बागेश्री रागातील हे गाणं त्यांना झेपणार नाही वगैरे मुद्दा निकालात निघतो. पण प्रश्न उरतोच. अपूर्ण का? 

कदाचित दैवी योजना. हे अपूर्ण आहे, म्हणूनच किशोर कुमार हा एक परिपूर्ण, दैवी देणगी घेऊन आलेला कलाकार आहे. हाफ टिकट सारखे धमाल तर मुसाफिर, दूर गगन की छांव में, दूर का राही असे घनगंभीर सिनेमे, प्रत्येक मूड, प्रत्येक प्रसंगाला साजेशी हजारांच्या संख्येत गाणी आहेत. पण प्रश्न उरतोच. अपूर्ण का? 

या अपूर्ण गाण्यामुळे किशोर कुमार या अलौकिक कलाकाराचं पूर्णत्व अधिकच ठळक होतं. असो... 

किशोर कुमार यांना आदरांजली! 




 

Comments