नजरो से नजरे मिली तो..


नजरो से नजरे मिली तो, जन्नत सी महकी दुवा आई.... अशी एका गाण्यातली ओळ आहे. हा अनुभव कित्येक वेळा येत असतो. बहुतेक वेळा होणार नजरो का खेल हा क्षणभंगुर ठरतो. कारण हा 'आँखो ही आँखो मे इशारा हो गया, बैठे बैठे जीने सहारा हो गया..' हे फक्त सिनेमात घडतं. प्रत्यक्षात प्रकरण पुढे जात कथा सुफळ संपूर्ण झाली अशा घटना हजारात काय लाखात एक होत असणार. आता हा नजरो का खेल खरं तर फार नाजूक असतो. यात कुठेतरी तार जुळावी लागते. म्हणजे कुठलीच गोष्ट एकतर्फी होऊ शकत नाही. होऊ नये. टाळी एका हाताने वाजू नये. एक टक नजर हा समोरच्या व्यक्तीच्या सन्मानाचा प्रश्न होऊ शकतो, किंबहुना होतोच. पण पहिली नजरानजर होते आणि चटका बसल्यासारखा प्रतिसाद असतो तो लक्ष बाजूला घेत, असं काही घडलंच नाही हे भासवण्याचा. ही पहिली चकमक झडली की मग मात्र चटका बसल्यासारखी प्रतिक्रिया कमी होत चकमक वारंवार घडावी असं दोन्ही बाजूंना वाटत राहतं. 

प्रसंगानुरूप, स्थानानुरूप चकमकींचे प्रमाण आणि स्वरूप बदलते. कसे? तुम्ही बसमध्ये आहात. बसमध्ये तुफान गर्दी आहे. त्यात कसेबसे तुम्ही उभे आहात. तुम्हाला सुरुवातीला लक्षात येत नाही. पण मग एक साक्षात्कार होतो, तुम्ही उभे आहात तिथून काही अंतरावर एका सीटवर एकंदर गर्दीत, एका विशिष्ट कोनात, एक प्रेक्षणीय स्थळ असते. तिकीट काढून, सुट्या पैशांची घासाघीस, स्थिरस्थावर झालात की टेहळणी सुरू होते. आणि तो क्षण येतो. दोन्ही बाजूनी योग्य तो तो कोन साधला जातो आणि नजरानजर होते. चटका बसल्यासारखा प्रतिसाद दोन्ही बाजूनी.  दोन्ही बाजू जरा सुखावतात. 'मन मे लड्डू' वगैरे होतात. पण ते काही क्षण. तुम्ही विसरून जाता. आपली काय, गाणी ऐकत राहता, गर्दीत झालंच शक्य तर मोबाईल मध्ये डोकं खुपसता पण तेदेखील क्षणिक ठरतं. कारण तार छेडली गेलेली असते. मग मोबाईलमध्ये खुपसलेल्या डोक्यातूनच एक विशिष्ट कोन साधला जातो आणि अहो आश्चर्यम! समोरच्या बाजूनेही तेच घडलेले असते. डिमीनीशींग मार्जिनल युटिलिटी हा सिद्धांत इथेही लागू पडतो. म्हणजे आता प्रतिक्रिया जरा सौम्य झालेली असते. असाच खेळ सुरू राहतो. आता एक वेळ अशी आलेली असते की नजरानजर झाल्यानंतर एक स्मितहास्य फेकायचा अवकाश की प्रतिसाद तशाच स्मितहास्याने येणार. पण नेहमीप्रमाणे खत्रूड नशीब आड येतं. इथेही तुम्ही आशावादी असता, म्हणजे ते खत्रूड नशीब तुमचंच नाही तर समोरच्या बाजुचंदेखील आहे अशीच भावना होते. या कहाणीत खडा पडतो कसला??..... तुमचा किंवा तिचा स्टॉप येतो आणि सगळं मुसळ केरात. आता 'ती' पुन्हा दिसण्याची शक्यता हजारात, कदाचित लाखात एक अशी निघते. 

दुसरे असे ठिकाण म्हणजे नाटक, सिनेमा एखादे व्याख्यान असणारे सभागृह. इथे देखील विशिष्ट कोन निश्चित झाले की विनाकारण काहीतरी निमित्त शोधून कोन साधले जातात आणि चकमकी घडतात. इथेही परत नशीब खत्रूड असतं. सिनेमा, नाटक किंवा व्याख्यान किंवा जे काही असेल ते संपते आणि पुन्हा सगळं मुसळ केरात! मुळात हा सगळा खेळ क्षणभंगुर असतो. त्यात एखादे प्रेक्षणीय स्थळ तुमच्या मनात घर करून जाते. मग मात्र निर्माण होणारी भावना तलत महमूदने आपल्या मधाळ, मुलायम आवाजात गाऊन ठेवलेली आहे, 

तुम तो दिल के तार छेडकर, हो गए, बेखबर 
चांद के तले जालेंगे हम, ऐ सनम, रातभर.... 

या सगळ्यातली आणखी एक गंमत म्हणजे ही भावना देखील क्षणभंगुरच असते. त्यामुळेच नजरो से नजरे मिली तो.... इथवर येऊनच सगळं थांबतं. त्यापुढे जाण्यासाठी तुमच्यातली हिंमत आणि उच्चकोटीचं ताराबल असावे लागते. नाहीतर आँखो ही आँखो मी होणारा इशारा इशाऱ्यापुरताच उरतो. नजरो का खेल, नजरेपर्यंतच राहतो.  

Comments