जो वादा रहा वो निभाना पडेगा..



सध्या लॉकडाऊनचा काळ घरी बसून वाचन, गाणी ऐकणे, चित्रपट-नाटक (नाटके प्रत्यक्षच पाहायला हवीत हे नक्की पण सध्या इलाज नाही. त्यामुळे युट्युब की जय हो!) वगैरे सुरु आहे. या सगळ्याचं बाय-प्रॉडक्ट म्हणून मग लेखणी चालते. त्यात एक उपक्रम सुचला. मला आवडलेल्या गाण्यांवर काहीतरी लिहून फेबुवर पोस्ट करावे




निगाहे मिलाने को जी चाहता है...
यह इश्क़ इश्क़ है, इश्क़ इश्क़.. आणि निगाहें नाज पे (बरसात की रात) अशा एकापेक्षा एक सुंदर कव्वाली एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला एकमेकांना प्रेमाच्या उत्कटतेची ग्वाही देणारं, प्रेमातील वचनाची आठवण करून देणारं ताजमहल चित्रपटातलं
" जो वादा किया, वह निभाना पडेगा,
रोके जमाना चाहे, रोकें खुदाई
तुमको आना पडेगा।"
(गाण्या ची लिंक)
हे नितांतसुंदर गाणं दुसरीकडे. हे गाणं ऐकताना हमखास आपल्या आवडत्या ' ती ' चा किंवा ' तो ' चा चेहरा डोळ्यासमोर येणार हे नक्की. या गाण्यात संगीताची, अर्थगर्भ शब्दांची आतिशबाजी आहे. पण त्यात कुठेही आक्रमकता नाही. एक उत्कटता आहे, लाघवी आर्जव आहे. शब्दांच्या विटा रचणारा रसिला शायर साहिर लुधियानवी, हृदयाला भिडणाऱ्या रोशनच्या विलक्षण सुंदर चालीचा पाया आणि रफी- लता मंगेशकरांनी चढविलेला स्वर्गीय गायकीचा कळस यातून ही कलात्मक इमारत उभी राहिली आहे.
तत्कालीन संगीतकार, वादक, गीतकार - कवींना चित्रपटाचे नायक - नायिका कोण आहेत याची फारशी फिकीर नसावी. आपल्या खणखणीत गाण्यांच्या खणखणीत नाण्यावर ' कोणीही उभे करा, आमच्या संगीताच्या - गाण्याच्या जोरावर चित्रपट गाजवून दाखवतो की नाही बघा' असं खुलं चॅलेंज ते घेत असावेत. त्यामुळेच तर मग ' बैजू बावरा' भारतभूषण चा नाही तर नौशादचा होतो. नवरंग व्ही. शांताराम आणि सी. रामचंद्र यांचा म्हणून ओळखला जातो. तसाच हा ताजमहल प्रदीपकुमार वगैरे नाही तर संगीतकार रोशनचा म्हणून ओळखला जातो.
हे गाणं दोन दिवसांपूर्वी लक्षपूर्वक ऐकलं. वास्तविक त्यापूर्वीही अनेकदा ऐकलं होतं. पण कानावर पडलं, एवढंच, या पातळीवर ते होतं. पण आता लक्षपूर्वक ऐकलं आणि होष उडाले. मी पुनःपुन्हा ऐकतोच आहे. ऐकत ऐकत डोक्यात झरझर काहीतरी येत गेलं आणि मी लिहीत सुटलो.. असो. बाकी सगळं बाजूला ठेवा, हे गाणं ऐका आणि मुग्ध होऊन जा...

Comments