का ग बाई भेटलीस अशी अचानक पुन्हा?


का ग बाई भेटलीस अशी अचानक पुन्हा? 

तुझा चेहरा, तुझी आठवण मनाच्या एका कोपऱ्यात दडवून ठेवली होती, जवळजवळ विस्मृतीत जाण्याच्या पातळीपर्यंत पोचली होती, ती पुन्हा पटलावर आली आता,

का ग बाई भेटलीस अशी अचानक पुन्हा?

तुझी भेट अनपेक्षित होती. तू भेटलीस, बोललीस. त्या क्षणी निर्विकार होतो मी, कुठलीही भावना मनात नाही आली पण त्यानंतर पूर्ण दिवस पिसासारखा आल्हाददायक, सुदंर गेला. माझ्या भावविश्वात तुझाच चेहरा येतो आता 

का ग बाई भेटलीस अशी अचानक पुन्हा?

माझं अचाट धावणार मन, सुंदर कादंबरीमय प्रसंग तपशिलासह रंगवणारं मन, त्या प्रसंगांत तुला भरतं आता. वास्तव जगाच्या प्रश्र्नांतून कोमल दिलासा देणारे ते क्षण मी विचार करताना फुलवतो, शब्दबध्द करायला बसलो की शब्द तोकडे पडायचे, ते प्रसंगच शब्द होऊन लेखणीद्वारे प्रकटतात आता, 

का ग बाई भेटलीस अशी अचानक पुन्हा?

बुद्धी आणि मनाच्या झगड्यात अडकलेला मी वास्तवाला धीरोदात्तपणे वगैरे सामोरा जाण्याचा प्रयत्न करणारा मी, भावनेला, भावनिक उमाळ्यांना दूर राखू पाहणारा मी, व्यवहारीपणाकडून भावनेकडे अधिक झुकू लागलो आहे आता, 

का ग बाई भेटलीस अशी अचानक पुन्हा?

Comments