गोवा भटकंती - भाग ३: मल्लिकार्जुन

  Sun, Sand and the Sea.. हे गोव्याचे लोकप्रिय वर्णन, पण गोवा यापलीकडे बराच काही आहे... ते पाहण्याचा आणि आपल्या परीने उलगडण्याचा हा प्रयत्न आहे. 

मल्लिकार्जुन मंदिर, श्रीस्थळ, काणकोण 

श्रीशैल तू मल्लिकार्जुनं.. हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले स्थान. पण मल्लिकार्जुनाची स्थाने इतर भागातही आहेत. त्यात गोव्यातील श्रीस्थळी असलेले स्थान अनेकार्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. 

भारतातल्या प्रत्येक महत्त्वपूर्ण मंदिराला कुठल्या न कुठल्या पुराणकथेचा संदर्भ असतोच. त्या मंदिराला पावित्र्य, महत्त्व प्राप्त होते ते त्या कथेमुळे. मूर्ती, चित्र, शिल्प, स्थापत्यामुळे त्यांना सौंदर्य प्राप्त होते. त्यातलीच एक कथा अशी की, मल्ल आणि अर्जुनाचे घनघोर युद्ध झाले. या युद्धात एका शिकाऱ्याच्या रूपात/अवतारात शिव महादेवांनी अर्जुनाचे साहाय्य केले. मल्लाचे पारिपत्य केले. म्हणून तो मल्लिकार्जुन. दुसरी कथा अशी की, मल्लिका हे देवी पार्वतीचे रूप/नाव आहे, आणि अर्जुन हे शिवाचे नाव आहे. मोठ्या काळाच्या ताटातुटीनंतर या स्थळी त्यांची पुनर्भेट झाली. ते हे मल्लिकार्जुनाचे स्थान. त्यास अदवत सिंहासनाधीश्वर महापती असेही म्हटले जाते. 

मल्लिकार्जुनाचे प्रवेशद्वार

त्या झाल्या पुराणकथा. पण या स्थानाशी निगडित काही ऐतिहासिक सत्यकथाही आहेत. या देवळात होणाऱ्या उत्सवांशी या इतिहासाचा थेट संबंध आहे. हे मंदिर सोळाव्या शतकात बांधले गेले. त्यावेळी येथे हब्बू या गटाचे लोक होते. ते शैव पंथीय होते. असे असले तरी ते तामसी-रानटी वृत्तीचे होते. ते स्थानिक आदिवासींना उपद्रव करत असत. तेव्हा तळकोकणातून आलेल्या क्षत्रियांनी या हब्बूचा नायनाट केला. त्याचे नेतृत्व काशीपुरुष या क्षत्रियांच्या मूळ पुरुषाने केले होते. 

द्वारपाल. 
काशीपुरुष आणि सोबतचे क्षत्रिय हे श्रीरंगपट्टणहुन आल्याचा उल्लेख आहे. पण ते श्रीरंगपट्टण नसून तळकोकणातील शृंगारपट्टण असल्याचे मत इतिहासकार स. शं. देसाई यांनी मांडले आहे. या काशीपुरुषाचे दोन मुलगे आणि १० सहकारी यांनी हब्बूतीलच महाली याला फितूर केला. त्याच्या द्वारे उत्सवाच्या दिवशी हब्बूना एकत्र जमवले गेले आणि हल्ला करुन नायनाट करण्यात आला. ही घटना भाद्रपद वद्य प्रतिपदेची. तेव्हापासून आजपर्यंत भाद्रपद वद्य प्रतिपदेला महालीच्या वंशजांना तांदूळ, मीठमिरची पोचती केली जाते. 

सभामंडप. 

या सर्व घटनाक्रमानंतर काशीपुरुष पापक्षालनासाठी साक्षात काशीला गेला. तिथे त्याने स्वतःचा शिरच्छेद केला. वास्तविक त्यामुळे त्यास काशीपुरुष म्हटले जाते. 

मंदिराचे आवार प्रशस्त आहे. काही पायऱ्या उतरून गेल्यावर प्रवेशद्वारापाशी दोन दगडी स्वार दिसतात. प्रवेश केल्यावर आतल्या दारापाशी आश्चर्याने तोंडात बोटे जातील इतके सुंदर द्वारपाल आहेत. ते द्वारपाल लाकडावर कोरलेले आहेत. 

शिल्पसमृद्ध गर्भगृहाचे दार. 

आत प्रवेश करताच सभामंडपात उजव्या बाजूला कालभैरव आहे. सभामंडपात अप्रतिम शिल्पसौंदर्याने नटलेले लाकडी खांब आहेत. छतावर हंड्या-झुंबरं आहेतच पण बघत राहावे असे कोरीव काम आहे. भिंती छतावर शिवपुराणातील प्रसंग कोरलेले, चित्रित केलेले आहेत. 

डोळ्यांचे पारणे फेडणारे खांब. 

मंदिरात होणाऱ्या उत्सवांत तिथल्या इतिहासाचा मोठा वाटा आहे. त्यात रथसप्तमीचा उत्सव, शिगमोत्सव, विरामेळ आणि शिर्षारान्नी हे प्रमुख उत्सव आहेत. विरामेळ आणि शिशरान्ही हे वैशिष्ट्यपूर्ण उत्सव एकाड एक वर्ष होतात. 

विरामेळ उत्सव हा फाल्गुन शुक्ल द्वादशी ला म्हणजे होळीच्या ३ दिवस पूर्वी होतो. भगत त्या दिवशी उपवास करतात. हे भगत १८ च्या गटात असतात त्यांना गडे म्हणतात. रात्रीच्या वेळी ते हातात शस्त्र घेऊन घरोघरी जातात. ते ज्या घरात जातात त्या घरातून त्यांना पानसुपारी दिली जाते. 

ही पानसुपारी देण्यास विलंब झाला तर गडे तिथेच शस्त्रे फेकून त्यावर स्वतःला झोकून देतात. असे होणे त्या घरासाठी अरिष्टकारक असते असे मानले जाते. त्यावेळी गावातील सर्व दिवे बंद केले जातात. हे स्थानच क्षत्रियांचे आहे. त्यामुळे अशा क्षात्र परंपरेला सुसंगत उत्सव होणे साहजिक आहे. 

शिर्षारान्नी उत्सव. (फोटो सौजन्य इंटरनेट)

शिर्षारान्नी हा दुसरा महत्त्वपूर्ण आणि वैशिट्यपूर्ण उत्सव. हा फाल्गुन कृष्ण षष्ठी ला होतो. शिमग्यापासून चालणाऱ्या या उत्सवादरम्यान कौल मागणे, तरंग असे वैशिष्ट्यपूर्ण सोहळे झाल्यानंतर शिर्षारान्नी होतो. यात तीन गडे आपले शीर एकमेकांच्या विरुद्ध तीन दिशेने ठेऊन जमिनीवर आडवे होतात. जेणेकरून त्यांचे शीर एका चुलीप्रमाणे होईल. त्यांच्या शिरावर केळीच्या पानांचे आवरण लावले जाते. त्यावर मातीचे भांडे ठेवून चूल पेटवली जाते. त्या भांड्यात भात शिजवला जातो. हा शिजवलेला भात नैवेद्य वगैरे दाखवून प्रसाद म्हणून वाटला जातो. हा विधी करताना गड्यांचा अंगात दैवी शक्तीचा संचार झालेला असतो. 

आपल्या भारतात विविध ठिकाणी, विविध मंदिरांत स्थानिक लोककथा, उत्सव आहेत. त्यांचे महत्त्व, विशेषतः आपल्या सांस्कृतिक मूल्यांशी नाते घट्ट करण्याच्या दृष्टीने असलेले त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या आणि गाजलेल्या कांतारा चित्रपटापासून अशा प्रथा, परंपरा, लोककथा अधिकाधिक उजेडात येऊ लागल्या. एवढेच नाही तर आपली सांस्कृतिक मूल्ये अधिक घट्ट करण्याकडे ओढा वाढू लागला आहे. 

विविधतेतील एकता म्हणतात ती हीच. ती जपण्याचे, वृद्धिंगत करण्याचे प्रयत्न सुरुच आहेत. ते वाढत जाणार आहेत हेदेखील स्पष्ट आहे. त्यात आपलाही खारीचा वाटा उचलताना सुरुवात ती विविधता पाहण्या-अनुभवण्यापासून करायला काय हरकत आहे!


Comments