वो मेरी तरफ यूं चले आं रहे हैं, के अरमान धडकन से टकरा रहें हैं



हिंदी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायन, अभिनय, लेखन, गीतकार, संगीत दिग्दर्शन, दिग्दर्शन, निर्मिती अशी अष्टपैलू कामगिरी करणारा एकच मनस्वी पण तितकाच कलंदर आणि विक्षिप्त म्हणून ओळखला जाणारा कलाकार झाला तो म्हणजे आभासकुमार कुंजलाल गांगुली, म्हणजेच किशोर कुमार. "किशोर कुमारसारखा गुणांचा खजिना हिंदी चित्रपटसृष्टीला नीटसा पचलाच नाही" असं श्रेष्ठ लेखक आणि चित्रपट समीक्षक शिरीष कणेकर म्हणतात ते काही अंशी पटतं. कारण किशोर कुमार म्हणजे उडत्या चालीची गाणी गाणारा, यॉडलिंग करणारा गायक अशीच प्रतिमा डोळ्यासमोर येते. किशोर कुमारचे चित्रपट म्हणजे डोळ्यासमोर येतात ते चलती की नाम गाडी, हाफ टिकिट, पडोसन वगैरे चित्रपट. ज्यात किशोर कुमारने धमाल केली आहे. पण किशोर कुमारलाही वाटत असणार तसंच मला स्वतःलाही काहीसं वैषम्य वाटतं ते 'दूर का राही आणि दूर गगन की छाव में आणि मुसाफिर या चित्रपटातला त्याचा अत्यंत नैसर्गिक, उत्स्फूर्त, मनस्वी अभिनयाची दखल घेतली गेली नाही. त्यातले दूर का राही आणि दूर गगन की छाव में हे चित्रपट किशोर कुमारने निर्माण, दिग्दर्शन, अभिनय अशा जवळ जवळ सर्व जबाबदाऱ्या सांभाळून केले होते.
तीच गोष्ट किशोर कुमारच्या गाण्यांची. किशोर कुमार चित्रपट अभिनय करत होता तेव्हा चित्रपटातली स्वतःची गाणी गात होता. पार्श्वगायन होतं ते मुख्यतः देव आनंदच्या चित्रपटात. कारण त्या काळात पार्श्वगायन क्षेत्रात रफी आणि तलत तळपत होते. त्याचबरोबर दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्या काळातला किशोरच्या गाण्यांवर असलेला सैगलचा प्रभाव. वास्तविक आपण सैगलचे भक्त आहोत हे किशोर कुमारने सातत्याने नमूद केले आहे. त्यामुळे सुरुवातीच्या गाण्यांवर सैगलचा प्रभाव स्पष्ट आहे. नंतर काहीसा मुक्तपणा त्याच्या गाण्यात आहे. 'आराधना' पासून किशोर कुमार पार्श्वगायन क्षेत्रात सर्वोच्च स्थानी पोचला. त्यानंतरची गाणी काहीशी उडत्या चालीची, यॉडलिंग वगैरे असलेली आहेत. पण त्यातही मग 'इस मोड से जाते है, तेरे बिना जिंदगीसे कोई, शिकवा..'(आँधी), 'ओ साथी रे, तेरे बिना भी क्या जिना' (मुकद्दर का सिकंदर) असे अनेक मोती विखुरलेले आहेत.
किशोर कुमारचं कुठलं गाणं मला आवडलं? किशोरची आवडणारी अनेक गाणी आहेत पण काहीसं वेगळं, किशोरने सैगलच्या धाटणीने गायलेल्या गाण्यावर इथे मांडावं असं वाटलं. ते गाणं आहे 'काफिला' चित्रपटातलं, हुस्नलाल भगतराम यांचं संगीत असलेलं

" वह मेरी तरफ यूं चले आ रहे हैं, के अरमान धडकन से टकरा रहे हैं"

ब्रजेन्द्र गौड यांनी गीत रचना करताना असे काही चपखल शब्द वापरले आहेत की, आपली आवडती व्यक्ती आपल्याकडे येत आहे त्यावेळी काय अवस्था होते याचं मूर्तिमंत चित्र उभं राहतं. ते काय आहे, हे इथे फक्त एक कडवं लिहितो, बाकी गाणं ऐका...
"उन्हे देखने को उठी मेरी नजरे,
मुझे देखते ही झुकी उनकी पलके
ना जाने वो क्यों हमसे शरमा रहे हैं,
की अरमान धडकन से टकरा रहे हैं.. "
ता. क.: हे अप्रतिम गाणं मी आवर्जून ऐकलं त्यामागे कारणही शिरीष कणेकर आहेत. त्यांच्या किशोर कुमारवरच्या लेखात त्यांनी हे गाणं त्यांच्या किशोरच्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे असं म्हटलं आहे. त्याचबरोबर त्या लेखात संपूर्ण गीत त्या लेखात मांडलं आहे. तातडीने शोध घेतला आणि गाणं ऐकलं. ते आवडलं.


Comments

  1. A very good analysis of kishore kumar's different styles.. Which we always thought to be only one!!

    ReplyDelete

Post a Comment