अजिंठा

अजिंठा 


             आवडती गाणी या मालिकेत आज 'अजिंठा' या चित्रपटातील गाणी. 
सिद्धहस्त कवी, ज्यांना निसर्गकवी म्हणून ओळखले जाते अशा ना. धो. महानोर यांच्या 'अजिंठा' या काव्यावर आधारित जे काव्य एका सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. अजिंठा... शिल्पकला, चित्रकला यांचा मानवनिर्मित अद्भुत चमत्कार आहे. चित्र, शिल्पांची ती उधळण पाहून कोणीही सामान्य माणूस भारून जाईल तर संवेदनशील कवी, गीतकार, संगीतकार, कथाकार, कलाकार यांच्या प्रतिभेला स्फुरण न चढणं अशक्यच आहे. त्यात अठराव्या शतकातील एका सत्य घटना, एक प्रेम कहाणी जर आधाराला मिळाली तर त्या प्रतिभेला अधिक धार चढते. 
            मेजर रॉबर्ट गिल, ज्याला ब्रिटीश सरकारने भारतातील जुनी मंदिरे, स्थान यांची चित्रे काढून एक संग्रह तयार करण्याचे काम दिले होते. त्याच कामाचा भाग म्हणून गिल अजिंठ्याला आला. त्या काळात अजिंठा इतर जगासाठी दुर्लक्षित असला तरी स्थानिक आदिवासींच्या श्रद्धेचा भाग होता. त्यांच्यातील एक पारो आणि मेजर गिल यांच्यात एक तरल प्रेमकहाणी उभी राहिली. अजिंठ्याला मेजर गिल आणि पारो यांचे स्मारक उभारले गेलेले आहे. याच कहाणीवर आधारित महानोर यांचे काव्य आहे. या काव्यात, या कथेत एक विलक्षण नाट्य आहे आणि दृश्य पातळीवर खूप काही करण्यासारखे आहे. त्यामुळे नितीन देसाई यांनी हा चित्रपट करताना सेट उभारणी आणि मांडणीच्या पातळीवर कमाल केली आहे. सुंदर, संस्मरणीय दृश्य ही बाजू नितीन देसाई यांनी उत्कृष्ट सांभाळली आहे तर श्राव्य पातळीवर गीतकार म्हणून स्वतः महानोर आणि संगीतकार म्हणून कौशल इनामदार यांनी कमाल केली आहे. जवळ जवळ ९ गाणी या चित्रपटात आहेत. 
                चित्रपट, गाणी येऊन जातात. गाणी त्या त्या वेळी ऐकलेली असतात. पण का कोणास ठाऊक पण त्या गाण्यातलं जे मनाला भिडायचं असतं ते तेव्हा भिडत नाही. आपणही असेच केव्हातरी निवांत क्षणी ही गाणी पुन्हा ऐकतो तेव्हा त्या गाण्यातलं काही न काही भिडतं. हे असं काही भिडलं की मग भान हरपायला होतं, ही गाणी पाठ सोडत नाहीत. मागच्या महिन्यात अजिंठा मधली छंद ओठातले, मन चिंब पावसाळी, चिंब झाली पावसाने, चैताचा रंग ही गाणी पुनःपुन्हा ऐकत होतो. आताही परत परत ऐकतो. पुढेही ऐकत राहीन... 
 यातली माझ्या आवडीची पुढे देत आहे. 
              

          पावसाळा हा तर आपल्याकडच्या कवींचा आवडता ऋतू. त्यात अजिंठाच्या पार्श्वभूमीवर पावसाळा आणि सुंदर शब्दरचना असल्यानंतर या चित्रपटातलं, 
मन चिंब पावसाळी, झाडात रंग ओले, 
घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले 

पाऊस पाखरांच्या, पंखात थेंबथेंबी 
शिडकाव संथ येता, झाडे निळी कुसूंबी 

हे गाणं तयार होतं. कौशल इनामदार यांनी दिलेली सुंदर चाल आणि हंसिका अय्यरचा स्वर आणि नितांतसुंदर चित्रण यांमुळे एक सुंदर दृकश्राव्य असा हा अनुभव आहे. 

               उलगडणारी प्रेमकहाणी हादेखील कवींच्या प्रतिभेसाठी आव्हान तर असतेच पण त्यातूनच सुंदर काव्य होतात. त्या काव्याला सुंदर चाली देणारे कौशल इनामदार सारखे संगीतकार आणि तितकीच छान गायकी देणारे सुरेश वाडकर यांच्या सारखे गायक असतील तर 

छंद ओठातले, गीत गाती नवे 
गारवा या नव्या पालवीला 
हात हातातले सोडवे ना सये 
गच्च आकाश भेटे भुईला ... 

या वसंतातला सृष्टीचा सोहळा 
बिलगूनी गंध रानवानाला 
गौर लजवंतीचा, केतकीचा मळा 
पुष्कळा आज तू सोबतीला
सारखी कलाकृती तयार होते. 
               ही गाणी ऐका... नाही शक्यतो पहा. कारण सुंदर गाण्याचं तितकंच सुंदर चित्रीकरण ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. अगदीच करायचं म्हणून केलेलं गाण्यांचं चित्रीकरण इथे नाही. गाणी ऐका, पहा आणि गीतकार, संगीतकार, गायकांना मनापासून दाद द्या.. मी प्रत्येक वेळी देतोच आहे. तुम्हीही द्या... 




                

Comments