न कळलेली व्यथा 

           चौथं ब्रेकअप!... "आपल्यात काही सुरळीत घडू शकेल असं मला वाटत नाही. आपण हे नातं इथेच थांबवूया." असं तो म्हणाला. त्याचं ते वाक्य ऐकत असतानाच ती सुन्न होत होती. ऐकतेय ते खरं आहे की भयाण स्वप्नं? ते स्वप्न नसून सत्य आहे ह्याची जाणीव तिला एका क्षणात झाली. त्या क्षणी संमिश्र भावनांचा महापूर तिच्या मनात आला. त्या भावनांना वाट करून द्यावी. की नको?.... त्याला विचारावं? की नको.... अशा असंख्य प्रश्नांची दाटी तिच्या मनात होत होती. काय प्रतिक्रिया द्यावी? त्याच्या थंड निर्जीव डोळ्यांकडे बघून तिला चीड, संताप, दुःख, वेदना सर्व काही वाटत होतं. पुन्हा प्रश्न उमटत होता... द्यावी प्रतिक्रिया? की नको... 

             वास्तविक तो इंजिनीअर. आय.टी. मध्ये जॉब. छान पॅकेज. दोन वर्षात स्वतःचं घर घेण्याच्या गोष्टी करणारा. काहीसा सरधोपट मार्गावर चालणारा. आणि ती?.... स्वतःच्या इच्छेने, पूर्ण विचारांती कन्सल्टिंग, क्लिनिकल सायकोलॉजी कडे वळलेली. स्वतंत्र विचारांची. स्वतःची ठाम मतं असणारी. कुठलाच आणि कसलाच सरधोपटपणा तिला आवडत नाही. मानवत नाही. तिच्या क्षेत्रात तिचं नाव होऊ घातलं आहे. तिच्याकडे काउन्सेलिंग साठी अनेक तरुण मुलं-मुली येतात. अशीच ब्रेकअप्स, एकतर्फी प्रेमातून अपेक्षाभंग आणि त्यातून नैराश्यात गेलेली. त्यांच्या कथा आणि व्यथा जाणून घेऊन समुपदेशन करणारी ती. पण तिच्या स्पष्टवक्त्या, ठाम आणि काहीशा डॉमिनेटिंग स्वभावामुळे कोणी तिच्याशी मैत्रीच्या पलीकडे नातं घेऊन जाण्यास उत्सुक नसायचा. पण तरीही तिघांनी धाडस केलं म्हणूया किंवा एकमेकांच्यात अशा काही तारा जुळल्या. भलेही परस्परविरोधी असतील, पण जुळल्या. त्या अल्पजीवीच ठरल्या. 

              पहिल्यांदा नातं तोडण्याचा निर्णय तिचा होता. त्याला तिचं स्वतंत्र असणं खुपत होतं. आपलं स्वतंत्र असणं त्याला खुपतं या गोष्टीमुळे ती नाराज होती. सुप्तावस्थेत असलेली ही गोष्ट एका भांडणात समोर आली आणि तिने निर्णय घेतला. पुढल्या दोन वेळी मात्र नातं तोडण्याचे निर्णय त्यांचे होते. त्यामागे ठोस कारणं... म्हटलं तर होती, म्हटलं तर नव्हती. त्यांनी सांगितली नाहीत, तिनेही फारशा खोलात जाऊन विचारली नाहीत. पण तिसऱ्या ब्रेकअपनंतर एक बदल तिचा तिलाच जाणवायला लागला. तिच्या मनाला एक सततची बोच लागली की दोष आपल्यात आहे. आपला स्वभाव, आचार याला कारणीभूत आहे. अशाच मानसिक अवस्थेत तिला इंजिनीअर असणारा तो भेटला. सुरुवातीचे टप्पे पार पडले आणि मैत्रीचं रूपांतर रिलेशनशिपमध्ये होऊन गेलं. 
     
                अनेक दिवस सुरळीत सुरू होतं त्यांचं. पण तिचा वेग, स्वतंत्र अस्तित्व, त्याच्या आवाक्याबाहेरचं होतं. दोघांच्या आर्थिक स्तरात फारशी तफावत नसली तरी कामाचं क्षेत्र, वावर असणारा वर्ग, सामाजिक स्तर यात प्रचंड तफावत होती. हे फरक त्यांना माहिती होते, जाणवत होते. नात्यातला संवाद आणि एकमेकांबद्दलची ओढ कमी होत गेली. पण पूर्वानुभवांमुळे ती नात्यातली मुग्धता, संवाद टिकवण्याचा अतोनात प्रयत्न करत होती. पण काही घडलं नाही. आणि....  त्या दिवशी त्याने अत्यंत थंड-निर्विकार चेहऱ्याने त्याचा निर्णय सांगितला. ती सैरभैर झाली. काही क्षणांसाठी. तो त्याच्या वाटेने निघून गेला... ती विचारात पडली. स्वतःला पुन्हा उभं तर करायला हवं. कोणीतरी कंटाळून आपल्यापासून दूर जात आहे ही भावना भयावह असली तरी याचा अर्थ नव्हे की तिने माणसांपासून लांब राहावं. पुढे जाऊन अपेक्षाभंगाचं, प्रेमभंगाचं दुःख होईल म्हणून मैत्रीपासून दूर रहाणं, नातं निर्माण न होऊ देणं हे कितपत योग्य आहे? इतरांसाठी ही न कळणारी व्यथा असली तरी ती कवटाळून ती बसलेली नाही. बसणार नाही. तिची व्यथा इतर कुणाला कळली नाही तरी चालेल पण तिने त्या व्यथेतच गुंतून राहायला नको. 

Comments

Post a Comment