मेणवली वाडा: एक सुखद अनुभव

नाना फडणवीस वाड्यातील नानांची तसबीर. 

१२ फेब्रुवारी म्हणजेच, भले बुद्धीचे सागर, The Indian Machiavelli नाना फडणवीस यांची २८१ वी जयंती. 

याच दिवशी आम्ही संगम माहुली येथील दक्षिण कशी मंदिर, मेणवली येथील नाना फडणवीस वाडा आणि धोम येथील सिद्धेश्वर मंदिर असा प्रवास केला. इतर दोन ठिकाणी माहिती असलेलं, अनेक ठिकाणी वाचनात आलेले असे फक्त डोळ्यांनी पाहिलं पण मेणवली येथे अनेक सुखद धक्के मिळाले. एक सुखद अनुभव मिळाला. 

नाना फडणवीस वाड्याचे प्रवेशद्वार. 

मेणवली येथील कृष्णा नदीवरचा घाट आपण अनेक चित्रपटांत पाहिला आहे. स्वदेस मध्ये 'श्रीराम के पदचिन्ह' वाला मंदिर, शेवटचा कुस्तीचा प्रसंग ते अनेक चित्रपट. पण त्या घाटाच्या पार्श्वभूमीला असणाऱ्या भिंतींमागे मराठेशाहीच्या एका थोर विभूतीचा वाडा आहे, याकडे फार कमी लोकांचं लक्ष जाते. चावून चोथा झालेलं वाक्य वापरायचं तर हाच वाडा युरोप किंवा अमेरिकेत असला असता तर त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या तो जगापुढे मांडला असता. वास्तविक हे वाक्य वापरयाला लागू नये अशा पद्धतीचे जतन, संवर्धन करण्याचे कार्य नाना फडणवीसांचे सहावे वंशज नितीन मेणवलीकर यांनी हाती घेतले आहे. हाच तो पहिला सुखद धक्का. 

नाना फडणवीस वाडा. हळदी-कुंकवाचा चौक. 

हे संवर्धन म्हणजे नक्की काय केले आहे? प्रसिद्ध वास्तुरचनाकार राहुल चेंबूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाड्याची डागडुजी, देखभाल करण्यात आली आहे. आवश्यक त्या ठिकाणी संवर्धनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बदल केले आहेत. वाड्याच्या त्या त्या भागाची माहिती देणारे फलक लावले आहेत. वाड्याची माहितीपूर्ण सहल घडवण्यासाठी मेणवली गावातीलच तरुणांना गाईड म्हणून रोजगार दिला आहे. त्याचबरोबर युरोपीय, अमेरिकी दर्जाच्या जवळ जाणारे पाऊल म्हणजे वाड्याची ऑडिओ सफर घडवणारे मोबाईल ऍप तयार केले आहे. 

 मुख्य प्रवेशद्वारापाशी क्यू आर कोड आहे. तो स्कॅन करुन मोबाईलवर योग्य ती प्रक्रिया केली आणि वाड्यात पुढे पुढे जात राहिला की त्या त्या जागेची माहिती, महत्त्व ऑडिओ स्वरूपात तुम्ही ऐकू शकता. ही अशी व्यवस्था केवळ मोठमोठे संग्रहालय, जसे की मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, दिल्लीचे राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय इत्यादी ठिकाणीच आहे. ही ऑडिओ व्यवस्था मराठी सोबतच आता हिंदी, इंग्रजी आणि जर्मन भाषेत देखील सिद्ध करण्यात आली  आहे. अशा पद्धतीची आधुनिक व्यवस्था खासगी स्तरावर नितीन मेणवलीकर यांनी उभी केली आहे. 

 वाड्यात तत्कालीन खेळ देखील मांडले आहेत. ते केवळ प्रदर्शनासाठी नाही तर पर्यटक ते खेळ खेळण्याचा देखील अनुभव घेऊ शकतात. असा एक परिपूर्ण हेरीटेज टुरिझमचा अनुभव त्यांनी सिद्ध केला आहे. 

हे सर्व पाहून, नितीन मेणवलीकर यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारताना, मी मनापासून म्हणालो की, असे जतन, संवर्धन आणि असा अनुभव घेण्यासाठी पर्यटक, इतिहासप्रेमी आनंदाने प्रवेश शुल्क देण्यास तयार होतील. हे सर्व मांडत असताना हे नमूद केले पाहिजे की, हे सर्व कार्य मेणवलीकर यांच्या खासगी उपक्रमाचा भाग आहे. हा उपक्रम खासगी आहे यात सरकारविषयी रोष नाही, हा उपक्रम खासगी आहे याचा अनावश्यक अभिमान देखील नाही असे मेणवलीकर यांनी विशेषत्वाने नमूद केले. आमची आमच्या पूर्वजांच्या प्रति बांधिलकी, इतिहासाविषयी कृतज्ञता या भावनेतून आम्ही हे करत आहोत असे त्यांनी नमूद केले. 

अजित आपटे यांचे व्याख्यान. 

दुसरा सुखद धक्का होता तो म्हणजे अनायासे झालेली इतिहास अभ्यासक अजित आपटे यांची भेट. नाना फडणवीस यांच्या २८१व्या जयंती निमित्त वाड्यात एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नाना फडणवीस यांना अभिवादन आणि अजित आपटे यांचे छोटेखानी व्याख्यान. अजित आपटे यांनी 'नाना फडणवीस आणि इंग्रज संबंध' हा विषय थोडक्यात मांडला. या वर्षी त्यांनी हा विषय मांडला, तसेच यापुढे प्रतिवर्षी जयंतीच्या कार्यक्रमात नाना फडणवीसांच्या आयुष्यातील एकेका पैलूवर ते भाष्य करणार आहेत असे त्यांनी नमूद केले. 


कृष्णेच्या सुप्रसिद्ध घाटावरून दिसणारा नाना फडणवीस वाडा. 

तिसरा धक्का होता, तो थोडा वेगळा आहे. या कार्यक्रमाला मेणवलीच्या सरपंच सौ. वेदपाठक आणि ग्रामपंचायत आणखी एक सदस्या हजार होत्या. त्यांनी व्याख्यानानंतर आपले मनोगत मांडले. राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण स्थानी असणाऱ्या व्यक्तींनी कसे वावरावे याचा तो एक वस्तुपाठ होता. आपल्या वक्तव्यात त्यांनी प्रांजळपणे कबूल केले की या कार्यक्रमाचे आमंत्रण दोन-तीन दिवस आधी आले तेव्हा मी युट्युब इत्यादी साधनांवरून नाना फडणवीस यांच्या कार्याचा, त्यांच्या योगदानाचा थोडक्यात अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. यावरून त्यांची राजकीय समज दिसून येते. आपण कुठल्या कार्यक्रमासाठी जात आहोत, त्याचे महत्त्व काय, आपल्या उपस्थितीचे महत्त्व काय याची संपूर्ण जाणीव दिसून येते. 

महिला सरपंच म्हणजे केवळ रबरस्टॅम्प वगैरे हा गैरसमज आहे. आणखी एक चावून चोथा झालेलं वाक्य आहे, "Power Corrupts, and Absolute Power Corrupts Absolutely " याच धर्तीवर या संदर्भात म्हणावं लागेल की Position of Power Teaches Responsibility, Maturity and Wisdom. या ठिकाणी त्यांचा राजकीय पक्ष कोणता, त्यांचा स्वतःचा वैचारिक, सामाजिक कल कुठल्या बाजूला होता, हे मुद्दे गौण ठरले. तळागाळात लोकशाही रुजणे, स्थानिक पातळीवर अधिकार मिळणे यांचा व्यक्तीच्या एकूण विकासात खूप मोठा वाटा असतो. हे अधिकाधिक वृद्धिंगत होत जाणार आहे हे निश्चित. 

दर वर्षी १२ फेब्रुवारीला मेणवलीला जावं असा निश्चय करण्याचा विचार डोक्यात आहे. तो कितपत प्रत्यक्षात उतरतो माहिती नाही. पण मेणवलीचा हा सुखद अनुभव कायम लक्षात राहणार आहे. 

Comments