ये हवा ये रात ये चांदनी, 'तेरी इक अदा पे निसार हैं


"लता गाती हैं, बाकी सब तो रोती हैं" किंवा "एका फुटपाथवरून दुसऱ्या फुटपाथवर उभ्या असलेल्या माणसाला आवाज द्यायचा असेल तर किशोर कुमारचा आवाज बरा आहे.. " असली टोकाची, दुराग्रही किंवा अधिक स्पष्ट शब्दात म्हणायचं तर उर्मट मतं होती संगीतकार सज्जाद हुसेनची. एका बाजूला या सज्जाद हुसेनच्या वेड लावणाऱ्या रचना आहेत तर दुसऱ्या बाजूला एखाद्या कलाकारालाच शोभणारा उर्मटपणा त्यात भरलेला होता. पन्नास-साठच्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार सज्जादच्या प्रतिभेची ग्वाही देतात. त्याच्यासारखा मेंडोलिन वाजवणारा कलाकार चित्रपटसृष्टीत झाला नाही. पण हा प्रतिभेचा गर्व, दुराग्रह हाच कदाचित त्या गुणी संगीतकाराच्या ऱ्हासाचे कारण ठरला असणार. कारण त्यांची सांगीतिक कारकीर्द अगदीच थोडी आहे. आपल्या उर्मट मुक्ताफळांमुळे या गुणी संगीतकाराने 'मुघल-ए-आझम'चं संगीत करण्यास मिळण्यासारखी शतकात एकदा मिळणारी संधी गमावली. असो. या संगीतकाराविषयी अधिक माहितीसाठी गुगल वगैरे आहेच पण ती अधिक रोचक शब्दात समजून घ्यायची असेल तर शिरीष कणेकरांचं 'यादों की बारात' वगैरे वाचावं.
सज्जाद हा माणूस म्हणून कसा का असेना पण हिंदी चित्रपट संगीतात पूर्णपणे 'ओरिजिनल' अशा अजरामर सुरावटी सज्जाद या संगीतकाराने दिल्या आहेत. त्यात मला आवडलेलं एक गाणं म्हणजे 'संगदिल' चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण रचित
"ये हवा, ये रात, ये चांदनी
तेरी एक अदा पे निसार हैं - २
मुझे क्यूँ न हो तेरी आरजू
तेरी जुस्तजू में बहार हैं "
अलौकिक प्रतिभेचं लेणं लाभलेला कवी-गीतकार राजेंद्र कृष्णने सुंदर शब्द लिहिले आहेत. त्या शब्दांना सज्जादने सुंदर पण तितक्याच कठीण चालीत बांधले आहे. स्वतःला गायक म्हणवून घेणाऱ्या हौशी लोकांना देखील पेलण्यास अतिशय अवघड अशी रचना आहे. रचना अवघड असली तरी अतिशय तरल आहे. त्यासाठी तसाच तरल आवाज गरजेचा होता. कंप असणारा, तरल आवाजाची देणगी लाभलेल्या तलत महमूदशिवाय या रचनेला कोणी न्याय देऊ शकला असता का अशी शंका येते. (इतकं सुंदर गाणाऱ्या तलतला सज्जाद 'गलत महमूद' असं का म्हणायचा कोण जाणे!) असो..
राजेंद्र कृष्णची प्रतिभावान लेखणी, सज्जादची अप्रतिम रचना आणि तलत महमूदचा तरल आवाज यांची एकत्रित भट्टी म्हणजे हे सुंदर गाणं. ऐका.. एक बार ऐकोगे तो बार बार सुनोगे....

Comments