शिवकल्याण राजा
"तीनशे वर्षं, तीनशे वर्षं महाराष्ट्र पारतंत्र्याच्या अंधःकारात चाचपडत होता. वर्षातल्या बाराही अमावास्यांनी जणू गरारा घातला होता. महाराष्ट्राची भूमी घोड्यांच्या टापांखाली वेदनांनी कण्हत होती, गाऱ्हाणं गात होती... "
प्राणीमात्र जाले दुःखी, पाहता कोणी नाही सुखी
कठीण काळे वोळखी, धरीनात कोणी
माणसा खावया अन्न नाही, अंथरूण-पांघरूण तेही नाही
घर कराया सामग्री नाही, विचार सुचेना काही
अखंड चिंतेचा प्रवाही पडले लोक
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या रसाळ, ओघवत्या वाणीतून काही वाक्यात शिकाळातला एकेक प्रसंग, एकेक तुकडा मांडला जातो आणि पाठोपाठ येतो लता मंगेशकरांचा दैवी आवाज. शिवकाळ, महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पर्व. कवी, नाटककार, चित्रकार, शिल्पकार, संगीतकार, गायक आणि इतर सर्व कलांमधून शिवाजीचा पराक्रम गायला जातो, मांडला जातो. जेव्हा उत्कृष्ट दर्जाचे कवी, संगीतकार, गायक, वादक आणि बाबासाहेबांसारखा निवेदक एकत्र येतात तेव्हा 'शिवकल्याण राजा' सारखी कलाकृती तयार होते.
या अजरामर कलाकृतीमध्ये खणखणीत लेखणीची जादू दाखवली आहे ती समर्थ रामदास, कविराज भूषण, स्वातंत्र्यवीर सावरकर, गोविंदाग्रज, कुसुमाग्रज, शंकर वैद्य या समर्थ शब्दप्रभूंनी. वेगवेगळ्या कवींनी शिवाजीच्या आयुष्यातील वेगवेगळ्या प्रसंगांसाठी चपखल अशा रचना लिहिल्या आहेत. यादीच करायची तर,
समर्थ रामदास मांडतात,
स्वर्गीची लोटली जेथे
रामगंगा महानदी
तीर्थासी तुळणा नाही, आनंदवनभुवनी
त्याचप्रमाणे रामदासांची अजरामर रचना
निश्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारु ।
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी ।।
कविराज भूषणाची लेखणी शिवाजीचं गुणगान गाताना थकत नाही,
कुंद कहाँ, पयवृंद कहाँ और चंद कहाँ
सर्जा जस के आगे..
स्वातंत्र्यवीर सावरकर शिवाजीची आरती रचताना म्हणतात
जय देव, जय देव, जय जय शिवराया
या या अनन्य शरणा, आर्या ताराया।
आर्यांच्या देशावारी म्लेच्छांचा घाला,
आला आला, सावध हो शिवभूपाला
सद्गदिता भूमाता, दे तुज हाकेला
करुणरव भेदून तव हृदय न का गेला..
भारतवर्षावर दाटलेले परकी सत्तेचे जोखड आपल्या पराक्रमाने भेदून इतिहासाचे पाट बदलणारा हा शिवाजीराजा स्वातंत्र्यवीर सावरकरांना साक्षात नृसिंह वाटले
हे हिंदुशक्तिसंभूत दीप्ततम तम तेजा
हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री सौभाग्य भूतीच्या साजा
हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा..
पुत्र शहाजीला झाला, पुत्र जिजाबाईला झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला. या नवजात बालकाला झोपवताना अंगाई गायली गेली ती प्रेरणेची, परिस्थितीची जाणीव करून देणारी. ही अंगाई रचली ती सिद्धहस्त ,शब्दप्रभू गोविंदाग्रजांनी,
गुणीबाळ असा जागसी का रे बाळा,
नीज रे नीज शिवराया...
बाजीप्रभूंच्या पराक्रमाने आणि हौतात्म्याने विषण्ण झालेले मन कुसुमाग्रज आपल्या लेखणीतून मांडतात,
सरणार कधी रण प्रभू तरी
हे कुठवर साहू घाव शिरी
प्रसंग कोणता त्यानुसार केलेली चपखल शब्दरचना सरसरून अंगावर काटा आणते. असे एक ना अनेक प्रसंग त्यांचं रसाळ वर्णन, त्याला हृदयनाथ मंगेशकरांसारख्या संगीतकारांनी दिलेल्या सुंदर चाली आणि लता मंगेशकरांचा दैवी आवाज एकेक रचना ऐकत पुढे जातो. एकामागोमाग एक गाणं येत जातं आणि प्रसंग डोळ्यासमोर येत जातो. असं करत करत पुढे जातो आणि होतो उषःकाल तो हिंदवी स्वराज्याचा, हिंदुपद्पाद्शाहीचा ,शिवराज्याभिषेकाचा! महाराज सिंहासनाधीश्वर झाले हा प्रसंग येतो तो शंकर वैद्य यांच्या या रचनेतून,
शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला
दहा दिशांच्या हृदयांमधून अरुणोदय झाला..
हा अरुणोदय झाला. गजर झाला शिवछत्रपतींचा जय हो! श्रीजगदंबेचा जय हो! या भरतभूमीचा जय हो! जयजयकारांतून उजळल्या शतकांच्या माला...
एका ठराविक अंतराने एका आवडत्या गाण्यावर काहीतरी लिहिणार असा उपक्रम करत आहे. यापूर्वीची गाणी एकेक होती. पुढेही एकेकच असतील पण एकच संकल्पना, त्यावर आधारित एकाहून एक सुंदर गाणी हा प्रकार इतर भाषेत झालाही असेल पण 'शिवकल्याण राजा' सारखी मांडणी कुठेही नसावी. आणि असलीच तरी माझ्या लेखी फारशी किंमत नसेल. शिवकल्याण मधील एकेक गाणी ऐकताना अंगावर सरसरून काटा येतो. पराक्रमाची गाथा ऐकताना छाती फुगते, ऊर भरून येतो. हा सांगीतिक चमत्कार एकदा नाही तर अनेकदा ऐकत राहावा असाच आहे.. शिवकल्याण राजा!!
Comments
Post a Comment