तलत महमूद: काळजाची तार छेडणारा आवाज

तलत महमूद








रसिल्या, दर्दभऱ्या आणि विलक्षण कंप असणाऱ्या आवाजाचा गायक म्हणजे तलत महमूद. वास्तविक या मनस्वी गायकाचा आवाज विलक्षण गोड आहे. इथे 'आहे' हेच विशेषण वापरलं आहे. वास्तविक तलतना जाऊन आज २२ वर्षं झाली. अक्षरशः आज झाली, म्हणजे आज त्यांची बाविसावी पुण्यतिथी आहे. पण त्यांची अवीट गोडीची गाणी आजही चिरतरुण आहेत म्हणूनच विशेषण वापरलं, आहे. श्रेष्ठ सिनेमा संगीत आस्वादक, समीक्षक शिरीष कणेकर लिहितात "तलतची नायिका, प्रेयसी कायम त्याला कुठेतरी सोडून गेलेली असायची. तिच्या आठवणीत नायक तलतच्या आवाजात दर्दभरी गाणी गायचा." वास्तविक तलतच्या वाट्याला प्रेयसीला साद घालणारी, तिच्या प्रेमाची आळवणी करणारी गाणी आली. नाही असं नाही, पण लगेच त्याला कुठेतरी गालबोट लागल्यासारखं व्हायचं आणि काळजाची तार छेडणारी गाणी तलतच्या वाट्याला यायची. याच मालिकेत सज्जाद हुसेनचं संगीत आणि तलतच्या मधाळ आवाजातील "ये हवा ये रात ये चांदनी..." गाण्याबद्दल लिहीलं आहे. इथे तलतची मला आवडणारी आणखी दोन गाणी...

एखादी सुबक ललना ओझरती दिसते किंवा समोरासमोर येते. आपली तिच्याशी बोलण्याची, भावना व्यक्त करण्याची हिंमत होत नाही. पण मग ती भावना कुठेतरी व्यक्त करावी लागते, व्यक्त व्हावी लागते. असल्या प्रसंगाला तोंड द्यावं लागलेल्या मनुष्याच्या स्वतःच्या प्रतिभेला धुमारे फुटतात. पण ती भावना चपखल पणे व्यक्त करणारं गाणं 'रूप की रानी चोरो का राजा' या चित्रपटात तलत महमूदने गाऊन ठेवलं आहे. शब्दांचा जादूगार शैलेंद्रचे गीत आणि शंकर-जयकिशनचे संगीत आणि तलतचा आवाज यातून हे गाणं तयार होतं.

"तुम तो दिल के तार छेडकर, हो गए बेखबर 
चांद के तले जलेंगे हम, ऐ सनम, रातभर.... " 


'दिल के तार छेडकर' असं कोणी गेलं असेल तर ते काहीसं सुसह्य म्हणता येईल. पण जेव्हा प्रेयसी, बायको काही भांडणामुळे वगैरे सोडून जाते. आणि मग प्रसंग असा उद्भवतो की प्रकरण तर मिटवायचं आहे, पुन्हा एकत्र यायचं आहे पण पुढाकार कोण घेणार? व्यक्त करण्यासाठी अतिशय कठीण भावना आहे. पण मग अशा वेळीच राजेंद्र कृष्ण सारख्या कवी-गीतकारांच्या प्रतिभा काय दाखवू आणि काय नको अशा उत्साहाने बाहेर पडते. त्यात मदन मोहन सारखा रसिल्या चाली देणारा संगीतकार असेल तर गाण्याला चार चाँद लागतात आणि गाणं तयार होतं ते, 

"हम से आया न गया तुम से बुलाया न गया 
फासला प्यार में दोनो से मिटाया न गया " 



या गाण्याचे बोल लिहीत असताना एका कडव्याचे पण शब्द लिहिण्याचा अनावर मोह होत होता. पण मग वाटलं की ते गाण्यातच ऐकायला पाहिजे. 

तलतचं आणखी एक गाणं आहे जे मला व्यक्तिशः भयंकर आवडतं ते म्हणजे 'सुजाता' चित्रपटातलं सचिनदेव बर्मन यांची चाल असणारं "जलते हैं जिसके लिये, तेरी आँखो के दिये.." पण आज तलतना पुण्यतिथी निमित्त आदरांजली वाहताना वेगळी दोन गाणी द्यावी. गोड आवाजाच्या या गायकाला आदरांजली.  

Comments