अमित कुमार: बापाच्या प्रचंड कर्तृत्वापुढे उपेक्षित राहिलेला गायक

अमित कुमार: बापाच्या प्रचंड कर्तृत्वापुढे दुर्लक्षित राहिलेला गायक 


राज्यसभा टीव्हीवर 'गुफतगू' या मुलाखतींच्या कार्यक्रमात अमित कुमारची मुलाखत झाली. दोन भागात झालेली ती मुलाखत तर रंजक होतीच पण त्या मुलाखतीतून एक गोष्ट जाणवली की हिंदी चित्रपटसृष्टीत काही वर्षं गाजवूनही अमित कुमार यांची गाणी फारशी माहिती नाहीत. त्यामागे एक कारण, वडलांच्या अफाट कर्तृत्वापुढे हा गुणी गायक झाकला गेला, दुर्लक्षित राहिला. वडलांच्या अफाट लोकप्रियतेपुढे, अफाट कर्तृत्वापुढे क्षमता असूनही दुर्लक्षित राहिलेले अनेक पुत्र वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत. फार कमी अपवाद असे आहेत की जिथे वडलांच्या कर्तृत्वापुढे दुर्लक्षित, उपेक्षित राहिले नाहीत. लॉकडाऊन काळात आवडती गाणी या मालिकेतील हा पुढला लेख आहे. 'एका बाजूला बापसे बेटा सवाई' असं म्हणता येतील असे बर्मन पिता-पुत्र तर दुसऱ्या बाजूला वडलांच्या कर्तृत्वापुढे झाकून गेलेले किशोर कुमार आणि अमित कुमार. 

मुलाखतीच्या सुरुवातीला परिचय म्हणून अमित कुमार यांच्या काही गाण्यांचे तुकडे दाखवण्यात आले. ते पाहिले आणि त्यातलं एक गाणं आजवर किशोर कुमार यांचं समजत होतो, त्या समजुतीवर पडदा पडला. ते गाणं म्हणजे 'बालिका वधू' चित्रपटातलं "बडे अच्छे लगते हैं, ये धरती ये नदीयां, ये रैना.. और तुम" मुलाखतीच्या ओघात इतरही अनेक गाण्यांचे उल्लेख येत गेले, त्यामागच्या कथा वगैरे. मग जाणवायला लागलं की तसंही काही काम करताना, वाचन करताना आपल्याला गाण्यांची सोबत लागते. इतर अनेक गाणी ऐकतो, आता ठरवून जरा अमित कुमार यांचीच गाणी ऐकुया. तसा एका दिवशी अमित कुमार यांची गाणी शोधून ऐकली. आणि खरं सांगतो, असं वाटायला लागलं की ही गाणी आधी का नाही ऐकली? 

त्याच दरम्यान सिने लेखक अमोल उदगीरकर यांचे ब्लॉग्स वाचत होतो. त्यांच्या ब्लॉग मध्ये कायम ८०च्या दशकाचा शेवटचा काळ आणि ९०चे दशक यावर भर असतो. संगीत, चित्रपट त्यातही 'मासेस'ना आवडणारे साक्षात हिंदी चित्रपट यांवर लिखाण असते. एका लेखात त्यांनी मांडले होते की भारतीय सिने संगीताचा चाहता वर्ग सुवर्णयुग म्हणून साठीच्या दशकात रमतो किंवा थेट शंकर-एहसान-लॉय आणि रेहमानच्या गाण्यांवर डोलतो. ऐंशी-नव्वदचे दशक काहीसे दुर्लक्षित करतो. या दुर्लक्षाचा परिणाम केवळ चित्रपट, संगीतावरच नाही तर त्या काळात ऐन भरात असणाऱ्या कलाकारांवर देखील होतो. (उदगीरकर यांच्या लेखातील वाक्य शब्दशः नाहीत, पण साधारण आशय तसा आहे.) याच घटकाचा फटका अशा अनेक कलाकारांना बसला आहे. 

गाणी ऐकत गेलो. काही गाणी विशेष आवडली. आवडती गाणी या मालिकेत त्या आवडलेल्या गाण्यांपैकी काही निवडक गाणी. सुरुवातीलाच "बडे अच्छे लगते हैं.. "चा उल्लेख केला. पण मला खास आवडली गाणी ती ऐंशीच्या दशकातील आहेत. ह्यातली बहुतेक गाणी ही 'न-नटांवर' चित्रित झालेली आहेत. त्यातलं पाहिलं आहे. संजय दत्तच्या सुरुवातीच्या काही चित्रपटांपैकी एक असेलल्या 'जीवा' चित्रपटातील गुलजार यांच्या लेखणीतून उतरलेलं, "रोज रोज आँखो तले, एकही सपना चले
रातभर काजल जले,

आँख मे जिस तरह ख्वाब का दिया जले"


गुलजार यांच्या लेखणीतून उतरलं आणि त्याला आर. डी. बर्मन सारख्या संगीतकाराने चाल दिली. आशा भोसले आणि अमित कुमार यांनी हे गायलं आहे. सुरुवात आणि पुढे दोन कडवी आशा भोसले यांनी गायली आहेत. नंतर अमित कुमार यांचा आवाज पुढे येतो आणि गाणं पुढे जातं. गाणं नक्की ऐका. आणि फक्त ऐका. पाहायला जाऊ नका. संजय दत्त वर चित्रित झालेलं हे गाणं काही फारसं प्रेक्षणीय नाही पण श्रवणीय मात्र आहे. 

दुसरं आवडलेलं गाणं आहे 'तेरी कसम' चित्रपटातलं आनंद बक्षी यांनी लिहिलेलं आणि पुन्हा एकदा आर. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं 
"क्या हुआ इक बात पर 
बरसों का याराना गया,
इस बहाने दोस्तो का 
प्यार पहचाना गया "


'तेरी कसम' हाही चित्रपट ज्युबिली स्टार राजेंद्र कुमार यांचा मुलगा कुमार गौरवचे बस्तान बसवण्यासाठी करण्यात आलेला चित्रपट. पण आडातच नसेल तर पोहऱ्यात येणार कुठून या न्यायाने हा न-नट बाजूला फेकला गेला. त्यामुळे हे गाणं देखील केवळ ऐकावं. पाहू नये. फारसं प्रेक्षणीय नाही. 

आनंद बक्षी यांच्या नावावर सर्वाधिक चित्रपट गीते लिहिण्याचा विक्रम आहे. त्यात अगदी गोविंदा प्रभृतींसाठी त्या पद्धतीची गाणी आहेत तर आशयघन, अर्थगर्भ अशी गाणी देखील आहेत. एवढी देदीप्यमान कारकीर्द असूनही एकंदर चित्रपट क्षेत्रात आनंद बक्षी यांना फारसा मान मिळाला नाही. किंवा चर्चा झाली नाही. बक्षी यांच्या एकंदर कारकिर्दीवर उचित प्रकाश टाकणारा सुंदर लेख अमोल उदगीरकर यांनी लिहिला आहे.

अमित कुमार यांची इतरही अनेक गाणी मला आवडली आहेत. त्यातल्या आणखी एकाच गाण्याचा मी उल्लेख करेन ते म्हणजे अनिल कपूर-माधुरी दीक्षित-अनुपम खेर यांचा अफलातून चित्रपट 'खेल' मधील "सूने शाम सवेरे, कबसे हैं मेरे, जबसे गए.. तुम." इथे मी विशेष उल्लेख करून व्हिडीओ लिंक दिलेली गाणी आर.डी. बर्मनचीच आहेत. वास्तविक हा काळ आर. डी. साठी कठीण काळ होता असे म्हणतात. म्हणजे आर. डी. त्याच्या तोडीची गाणी देऊ शकत नव्हता, चित्रपट अतिशय सुमार निघत होते. ते काहीका असेना त्यात ही अशी अनेक श्रवणीय गाणी आहेत. ती आपण ऐकावी आणि अशा उपेक्षित, दुर्लक्षित कलाकारांचं आपल्या परीने कौतुक करावं. 


Comments

  1. रोज रोज आखों तले.....
    जबसे तुम्हारी नामकी मिसरी ओंठ लगाई है.....
    लाजवाब

    ReplyDelete

Post a Comment