मुद्गलेश्वर: गोदापात्रातील प्राचीन अभियांत्रिकी अविष्कार

मुद्गला घरींचा वेचक पाक। मानी अधिक क्षीराब्धीहुनी।। - संत निळोबाराय 


भारतात कोणतीही नदी उत्तरेकडे वळते त्या स्थानी तीर्थक्षेत्र आहे. प्रामुख्याने श्री महादेवाचे देऊळ आहे.

वाराणसीला गंगा नदी उत्तरेकडे वळते, तिथे श्री काशी विश्वनाथ आहे. ब्रह्मगिरीवर उगम होऊन गौतमी त्रिंबक गावापासून उत्तरेकडे वाहते, तिथे त्र्यंबकेश्वर आहे. पट्टदकल येथे मलप्रभा नदी उत्तरेकडे वळते, तिथे श्री विरुपाक्ष आहे. खिद्रापूर येथे कृष्णा नदी उत्तर-दक्षिण वाहते, तिथे कोपेश्वर आहे. अशी मोठी यादी देता येईल. पण प्रश्न आहे, असे का?

विष्णू पुराणानुसार भारत भूमी ही समुद्राच्या उत्तरेला आणि हिमाद्रीच्या दक्षिणेला आहे. शिवचंद्रमौळी हा कैलासराणा आहे. कैलास हिमाद्रीमध्ये आहे. गंगा हिमाद्रीतुन दक्षिणेकडे वाहत येते, पुढे मार्ग बदलून पूर्वेकडे जाते. गंगा असो, दक्षिण गंगा गौतमी असो की इतर कोणतीही नदी जेव्हा उत्तरेकडे वळते तेव्हा ती जणू हिमाद्रीकडे, कैलासाकडे एक पाऊल टाकते. म्हणून त्या स्थानाला महत्त्व आहे. पावित्र्य आहे. म्हणून ती तीर्थक्षेत्रे आहेत, आणि प्रामुख्याने महादेव विराजमान आहेत. 

गौतमीतटावरचे मुद्गल (तालुका पाथरी, जिल्हा परभणी) हे त्यातलेच एक स्थान. गोदावरी इथे उत्तरेकडे वळण घेते. 

मुद्गल तसे प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले स्थान. मुद्गल ऋषींचे निवासस्थान. आख्यायिकांनुसार श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या वास्तव्याने पावन झालेले स्थान. 

एका आख्यायिकेनुसार क्रोधी स्वभावासाठी प्रसिद्ध असे दुर्वास ऋषी या स्थानी आले होते. त्या वेळी दुर्वासांनी कितीही खाल्ले तरी त्यांची क्षुधातृप्ती होत नव्हती. मुद्गल ऋषी आपल्याला दररोज मिळणाऱ्या अन्नाचे पाच भाग करत असत. एक भाग स्वतः ग्रहण करत, तर ४ भाग इतरांना देत. क्षुधातृप्ती न होणाऱ्या दुर्वास ऋषींचे मुद्गलांच्या आश्रमातील एक पंचमांश वाट्याने पोट भरले. दुर्वास प्रसन्न झाले, त्यांनी मुद्गल यांना वर मागण्यास सांगितले. मुद्गल ऋषींनी वर मागितला, अंशरुपाने या स्थानी राहावे, दुर्वास ऋषींनी विनंती मान्य केली. गोदापात्रातील मंदिरात पंचायतनात अंशरुपाने राहिले. ही झाली पौराणिक कथा, आणि महात्म्य. 

मुद्गलेश्वर मंदिर 

मुद्गलेश्वर पंचायतन मंदिर हे गोदावरी नदीपात्रात, बेटावर वगैरे नाही तर, साक्षात नदीपात्रात मध्यभागी बांधण्यात आलेले आहे. हे मंदिर उत्तर चालुक्य काळात बांधलेले नागर भूमिज शैलीतील मंदिर आहे. मंदिर तसे साधे पण सुबक आहे. दोन फूट आठ इंच उंचीच्या जोत्यावर संपूर्ण मंदिराची रचना करण्यात आली आहे. सभामंडप, गर्भगृह असे मंदिराचे स्वरुप आहे. 

सभामंडपात उत्तर-दक्षिण आणि पूर्व बाजूने प्रवेश करता येतो. पूर्व प्रवेशद्वारात आता नंदी स्थानापन्न केलेला आहे. पश्चिम द्वाराकडे बहुतेक वेळा नदीचे वाहते पाणी असते. त्यामुळे उत्तर द्वारातूनच प्रवेश होतो. सभामंडपात चार पूर्ण स्तंभ तर ८ वामन स्तंभ आहेत. वामन स्तंभ कक्षासनावर आहेत.  मंडपाचे वितान चौकोनाचे कोन लहान चौकोनांनी छेदत जाणारे असे आहे. 

गर्भगृहाची द्वारशाखा कोरीव, सुबक आहे. ललाटपटलावर श्रीगणेश, उत्तरांगावर पद्म आणि त्याच्या दोन्ही बाजूस हंस कोरलेले आहेत. गर्भगृहात मुद्गल पंचायतन आहे. शिवलिंगाच्या रूपात मुद्गल ऋषी आणि त्यांच्या पत्नी भागीरथी, पुत्र मौद्गल्य आणि जाबाला आणि दुर्वास हे पंचायतनात आहेत. पंचायतनाच्या बाजूला एक स्त्री शिल्प आहे, ते गोदावरी नदीचे असल्याची मान्यता आहे. 

मुख्य मंदिराशेजारी श्री गणपती मंदिर आहे. हे गणपती मंदिर छोटेखानी आहे. आत श्रीगणेशसह महिषासुरमर्दिनी, शिव आणि विष्णू आहे. तसेच वैशिष्ट्यपूर्ण अशी रथारूढ सूर्यमूर्ती आहे. 

हे झाले मंदिराचे आणि मूर्तींचे थोडक्यात वर्णन. मंदिर भर नदीपात्रात असल्याने सुंदर कोरीव कामाला वाव नाही, मग अभियांत्रिकीचा असा काय अविष्कार इथे आहे?

अभियांत्रिकी अविष्कार: मंदिराची मागची बाजू 

गोदावरी नदी ही बारमाही नदी नाही. प्रदेशही प्रचंड पावसाचा नाही. पण पर्जन्यकाळात पडायचा तो पाऊस पडतो. तो मंदिर बांधत असताना आणि त्यापुढच्या काळातही पडत होता. नदीला पूर येत होता. आताही येतो. वाहत्या पाण्याचा आणि वाहून येणाऱ्या इतर घटकांपासून मंदिराचे रक्षण कसे करावे? त्यासाठी तत्कालीन स्थपतींनी पाण्याच्या वहन कार्याचा अभ्यास करुन अतिशय साधा, सरळ, सोपा अभियांत्रिकी अविष्कार केला आणि कितीही पूर आला तरी मंदिराला फारशी तोशीस पडणार नाही याची योजना केली. कशी? 

मंदिराच्या मागे साधारण अडीच फूट उंचीचा एक त्रिकोणी चौथरा बांधला. त्याने काय झाले? पाण्याचा प्रवाह दुभंगतो आणि मंदिर सुरक्षित राहते. हा चौथरा मुख्य मुद्गलेश्वर मंदिराच्या मागे बांधला आहे, पण मग गणेश मंदिराचे काय? स्थपतींसाठी उत्तर सोपे होते, मंदिराची पश्चिम भिंत कोनात बांधा. वर दिलेल्या फोटो मध्ये मुख्य मंदिराच्या मागचा त्रिकोणी चौथरा आणि शेजारच्या गणेश मंदिराची पश्चिम म्हणजे प्रवाह येतो त्या बाजूची कोनातील भिंत स्पष्ट दिसत आहेत. 

तसं पाहायला गेलं तर हा काही फार मोठा अविष्कार नाही. प्राचीन काळापासून नद्यांवर पूल बांधताना, बांध घालताना हे सूत्र वापरले गेले आहे. आजही वापरले जाते. पण मग इथे विशेष ते काय? विशेष हे की इथे नदीवर पूल बांधण्यासाठी किंवा बांध घालण्यासाठी याचा अविष्कार करण्यात आलेला नाही तर पौराणिक महत्त्व असलेल्या मंदिराचे पाण्याच्या प्रवाहापासून रक्षण करण्यासाठी करण्यात आला आहे. साधी, सोपी रचना पण ८०० पेक्षा अधिक वर्षे ती मंदिराचे रक्षण करत आहे.  

गोदेच्या प्रवाहात अभियांत्रिकी अविष्कारामुळे सुरक्षित, अचल मंदिर. 

या मंदिराची खरी भव्यता दगडातील कोरीव कामात नाही, तर त्या कोरीव कामाला वाहून नेणाऱ्या पाण्यापासून आठशे वर्षे रक्षण करणाऱ्या त्या साध्या, त्रिकोणी चौथऱ्यात आहे. गोदावरीचा प्रवाह आजही बदलतो, पुराचे पाणी आजही येते; पण मुद्गलेश्वर तितक्याच शांतपणे उभा आहे. कारण त्याच्या दगडांत केवळ मंदिर घडविण्याचे कौशल्य नाही, तर निसर्गाचे तत्त्व जाणणाऱ्या भारतीय स्थापत्यपरंपरेचे शाश्वत ज्ञान कोरलेले आहे. म्हणूनच मुद्गलेश्वर ही फक्त एक वास्तू नाही, तर भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि अभियांत्रिकी बुद्धिमत्तेचा कालातीत वारसा आहे.

Comments