गच्चीच्या उपयोगितेचा सिद्धांत

गच्चीच्या उपयोगितेचा सिद्धांत 

                 

                 काय हल्ली गावोगावी अपार्टमेंट संस्कृती बोकाळली आहे! अपार्टमेंट नावाच्या खुराड्यात लोक घराची दारं बंद करून असतात. जाता-येता कोणी दिसला तरच अगदी जीवावर आल्यासारखे एकमेकांशी बोलतात. जरा चार लोक हिंडता फिरताना दिसतात ते खाली पार्किंग वगैरे मध्ये. अपार्टमेंट विकत घेताना किंवा अगदी भाड्याने घेताना पण मुख्य विचार केला जातो तो पार्किंगची जागा सोयीची आहे की नाही हा. अपार्टमेंट आणि त्यातही लिफ्ट नसेल तर अगदीच नाईलाज झाल्याशिवाय कोणी सर्वात वरच्या मजल्यावरचे घर घेत नाही. ते घर विकत किंवा भाड्याने घ्यावं यासाठी एक प्रमुख अमिश दाखवलं जातं ते म्हणजे गच्चीचा जास्त वावर तुम्हाला मिळेल. आता त्यावर "हो, वाळवणं करायला बरं" असला अभिप्राय आला तर ते कुटुंब वानप्रस्थाकडे झुकू लागलं आहे असं समजावं. "टेरेस गार्डन करावी.." असा विचार डोक्यात येतो ते काहीसं आरंभशूर नवविवाहित दाम्पत्य असतं. सुरुवातीचे उत्साहाचे दिवस सरले की गाडी वाळवणांकडे वळते. या सगळ्यात एका घटकाकडे मात्र फारसं कोणाचं लक्ष जात नाही पटकन, ते म्हणजे अविवाहित तरुण-तरुणी. बाकी लोक गच्चीचा कसा का उपयोग करेनात पण गच्चीच्या उपयोगितेचा सिद्धांत खरा गवसेलला असतो तो या घटकाला. त्यात कोरोना कृपेने आलेला हा लॉकडाऊन तर गच्चीची उपयोगिता अनेक पटींनी वाढवत आहे. कशी? 
              अबालवृद्ध सध्या घरातच अडकून आहेत. घराबाहेर निघालेच तर संध्याकाळच्या वेळेला सोसायटीच्या आवारात नाही तर गच्चीत. त्यात सध्या मावळत्या सूर्याला साक्षी ठेऊन गच्चीत वेळ घालवण्यात तरुण घटक आघाडीवर आहे. आता गच्चीत काही फक्त मावळता सूर्यच दिसत नाही. अनेक अर्थांनी रंगांची उधळण असते. इमारती बऱ्याच जवळ जवळ असतात मग काही रंग आणि ते रंग परिधान केलेली प्रेक्षणीय स्थळे अधिक ठळकपणे दिसू लागतात. लॉकडाऊन मध्ये गच्चीवरील वेळाची सुरूवात झाली ती आपल्या फोनमध्ये मान खुपसून पण हळूहळू माना वर येऊ लागल्या. टेहळणी अधिक वाढली. त्या टेहळणीतून अपेक्षित बिंदू निश्चित झाले की माना फोनमध्ये कमी आणि त्या त्या बिंदूंवर अधिक केंद्रित होऊ लागल्या. एकदा लक्ष केंद्रित झालं की तेवढ्यावर भागत नाही आणि प्रकरण थांबत तर नाहीच नाही. मग काय, पुढे नजरेला वाचा फुटते. सुरुवातीला अगदीच बेताबेताने होणारी बोलणी पुढे अधिक वाढत जातात. प्रकरण इथेही थांबत नाही. आता गच्चीत माना वर आल्या तरी घरात त्या झुकलेल्या राहतील याची सोय केली जाते. म्हणजे काय तर एकमेकांच्या फोन नंबरची देवाण घेवाण होते. मग काय तिन्ही-त्रिकाल बडबड सुरू. 
                वाढता वाढता वाढे ही बडबड, काम न उरले काही! लॉकडाऊन पासून वाढलेली ही गच्चीची उपयोगिता भलतीच फळाला आलेली असते. आता ही सर्व प्रक्रिया जर इतर वेळी झाली असती तर एव्हाना गच्चीची उपयोगिता कमी होऊन तिथला वावर कमी झाला असता पण... लॉकडाऊन! काय करावे? ये तेरी गच्ची, ये मेरी गच्ची, या न्यायाने प्रकरण पुढे जात राहते. लॉकडाऊन ला झाले आता ५० दिवस. इतक्या दिवसात प्रकरण इथवर आलेले असते. पुढे काय याची चिंता लागलेली असते. म्हणजे काही इतर इष्टस्थळी भेट होण्याची शक्यता याची चाचपणी सुरू असते. मनात इमले रचले जात असतात. कसं होईल, काय होईल याची उत्सुकता वाढू लागते.... लॉकडाऊन १ मध्ये गच्चीची उपयोगिता सुरू झाली, लॉकडाऊन २ च्या सुरूवातीला बोलणं सुरू झालं ते संपेपर्यंत गप्पांमध्ये परिवर्तित झालं, लॉकडाऊन ३ मध्ये फोन नंबरची देवाण-घेवाण झाली. आता प्रतीक्षा सुरू झाली ती प्रत्यक्ष भेटीची पण..... वेळ आली चौथ्या लॉकडाऊनची!!!


Comments

Post a Comment