गोवा भटकंती- भाग २: महादेव मंदिर तांबडी सुर्ला

 Sun, Sand and the Sea.. हे गोव्याचे लोकप्रिय वर्णन, पण गोवा यापलीकडे बराच काही आहे... ते पाहण्याचा आणि आपल्या परीने उलगडण्याचा हा प्रयत्न आहे. 


कदंबांची भूमी गोमंतक. ते स्वतंत्रपणे राज्य करत असताना दक्षिण भारतात देवगिरीचे यादव, द्वारसमुद्रचे होयसाळ आणि वारंगळचे काकतीय ही राज्येदेखील होती. त्यांचे आपापसात राजकीय संघर्ष होते. ती वर्चस्वाची लढाई होती. राजकीय स्पर्धा एका बाजूला होतीच, त्याचबरोबर सांस्कृतिक पातळीवर देखील जणू एक स्पर्धा होती, ती कोण अधिक सुदंर, भव्य, डोळ्यांचं पारणं फेडणारी मंदिरं बांधतो याची. 

पूर्वाभिमुख प्रवेश. 

या स्पर्धेत होयसाळ फारच पुढे होते असं आता आपल्याला वाटू शकेल, कारण बेलूर-हळेबीड वगैरेंची नितांतसुंदर मंदिरं आक्रमणे होऊनही आपलं शिल्पसौंदर्य राखून आहेत. त्यामानाने काकतीय, यादव, कदंब मंदिरांचा विध्वंस अधिक प्रमाणात झाला. त्यामुळे ती प्राचीन शिल्पसमृध्दता बहुतेक वेळा संग्रहालयांमध्ये शोधावी लागते. ते असो. तरीही काकतीयांनी उभारलेले रामाप्पा मंदिर, यादव काळातील सिन्नर, होट्टल आणि असंख्य विखुरलेली मंदिरे पाहायला मिळतात. कदंब राजवटीने उभारलेले आणि टिकून राहिलेले गोव्यातील एकमेव मंदिर आहे ते तांबडी सुर्ला येथील महादेव मंदिर. 
मंडपातील कोरीव खांब. 

गोव्यात मोलें जवळ घनदाट अरण्यात, पश्चिम घाटाच्या घाटमाथ्याच्या जणू काही पायथ्याला आहे अशा जागी कदंब राणी कमलादेवी यांनी या मंदिराची १२व्या शतकात उभारणी केली. 

सभामंडपाच्या छतावरील शिल्पकला. 

सह्याद्रीच्या पश्चिमेला प्रामुख्याने जांभा दगड आढळतो. या भागात मंदिरांपासून ते घरबांधणी पर्यंत कार्यासाठी अगदी आजही जांभा दगडाच्या चिऱ्यांचा वापर केला जातो. असे असताना हे मंदिर मात्र काळ्या पाषाणातील आहे. उपलब्ध साधनांनुसार हे काळ्या बेसाल्ट दगडापासून मंदिर आहे असे स्पष्ट होते. तरी काही इतिहासकार, पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या मते हे मंदिर 'ग्रे ब्लॅक टॅल्कक्लोराइट शिस्ट सोप स्टोन' वापरून उभारले आहे. काहीही असले तरी या मंदिरासाठीचा दगड हा दक्खनच्या पठारावरुन आणण्यात आला आहे हे नक्की आहे.  


मंडपातील लक्ष्मी नारायण. 
कदंब-यादव शैलीत बांधलेले हे मंदिर छोटेखानी आहे. चौरसाकृती कोरीव खांबांचा सभामंडप आहे. या खांबांवर कदंब राजवटीचे राजचिन्ह कोरलेले आहे. सभामंडपाच्या छतावर सुंदर कोरीवकाम केलेले आहे. सभामंडपात लक्ष्मी-नारायण, नटराज, तसेच नागशिल्प यांच्या सुंदर मूर्ती आहेत. मंडपात असलेल्या नंदीचे मुख कोणीतरी धडावेगळे केलेले आहे.  छोटेखानी अंतराळ आहे. द्वारशाखा कोरीव कामाने सुशोभित आहे. द्वारशाखेच्या वर खोबणीत मुख्यदेवता ऐवजी गणपती आहे. 

शिखरावरील जनार्दन विष्णू. 

गाभाऱ्यात शिवपिंडी आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरात पहाटेची पहिली सूर्यकिरणे महादेवावर पडतात. हे प्राचीन मंदिर आता पुरातत्त्व संरक्षण विभागाच्या अंतर्गत येत असले तरी नित्य पूजा चालते. मी तिथे असताना पुरातत्त्व खात्याचा तेथील कमर्चारीच हारा-फुलांनी गाभाऱ्याला सुशोभित करत होता. 

मंदिर कितीही प्राचीन असले तरी गाभाऱ्यातील मुख्य देवतेची नित्य पूजा होत असेल तर ते मंदिर जिवंत होऊन जाते. वेरूळचे कैलास हे अप्रतिम शिल्प खरे पण त्या कैलासपती महादेवाची नित्य पूजा होत नाही. गाभाऱ्यात तो जिवंतपणा जाणवत नाही. तेच पट्टदकलच्या विरुपाक्ष मंदिरात आणि अशा असंख्य मंदिरात तो जिवंतपणा आहे. 

मंदिराचे बाह्यांग, ज्याला मंडोवर म्हणतात त्यावर कुठलेही शिल्प नाही. शिखरावर तीन दिशांना ब्रह्म-विष्णू-महेश आहेत. त्याचबरोबर शिव-पार्वती सारख्या मूर्ती देखील आहेत. विष्णू मूर्ती ही जनार्दन मूर्ती आहे. विष्णूची जनार्दन, केशव, नारायण, माधव इत्यादी रूपे ही त्याच्या हातातील शंख, चक्र, गदा, पद्म यांच्या क्रमानुसार ठरतात. 

भगवान महावीर वन्यजीव अभयारण्यात असलेले हे मंदिर घनदाट अरण्याने वेढलेले आहे. मंदिराच्या समोरून सुर्ला नदी वाहते. निबिड अरण्यात जवळ जवळ कुठल्याच कंपनीचे नेटवर्क नाही. त्यामुळे गुगल मॅपच्या भरवशावर राहू नये. तरी ठिकठिकाणी बोर्ड लावलेले आहेत. येण्यासाठी आपले वाहन आवश्यक आहे. एवढ्या निबिड अरण्यात असूनही तीथवरचा रस्ता अतिशय छान आहे.

गोव्यातील हे एकमेव प्राचीन मंदिर. नितांतसुंदर, निसर्गसंपन्न रस्ता आणि सुंदर मंदिर. एकदा तरी जायलाच हवे... 

मंदिर आणि पुढे दिसणारा सह्यकडा.. 


Comments