भारतीय मंदिर स्थापत्याची गंगोत्री

 

अगस्त्य तलाव आणि भूतनाथ मंदिर. 


भारत! जगातली एकमेवाद्वितीय संस्कृती. ही ओळखली जाते आपल्या वैशिष्ट्यपूर्ण 'मान्सून' हवामानासाठी. ही ओळखली जाते आपल्या विविधतेत एकता जपण्याच्या वृत्तीसाठी. ही ओळखली जाते सांस्कृतिक राष्ट्र्वादासाठी. या सांस्कृतिक राष्ट्रवादाचे एक प्रतीक आहे मंदिर. आसेतुहिमाचल विविध भागात मंदिर स्थापत्य प्रकार आहेत. वास्तविक देवालय ही संकल्पना सरस्वती-सिंधू काळापासून म्हणजे भारतीय संस्कृतीच्या गंगोत्री पासून चालत आली आहे. तेव्हाच्या देवालयाचे स्वरुप वेगळे होते. साधारण त्याच स्वरूपाची देवालये वाकाटक काळ म्हणजे इ.स. ६ व्या शतकापर्यंत बांधली जात होती. (अधिक माहितीसाठी नुकतेच प्रसिद्ध झालेले प्रा. डॉ. अरविंद जामखेडकर यांचे 'कोण होते वाकाटक?' हे पुस्तक वाचावे.) वाकाटक सत्तेचे प्रभुत्व कमी होणे आणि दक्षिण भारतात एका सत्तेचा उदय या एकाच सहाव्या शतकातील घटना आहेत. ती सत्ता म्हणजे बदामीच्या चालुक्यांची. भारतभरात असणाऱ्या मंदिर स्थापत्य शैलींची गंगोत्री या चालुक्य काळात गवसली. नुकतीच या गंगोत्रीची भटकंती केली. 

बदामी किल्ल्यावरून दिसणारा बदामी लेणी आणि अगस्त्य तलावाचा परिसर. 

मी आणि एक मित्र. असेच बोलत बसलो होतो. इतिहास, इतिहास संशोधनाचे स्रोत, इतिहासावरील पुस्तके हा दोघांचा आवडीचा विषय. त्यात मंदिर स्थापत्य शैली आणि मूर्तिशास्त्र या क्षेत्रातले विद्वान गो. ब. देगलूरकर यांची पुस्तके, मंदिर स्थापत्य, मूर्तिशास्त्र यांवर चर्चा सुरु होती. आणि चर्चा एकदा सुरु झाली की ती मारुतीच्या शेपटासारखी लांबत जाते. चर्चा देगलुरकरांवरून पुढे जाऊन त्यांच्या शिष्या शेफाली वैद्य यांच्या 'सकाळ' मधील 'राउळी मंदिरी' हे सदर आणि मंदिरे, मूर्ती यांवर आधारित फेसबुक पोस्ट, यांवर आली. याआधी अजिंठा-वेरूळ, भुलेश्वर तसेच ठिकठिकाणची प्राचीन मंदिरे पाहून झाली होती. पण ती प्रामुख्याने महाराष्ट्रातली. आता ओढ होती बदामी, बेलूर-हळेबीड, विजयनगरची. चर्चा सुरु असतानाच मित्राच्या डोक्यात किडा वळवळला, चलो बदामी! आता डोक्यात आलंच आहे, तर संधी सोडता कामा नये. तातडीने रेल्वे बुकिंग, स्थानिक निवास व्यवस्था, प्रवास व्यवस्था यांची गुगल बाबावरून चाचपणी केली. अनेक समविचारी, समवेड्या मित्रांना विचारलं. पण हो-नाही करता दोघेच उरलो. अहो आश्चर्यम! रेल्वे बुकिंग सकट सगळं लगेच मिळून गेलं. 

श्रीविष्णू. बदामी लेण्या. 


बदामी-ऐहोळे-पट्टदकल हा चालुक्य मंदिर स्थापत्याचा सुवर्ण त्रिकोण नक्की केला. त्यानुसार पहिले गाठल्या त्या बदामी लेण्या. हे भारतीय संस्कृतीचे, इतिहासाचे आणखी एक वैभव. दक्खनच्या पठारावर वालुकाश्म (Sandstone), बेसाल्ट प्रस्तराला काही कमतरता नाही. त्यामुळे चढाओढीने हिंदू, बौद्ध आणि जैन लेण्या खोदल्या गेल्या. बदामी येथे चार लेण्या आहेत. त्यापैकी तीन हिंदू आणि एक जैन. हिंदू लेण्या कालदृष्ट्या अधिक जुन्या आहेत तर जैन लेणी तुलनात्मकदृष्ट्या अलीकडच्या काळात खोदली गेलेली आहे. लेण्यांचे स्वरुप साधे, सरळ म्हणजे सुंदररित्या कोरलेले खांब, चौकोनी आकार, प्रवेशापाशी दोन्ही बाजूला प्रामुख्याने विष्णू आणि दशावतारतल्या वराह, त्रिविक्रम वामन आणि नृसिंहाच्या नितांत सुंदर प्रतिमा. त्या मूर्ती, त्यामागील शास्त्र (देगलूरकर, जामखेडकर, वैद्य प्रभृती तज्ज्ञांच्या कृपेने) याची थोडीफार माहिती असेल तर त्या मूर्तींच्या ऐतिहासिक, पौराणिक महत्त्वाचा आस्वाद द्विगुणित होतो. एक गोष्ट नमूद केली पाहिजे की बदामी येथे निवडक देवता, त्यांची वाहने, यक्ष, सुरसुंदरी, शालभंजिका यांच्या मूर्ती आहेत. वेरूळ सारखी अनेक प्रकारच्या शिल्पांची लयलूट नाही. पण जे आहे ते बरेचसे टिकून आहे, आणि लाल वालुकाश्म या स्थानिक खडक प्रकारामुळे अधिकच सुंदर दिसते. 

त्रिविक्रम वामन. बदामी लेणी.


दुसरा दिवस. महाकूट, ऐहोळे आणि पट्टदकल या मंदिरांच्या क्षेत्रांचा. पहिले ते महाकूट. या मंदिर प्रकारात अनेक छोटी छोटी मंदिरे आहेत. दोन नित्यपूजेत असलेली द्रविड शैलीतील महादेवाची मंदिरे आहेत. तर छोटी मंदिरे ही नागर शैलीतील आहेत. बहुतेक मंदिरात शिवलिंग आहेत. जिवंत मंदिर प्रकारात असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी किमान दिवा आणि उदबत्ती तरी असते. एक गोष्ट इथेच नमूद केली पाहिजे की मंदिर मोठे असो की अगदी पारावर शेंदूर फासलेला दगड, नित्यपूजेत असणाऱ्या, दिवा तेवत असणाऱ्या मंदिरात एक जिवंतपणा येतो. त्या देवाचा प्रत्यक्ष वास तिथे जाणवतो. हा फरक ऐहोळे आणि पट्टदकल येथे प्रकर्षाने जाणवला. दोन्ही ठिकाणची मंदिरे उत्कृष्ट आहेत. पण ऐहोळेतल्या कुठल्याच मंदिरात नित्यपूजा होत नाही, काही मंदिरात तर गाभाऱ्यात देवच नाही. पण पट्टदकल येथील विरुपाक्ष मंदिर नित्यपूजेत आहे. त्या विरुपाक्ष मंदिरात एक विलक्षण जिवंतपणा आहे. असो. पुढला टप्पा, ऐहोळे. 

दुर्ग मंदिर. ऐहोळे. 


ऐहोळे गाव म्हणजे इतस्ततः विखुरलेल्या मंदिरांच्या आसपास बांधलेली घरे आहेत.  वेशीपासून टेकडीवरच्या सुप्रसिद्ध मेगुती (संवर्धन कार्यामुळे हे मंदिर बंद होते. दुर्दैव आमचे दुसरे काय!) पर्यंत बघावे तिकडे नितांत सुदंर मंदिरे आहेत. त्यात सर्वाधिक मंदिरे ज्या परिसरात आहेत तो परिसर बाग, संग्रहालय इत्यादी करुन संरक्षित केला आहे. त्याच परिसरात सुप्रसिद्ध दुर्ग मंदिर, जे वास्तवात आदित्य म्हणजेच सूर्य मंदिर आहे, पण दुर्ग म्हणजे किल्ल्यात आहे म्हणून दुर्ग मंदिर म्हणून ओळखले जाते, आहे. लादखान मंदिर, हे शिवालय आहे. (प्रचलित नाव तातडीने बदलण्याची गरज आहे. कोणी लादखान तिथे वास्तव्याला होता याचे महत्व कमी करुन करुन त्याची शिवालय हीच ओळख पक्की केली पाहिजे. या दुर्ग मंदिराचे प्रवेशद्वार, खांब, मंडोवर, प्रदक्षिणा मार्ग कमालीचा शिल्पसमृद्ध आहे. शंख-चक्र-गदा-पद्म धारी श्रीविष्णू, नृसिंह, नंदी, डमरू, त्रिशुळ धारी शिव आहे. त्याचबरोबर नितांतसुंदर महिषासुरमर्दिनीचे शिल्प आहे. मंदिराच्या सभामंडपात छतावर वैशिष्ट्यपूर्ण नागाचे आणि माशाचे आरे असलेले चक्र कोरलेले आहे. मंदिराच्या आवारात इथल्या उत्खननात सापडलेल्या अनेक मूर्ती मांडून ठेवण्यात आल्या आहेत. त्यात गणपती मूर्तींची संख्या खूपच आहे. सोबतच सप्तमातृकांची अनेक शिल्पे आहेत. 

महिषासुरमर्दिनी. दुर्ग मंदिर. ऐहोळे. 


तिसरा आणि शेवटचा टप्पा होता पट्टदकल मंदिर संकुल. लांबवर असलेल्या प्रवेशद्वारातून जाताना प्रत्येक पावलागणिक द्रविड आणि नागर शैलीतील मंदिरांचा शेजारी शेजारी असलेला अविष्कार नजरेत भरायला लागतो. विरुपाक्ष मंदिराची भव्यता प्रत्येक पावलागणिक अधिकाधिक विस्तारत जाते. त्रिकोणी शिखर, शिखरावर 'अम्बालक' हे नागर शैलीचे वैशिष्ट्य तर गोपुर, मंडप, शिखर वगैरे द्रविड शैलीतले फरक ठळकपणे डोळ्यासमोर दिसतो. विरुपाक्ष, मल्लिकार्जुन इत्यादी मंदिरे ठळक द्रविड शैलीतील आहेत. 

नागर शैलीतील मंदिर. पट्टदकल. 


पट्टदकल मंदिर संकुलातील प्रमुख आकर्षण म्हणजे श्री विरुपाक्ष मंदिर. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराचे गोपुर मलप्रभा नदीच्या काठावर आहे. आत आल्यावर प्रशस्त नंदीमंडप. या नंदीमंडपाच्या खांबांवर शुकसारिका इत्यादी सुरसुंदरी कोरलेल्या आहेत. नंदी वेगळ्या पाषाणातील आहे. इतका जिवंत आणि भव्य की असे वाटते कोणत्याही क्षणी उठून चालायला लागेल. विरुपाक्ष मंदिराचा सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह, एकही जागा सोडलेली नाही. पाहावे तिथे शिव-विष्णू पुराणातील प्रसंग, रामायण, चालुक्य राजवटीतील विशिष्ट शिल्पे यांची लयलूट आहे नुसती. याच मंदिराच्या एका खांबावर ते वैशिष्ट्यपूर्ण एकच डोके पण एका बाजूने पाहिल्यास बैल आणि दुसऱ्या बाजूने पाहिल्यास हत्ती हे शिल्प कोरलेले आहे. याच मंदिरात एका कोनाड्यात अष्टभुजेची डोळ्यांचे पारणे फेडणारी मूर्ती आहे. काही अनाकलनीय कारणांमुळे ती काहीशा अपारदर्शक काचेच्या दाराआड बंद करुन ठेवण्यात आली होती. दाराच्या फटीतून जेवढं काही पाहता आलं तेच. फोटो काढणं शक्य झालं नाही. 

श्री विरुपाक्ष मंदिर. पट्टदकल. 


या विरुपाक्ष मंदिराचे द्वारपाल, शालभंजिका, कुबेर शिल्प डोळ्याचे पारणे फेडतात. बाहेरच्या बाजूने श्री विष्णू, महादेव शिव, नृसिंह, त्रिविक्रम, लकुलीश या मूर्ती आहेत. त्या असतातच. फक्त आकाराचा फरक असतो. यांशिवाय मंदिराला पूर्णताच येत नाही. 


भारतीय मंदिर स्थापत्याची ही गंगोत्री एकदा तरी आवर्जून पहिली पाहिजे. अनुभवली पाहिजे. गंगोत्रीचा अनुभव घेतला की मग आसेतुहिमाचल विविध शैली, उपशैली यांचा आस्वाद घेता येतो. गंगोत्रीहून निघालेल्या गंगेचा विशाल प्रवाह कोणार्क, खजुराहो, खिद्रापूर, विजयनगर, बेलूर-हळेबीड, तंजावर, मदुराई, कांची, बंगाल, काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड, तुम्ही नावं घ्या त्या ठिकाणी सापडेल. कुठे आकार छोटा असेल, कुठे 'शांतिदूतांमुळे' झालेल्या पडझडीच्या स्वरूपात दिसेल पण एक गोष्ट नक्की. भारतीय संस्कृतीच्या वैभवाचे हे प्रतीक प्रत्येक भारतीयाने एकदा तरी आयुष्यात पाहिलेच पाहिजे. करा कूच.. हर हर महादेव! 

हर हर महादेव! दुर्ग मंदिर. ऐहोळे. 

 

Comments

  1. फारच छान..वाचन, अभ्यास कळून येतोय तुझा .

    ReplyDelete

Post a Comment