आपल्या आयुष्यात काही टप्पे असतात जिथे काही माणसं डोक्यात बसतात. काही डोक्यात जातात. काही डोक्यावरून जातात. मेंदूच्या कुठल्या तरी कोपऱ्यात घर करून राहतात. आयुष्य बदलायला लागतं. आपलं आणि इतरांचंही. प्रत्येक जण आपापल्या वाटेवर चालायला लागतो. प्रत्येकाची आपली धडपड सुरु होते. कोणी त्यात चटकन यशस्वी होतो. लौकिकार्थाने मार्गी लागतो. तर काहींचा संघर्ष पाचवीला पुजलेला असतो तो आयुष्यभर सुटत नाही. काही का असेना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात धडपड सुरूच राहते. मेंदूच्या कोपऱ्यात दडलेली ती माणसं कुठे जातात?... कुठे जाणार? ती तसाच मेंदूचा कोपरा अडवून असतात. जात नाहीत कुठे. पण अचानक एक भेद होतो.. कसला? वर्तुळाचा. कसलं वर्तुळ? आपलं वर्तुळ. ज्यात आपण असतो. सध्या आपल्या अवतीभवती असलेली माणसं असतात. आपली धडपड असते. ह्या वर्तुळात इतक्यात कुठला मोठा भेद होणे अपेक्षित नसते. पण तो होतो. कसा? विस्मृतीत जाऊ पाहणारी मेंदूच्या कोपऱ्यात असलेली त्या माणसाची प्रतिमा अचानक डोळ्यासमोर येऊन उभी ठाकते. आणि मग....
आणि मग, काही नाही. एक विचित्र मानसिक खेळ सुरु होतो. एक विचित्र द्वंद्व अवघ्या काही क्षणात सुरु होतं. मेंदू एका क्षणात 'तो' कोपरा उलगडतो. मनातली प्रतिमा आणि प्रत्यक्षातली प्रतिमा ताडून पहिली जाते. खात्री पटते. पुढे, मनात घोंघावणाऱ्या अनेक प्रश्नांपैकी एक प्रश्न असतो आपण त्या माणसाला ओळखलं आहे पण त्या माणसाने आपल्याला ओळखलं आहे का? ओळखलं असेल तर ओळख दाखवावी का? की त्याने ओळख दाखवावी मग मी दाखवू?..... असंख्य विचार, असंख्य प्रश्न. वेळ अतिशय कमी. ही ओझरती भेट किंवा नजरानजर आहे. वेळ अतिशय कमी आहे. विचारांची दाटी आहे. एका क्षणी नजरानजर आहे. नजरेत ओळख दिसली आहे पण ती दाखवली जात नाही. त्याही बाजूला तोच खेळ, तेच द्वंद्व, तेच प्रश्न असतील का? आपण मनकवडे असतो तर किती बरं झालं असतं हा विचारदेखील झटकन मनात येऊन जातो. वेळ निघून जाते.. दोघे आपापल्या वाटेला लागतात...
कोण होता तो वर्तुळ भेदणारा माणूस? वास्तविक ती 'ती' असते. सुरुवातीला मनाच्या खेळात आणि लिहिण्याच्या ओघात ती लाही सर्वसमावेशक सर्वनामात गुंडाळलं गेलं. पण त्यातही आपला एक स्वार्थ असतो. समजा हे कोणी वाचण्याच्या भानगडीत पडलंच आणि सुरुवात वाचून 'हे वाचण्याच्या लायकीचे नाही' असा विचार आला तर काही तरी भंकस चालली होती हा विचार करून काही बाजूला होतील. काही म्हणतील 'काहीतरी विचित्र आहे. ते त्याचं त्यालाच लखलाभ..' काहींना प्रश्न पडेल आणि काहींना 'माणूस' म्हणाल्यामुळे 'हायसंही' वाटेल. ते असो, तर ती. कुठे भेटली आपल्याला? शाळेत. पहिला दिवस. नववीच्या वर्गात दोघेही शाळा बदलून आलेलो. तिच्या चेहऱ्यावर कायम साऱ्या जगाची चिंता आपल्याच डोक्यावर असल्याची व्याकुळता तर मी नेहमीप्रमाणेच काहीसा बेफिकीर, निर्विकार. आपण नुकतीच वाचायला सुरुवात केलेली असते. शाळकरी मुलांसाठी, शाळकरी मुलांची असलेली कथा 'शाळा' नुकतीच वाचलेली असते. आपण स्वतःला काही कारण नसताना 'जोशी' समजायला लागतो. 'शिरोडकर' चा घेत असतो. एकीकडे बेफिकीर आणि दुसरीकडे जोशी. एक द्वंद्व तिथेच सुरु होतं. पुढे काय? द्वंद्व निकाली निघतं. आपण जोशी नाही आणि आपण शिरोडकर शोधली तरी त्याचा काही उपयोग नाही. कारण अशा जोशांचा कायम 'जोशींच' होत आला आहे. भले आपण तिच्यात आपली शिरोडकर पहिली तरी ती जोशीला देईलच असं नाही..... लांबचा विचार. कायम लांबचा विचार. आणि अतिविचार. कदाचित या अतिविचारामुळेच आपण अधिक व्यवहारी होऊन स्वतःला 'जोशी'च्या भूमिकेतून बाहेर काढतो का? आपल्या बाबतीत उत्तर निघत, हो. पुढे काय? ती कोपऱ्यात जाऊन बसते. काही कारण नसताना. आपण त्या 'जोशी' च्या वर्तुळातून बाहेर पडतो. पण ती एक कोपरा अडवून बसते.. पुढे जात आपलं सध्याचं वर्तुळ भेदायला. पण.....
हे वर्तुळ भेदलं. तरी होणार काय आहे? काहीच नाही. कारण आपण तेव्हाही जोशी नव्हतो आताही नाही. ती शिरोडकर तेव्हाही नव्हती. आताही नसणार. अतिविचार करून व्यवहारी झालेले आपण आतातर खूप लांबची वाट चालून आलेलो आहोत. वाटा वेगळ्या आहेत. तरीही मेंदूचा कोपरा पुन्हा दिवाणखान्यात आणून तिने वर्तुळ भेदलंच. काही कारण नसताना आपण काही काळ विचार करणार. ती पुन्हा कोपऱ्यात जाणार. कोपऱ्यातून विस्मृतीतही. पुन्हा एकदा भेदायला वर्तुळ.....
खूपच सुंदर
ReplyDelete