विरासत मंथन



भारतीय परंपरेत मंथन या संकल्पनेला मोठे महत्त्व आहे. विचार, ज्ञान हे प्रश्नोत्तरांतून, खंडन-मंडन-संश्लेषणातून निर्माण व्हावेत ही भारतीय परंपरा आहे. 

भारतीय परंपरेतील मंथनाची सुरुवात साक्षात समुद्रमंथनपासून होते. जिथे ऋषी दुर्वासांच्या शापामुळे आपली शक्ती, आपले वैभव गमावून बसलेल्या देव-दानवांनी मंदार पर्वताची रवी, वासुकी दोरी करुन साक्षात क्षीरसागराची घुसळण सुरु केली. सृष्टी रक्षणकर्ता श्रीविष्णूने मंदार कूर्मावतार धारण करुन मंदार पर्वत तोलून धरला आणि समुद्र सृष्टी रक्षिली. या मंथनातून १४ रत्ने बाहेर पडली. 

या वैचारिक घुसळणीचा एक अविष्कार 'विरासत मंथन' म्हणून पार पडला. या विरासत मंथनचा मंदार पर्वत होते इतिहास, भारतविद्या अभ्यासक आणि फावल्या वेळचे इंजिनिअर नरेंद्र वेलणकर, आणि कूर्मावतार व वासुकी अशा दुहेरी भूमिकेत 'विरासत' प्रणेते इतिहास, भारतविद्या, शिल्प अभ्यासक इंद्रनील बंकापूरे. त्या समुद्रमंथनातून १४ रत्न प्रकट झाली, या मंथनात मात्र १४ रत्न(?) एकत्र आली आणि निरनिराळ्या विषयांवर बोलती झाली. 

कोल्हापूरजवळील सुमा फार्म येथे आयोजित हे मंथन म्हणजे केवळ विचारांचे संमेलन नव्हते, तर निसर्ग, इतिहास आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंशी साधलेला एक आत्मीय संवाद होता. काही ठिकाणांना एक विलक्षण आत्मा लाभलेला असतो. त्या भूमीवर पाऊल ठेवताच ती जागा आपल्याला आपलेसे करून घेते. सुमा फार्मनेही आम्हा सर्वांना अगदी तसाच स्नेहाचा स्पर्श दिला. हिरवाईने नटलेले वातावरण, शांतता आणि निसर्गाच्या सहवासात हे दोन दिवस अक्षरशः समृद्ध करणारे ठरले.

या मंथनात भारतीय संस्कृती, परंपरा आणि कलाविश्वाशी निगडित अनेक विषय नव्या दृष्टिकोनातून उलगडले. 

भारतीय मूर्तिशास्त्र, तंत्रमार्ग आणि त्यांचे मंदिरावरील कामशिल्पं याद्वारे प्रकटीकरण या नाजूक पण तितक्याच धाडसी विषयाने मंथनाची सुरुवात झाली. हा विषय त्यातील खोली आणि मांडणीच्या पद्धतीमुळे मंथनाचा आवाका, आणि मोकळेपणा निश्चित झाला. 

ऋग्वेद काळ, किंबहुना त्याहीपूर्वीपासून कूट भाषा, संकेत, रचना करणे आणि त्या जनमानसात रुजवण्यासाठी निरनिराळे प्रकार अवलंबणे ही भारतीय परंपरेची रीतच आहे. त्यामुळे श्रुती-स्मृती-पुराणातील क्लिष्ट रचना 'संध्याभाषा' या पद्धतीने चित्र-शिल्प-नाट्यातून जनमानसात रुजतात. त्या कशा यावरील सादरीकरणाने मंथनाची खोली वाढत गेली. 

कुसुमाग्रजांनी 'जा जरा पूर्वेकडे' हे एका निराळ्याच संदर्भातील कवितेचे चरण लिहिण्यापूर्वी हजारो वर्षे भारतीय संस्कृतीने मनावर घेतले होते. भारतीय संस्कृती बौद्ध विचार आणि विस्तारातून पूर्वेकडील देशात मोठ्या प्रमाणात पसरली. भारतीय देव, दैवत संकल्पना चीन, जपान, कोरिया भागात कशा पद्धतीने पोचल्या, त्यांचा स्थानिक परंपरांशी संगम होऊन भारतीय विचार कसा समृद्ध झाला यावरील सादरीकरण थक्क करणारे होते. 

प्राचीन मिस्र, ग्रीक संस्कृतीत राजा हाच देव ही संकल्पना होती. भारतीय परंपरेत राजा हा देवाचा अंश, देवाचा आशीर्वाद असणारा असे. पण भारतीय संस्कृती, परंपरा जेव्हा पूर्व आणि दक्षिण-पूर्व आशियात पोचली तेव्हा, राजा हा देवाचा अंश किंवा आशीर्वाद असलेला याऐवजी राजा हाच देव ही संकल्पना मांडणारा 'देवराज पंथ' कसा रूढ झाला आणि काही शतके चालला याचे थक्क करणारे सादरीकरण झाले. नव्या ठिकाणी जावे, चर्चा करावी, विचार मांडावा, स्थानिक विचाराशी जुळवून घ्यावे आणि गाभा तोच ठेवून परंपरा रुजवावी ही भारतीय परंपरा आहे याची पुन्हा प्रचिती आली. 

भारतातील नागर, द्राविड आणि वेसर या प्रमुख शैलीतील मंदिरांवर शिल्पांची लयलूट आहे. ती शिल्प आपल्याशी काही बोलू पाहतात. संध्याभाषेतील काही अर्थ सांगू पाहतात. तसेच तत्कालीन वस्त्रप्रावरण, वातावरण, प्राणी, पक्षी यांचे विश्व उलगडतात. मंदिरे आणि वस्त्रपरंपरेतील सांस्कृतिक संदर्भ आणि मंदिरांमधील फुले व प्राण्यांचे प्रतीकात्मक महत्त्व यांवरील सादरीकरणे उद्बोधक होती. 

ऐतिहासिक स्थळे युनेस्को सारख्या संस्थांच्या वारसास्थळ यादीत आली की त्यांची दखल जागतिक पातळीवर घेतली जाते. ही स्थळे वारसास्थळ यादीत येण्यासाठी कोणती सव्यापसव्य करावी लागतात, या स्थानांचे स्थळ-काळ-स्थापत्य-संरक्षण-संवर्धन इत्यादीसाठी आम्ही काय करतो याचे संपूर्ण आणि विस्तृत विवरण द्यावे लागते. ते कसे, त्याचे टप्पे काय, एकूण प्रक्रिया काय यावरील सादरीकरण खूप काही शिकवणारे होते. 

गोमंतक ही पवित्र भूमी आहे. पराक्रमाची भूमी आहे. गोव्याच्या कदंबांनी खूप पराक्रम गाजवला, समृद्धी आणली. ती त्यांचे राजदैवत श्री सप्तकोटीश्वराच्या आशीर्वादाने अशी त्यांची श्रद्धा होती. त्यांचे राजदैवत होते. त्या राजदैवताचा कदंब काळ ते बहामनी आणि पोर्तुगीज काळातील विध्वंस ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे आज्ञेकरुन पुनर्निर्माण आणि विद्यमान राज्य सरकार हस्ते संवर्धन-सौंदर्यीकरण हा विषय अस्मादिकांनी मांडला. 

भरतनाट्यम हा भारतातील अभिजात नृत्यप्रकारातील एक प्रमुख प्रकार. दक्षिण भारतातील मंदिरांच्या आश्रयाने उगम पावलेला, विकसित झालेला हा प्रकार आता जनमानसात पोचला आहे. हजारो वर्षांच्या त्याच्या प्रवासात दक्षिण भारतातील कलाकारांनी, संतांनी तर भर घातली. मराठी परंपरेतील दाक्षिणात्य राजे, चोळदेशाधिपती महाराज सरफोजी यांनी केलेल्या मराठी रचना, कर्नाटक अभिजात संगीताच्या आधारे खूप मोलाची भर घातली आहे. त्याचे संपूर्ण सादरीकरण हा मंथनातील एक उत्कर्षबिंदू होता. 

वैयक्तिक सादरीकरणानंतर पहिल्यांदाच अनुभवायला मिळालेली Unconference’ ही संकल्पना विलक्षण वाटली. कोणतीही औपचारिक चौकट नाही, ठरावीक नियम नाहीत; फक्त समान जिज्ञासा आणि आवड असलेली माणसे एकत्र येऊन आपल्या आवडीच्या विषयांवर मुक्तपणे संवाद साधत होती. या मुक्त चर्चांमधून अनेक रंजक विषय उलगडत गेले. लोककथा, चित्रकला, Vedic Cosmos, मंदिरांतील ‘मिम’ संकल्पना, मराठी भाषेतील हरवत चाललेले शब्द आणि असे कितीतरी विषय. ज्ञानाला औपचारिकतेची मर्यादा नसते, तर संवादातून ते अधिक समृद्ध होत जाते याची सुंदर अनुभूती या सत्राने दिली.

दुसरा दिवस खिद्रापूरच्या कोपेश्वर दर्शनाने सजला. काही प्राचीन मंदिरे ही केवळ वास्तू नसतात; ती आपल्याला प्रश्न विचारतात, थांबवतात आणि अंतर्मुख करतात. त्या दिवशी कोपेश्वरानेही आम्हाला तसाच अनुभव दिला. प्रत्येक शिल्प, प्रत्येक खांब, प्रत्येक कोरीव तपशील जणू एखादी कथा सांगत होता.

समुद्रमंथनातून चौदा रत्ने प्रकट झाली होती; या ‘विरासत मंथना’त मात्र रत्नांपेक्षाही मौल्यवान अशी माणसे, विचार आणि अनुभव भेटले. त्या समुद्रमंथनाने देवांना अमृत दिले, तर या वैचारिक मंथनाने आम्हाला भारतीय संस्कृतीकडे नव्या नजरेने पाहण्याची दृष्टी दिली. क्षीरसागराची घुसळण संपली असेल, पण भारतीय परंपरेतील हे विचारमंथन अजूनही अखंड सुरू आहे, आणि कदाचित हाच आपल्या संस्कृतीचा खरा अमृतकुंभ आहे.

या संवादातून भारतीय संस्कृतीची विशालता, तिची संवेदनशीलता आणि तिच्यामागील गूढ सौंदर्य नव्याने अनुभवता आले. विचार, अभ्यास आणि अनुभूती यांचा सुंदर संगम घडवून आणणारे हे मंथन मनात दीर्घकाळ स्मरणात राहील.



Comments