गोवा भटकंती - भाग १: श्री सप्तकोटेश्वर

Sun, Sand and the Sea.. हे गोव्याचे लोकप्रिय वर्णन, पण गोवा यापलीकडे बराच काही आहे... ते पाहण्याचा आणि आपल्या परीने उलगडण्याचा हा प्रयत्न आहे. 

श्री सप्तकोटेश्वर. 

भगवान परशुरामांनी आपल्या बाणाने समुद्र मागे हटवला आणि एक नवी भूमी निर्माण केली, ती कोंकण किनारपट्टी. पश्चिम समुद्र आणि पश्चिम घाट यांच्या दरम्यानच्या या चिंचोळ्या पट्टीवर निसर्ग प्रसन्न आहे. गुजरातच्या दक्षिणेपासून ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेली ही भूमी भौगोलिकदृष्ट्या बरीचशी सारखी असली तरी सांस्कृतिक-राजकीयदृष्टया निरनिराळ्या भागात निरनिराळी आहे. हे निराळेपण येण्यात भूगोलापेक्षा इतिहासाचा वाटा मोठा आहे. 

भारत प्राचीन काळापासून दर्यावर्दी आहे. धोलावीरा, लोथल, शूर्पारक, पुरी (घारापुरी- एलिफन्टा), अपरान्त अशी अनेक प्राचीन समुद्री बंदरे याची द्योतक आहेत. सिंधू-सरस्वती, वेदकाळ, मौर्य, सातवाहन, गुप्त, चालुक्य, राष्ट्रकूट, कदंब, यादव, होयसाळ, विजयनगर आणि मराठा या प्रमुख भारतीय राजवटी इथे नांदल्या. सुलतानशाही, बहामनी, मुघल, सिद्दी, इंग्रज, डच आणि पोर्तुगीज या परकीय राजवटींनी आपला वरवंटा फिरवला. या प्रत्येकाचा काही न काही परिणाम इथल्या संस्कृतीवर झाला आहे. या पश्चिम किनारपट्टीवरील अपरान्त म्हणजेच गोवा हा देखील एक नितांतसुंदर प्रदेश आहे. 

गोवा. देशी-परदेशी पर्यटकांसाठी एक लाडकं पार्टी डेस्टिनेशन. पण या पार्टी डेस्टिनेशन पलीकडेही गोव्यात खूप काही आहे. भौगोलिकदृष्ट्या पाहता एवढेसे राज्य, सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय समृद्ध आहे. ही संस्कृती सातवाहन, गुप्त-वाकाटक, चालुक्य, कदंब, यादव, विजयनगर या काळात अधिकाधिक समृद्ध होत गेली. विजयनगर काळानंतर गोव्यात पोर्तुगीजांची धर्मांध, जुलमी राजवट आली जी चार शतकांहून अधिक काळ राज्य करत होती. या काळात गोव्याच्या सांस्कृतिक प्रवासाला निराळीच दिशा मिळाली. 

गोवा. ही कदंब राजवटीची भूमी. कदंब हे चालुक्य काळ, किंबहुना त्याहीआधी पासून उत्तर कर्नाटक भागात होते ते प्रामुख्याने मांडलिक राजांच्या स्वरूपात. पुढे बाराव्या शतकात त्यांनी आपले सत्तेचे केंद्र गोव्यात हलवले. चंद्रपूर म्हणजेच सध्याचे चांदोर (तालुका साष्टी-साल्सेट, दक्षिण गोवा. मडगांवच्या जवळ) इथे राजधानी वसवली. गोव्यातील कदंब राजवट ही देवगिरीचे यादव, द्वारसमुद्रचे होयसळ यांच्या समकालीन. कदंबांनी अनेक उत्तमोत्तम मंदिरांची निर्मिती केली. त्यातील तांबडी सुर्ला महादेव मंदिर मूळ रूपात आहे, इतर सर्व मंदिरे सुलतानी आणि पोर्तुगीज आक्रमणात नष्ट झाली. त्यातलेच एक म्हणजे श्री सप्तकोटेश्वराचे मंदिर. 

सप्तकोटेश्वर मंदिराची मूळ जागा. कोटी तीर्थ. 

एका आख्यायिकेनुसार पंचगंगा नदीच्या तीरावर दीपवती बेटावर सप्तर्षींनी सात कोटी वर्षे तपश्चर्या केली. भगवान शिवाची आराधना केली. गोकुळ अष्टमी असते त्याच दिवशी भगवान शिव या सप्तर्षींना प्रसन्न झाले. त्यांच्या आग्रहानुसार शिवाने त्या जागी एखाद्या अवतारात राहण्याचे मान्य केले. असा हा सप्तर्षींचा स्वामी पंचगंगा, म्हणजेच पाच नद्या सागराला मिळतात अशा पवित्र जागी स्थानापन्न झाला, तो श्री सप्तकोटीश्वर/सप्तकोटेश्वर. कदंब राजवटीने त्यास राजदैवत मानले आणि दीपवती म्हणजेच दिवाड बेटावर मंदिर बांधले. मंदिरापुढे कोटी तीर्थ हे कुंड बांधले. 

मंदिराचा नव्याने सुशोभित सभामंडप. 

कदंब राजवटीवर प्रथम खिलजीच्या सैन्याचे आक्रमण झाले. त्यात कदंब राजवट क्षीण झाली. पुढे बहामनी सत्तेचा संस्थापक हसन गंगू ने आक्रमण केले. त्या आक्रमणातच या सप्तकोटेश्वर मंदिराला उपद्रव केला गेला. बहामनी सुलतानाची काही वर्षे सत्ता चालली. पुढे विजयनगर साम्राज्याचे एक मंत्री/मांडलिक, माधवा मंत्री यांनी गोवा जिंकले. वर्ष १३९१च्या कुचेरच्या ताम्रपटात याचे वर्णन आलेले आहे. त्या ताम्रपटानुसार, "विजयनगर सम्राट दुसरा हरिहर यांच्या आज्ञेवरुन माधव मंत्री यांनी गोवा प्रदेश जिंकून तुरुश्क यांना हाकून लावले. त्यांनी उपटून फेकून दिलेल्या सप्तकोटेश्वरादी प्राचीन देवतांची पुनःप्रतिष्ठापना केली."

विजयनगर साम्राज्य १५६५च्या तालीकोटच्या लढाईनंतर क्षीण झाले. गोव्यात पोर्तुगीज सत्ता कायम झाली. तिसवाडी(पणजी), साष्टी (मडगांव) आणि बार्देश (म्हापसा) या प्रदेशांत ती अधिक घट्ट होती. वर्ष १५४० मध्ये जेव्हा पोर्तुगीज इन्क्वीझिशन ऐन भरात होते त्याच काळात दिवाड बेटावर हल्ला झाला. सप्तकोटेश्वर मंदिरावर देखील हल्ला झाला. मंदिराची नासधूस झाली. पण स्थानिक नारायण शेणवी सूर्यराव इत्यादींनी रातोरात शिवपिंडी बेटावरून पलीकडे भतग्राम (सध्याचा डिचोली) मध्ये नेली. तिथे एका गुहेत शिवपिंडीची स्थापना करुन चुपचाप पूजाअर्चा होत होती. जवळजवळ शंभर वर्षांनी १६६४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली गोवा मोहीम केली. वर्ष १६६८ मध्ये दुसऱ्या मोहिमेत... 

पुष्करिणी. 

महाराज डिचोली प्रांतात आले असता त्यांना सप्तकोटेश्वराची गाथा कळली. नार्वे गावात एका गुहेत पूजाअर्चा होते हेदेखील समजले. तेव्हा शिवाजी महाराजांनी त्या जागी प्रशस्त देऊळ बांधण्याची आज्ञा केली. त्यानुसार शके १५९० म्हणजेच वर्ष १६६८ मध्ये नार्वे येथील सप्तकोटेश्वराचे निर्माण झाले. शिवाजी महाराज हैंदवधर्मउद्धारक, म्लेंच्छक्षयदीक्षित यथार्थ होते, हे यावरुन दिसून येते. गोवा राज्य सरकारने या मंदिराचे मूळ मंदिराचा सन्मान राखत, त्यावर गोव्यातील 'कावी' कलेचे कोंदण देत नूतनीकरण केले आहे. 

मंदिर गोव्याच्या मंदिर स्थापत्य शैलीतील आहे. भव्य कौलारू सभामंडप. अंतराळ आणि गर्भगृह. विमान आणि शिखर घुमटाकृती आहे. सभामंडपात साधेसे पण सुंदर खांब आहेत. त्यावर 'कावी' कलेची सुंदर कुसर आहे. सभामंडपाचे छत लाकडाचे आहे. गाभाऱ्याच्या मागल्या बाजूला मूळ गुहा आणि भिंत तशीच राखली आहे. मंदिरासमोरील दीपमाळ वैशिष्ट्यपूर्ण आहे. गोव्यातील इतर मंदिरांपेक्षा निराळी आहे. ऐतिहासिक वास्तूचे इतिहासपण जपत दिलेला आधुनिक साज अतिशय देखणा आहे. मेणवली येथील नाना फडणवीस वाड्याचे ज्यांनी उत्कृष्ट संगोपन आणि आधुनिक पुनःस्थापन केले त्या आर्किटेक्ट राहुल चेंबूरकर यांनीच सप्तकोटेश्वराचे काम केले आहे. 

वैशिष्ट्यपूर्ण दीपमाळ. 

शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती नाही, त्यांच्या कार्याचा अभिमानी नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. मी देखील शिवाजी महाराजांना हृदयस्थानी राखणारा एक अभिमानी आहे. त्या अभिमानाला अभ्यासाची, त्यांच्या वास्तव्याने, पदस्पर्शाने पावन झालेल्या स्थळांची धूळभेट घेण्याची जोड देणारा आहे. त्यामुळे सध्या गोवा मुक्कामी असताना, श्री सप्तकोटेश्वराकडे पाय वळले नसते तरच नवल. घनदाट जंगल, छोटेसे टुमदार नार्वे गाव आणि तिथे वसलेले हे स्वातंत्र्य, धर्माभिमानची प्रेरणा देणारे साधेसे पण सुंदर मंदिर. 

भटकंतीवर होणाऱ्या लिखाणात आणि आता Vloging मध्ये ती जागा, त्याचे महत्त्व हे कमी आणि 'मी'च जास्त डोकावतो. या गोवा भटकंती मध्ये मी मात्र स्थानमाहात्म्य, सांस्कृतिक माहात्म्य यांना अधिक प्राधान्य देणार. अगदीच निराळा असल्याशिवाय वैयक्तिक अनुभव मांडत बसणार नाही. या वैयक्तिक टिप्पणीसह थांबतो. 

पुढील भागात.... कदंब राजवटीतील टिकून राहिलेले एकमेव मंदिर, तांबडी सुर्ला. 



Comments

  1. सुंदर व भावस्पर्शी वर्णन

    ReplyDelete

Post a Comment