प्यारी तेरे लोचन...

 कुणीतरी असावं यार..! सोबती. जिच्याशी मनातलं सगळं बोलता यावं. मनमोकळा संवाद करता यावा. तो खरंच संवाद असावा. स्वगत नाही. कुणीतरी असावं. केवळ शारीरिक आकर्षणा पलीकडचं. हळुवार, सुंदर स्पर्शाची ओढ़ देणारं. ती ओढ़ असतेच पण त्या स्पर्शाच्या पलीकडेही मनांचा स्पर्श अधिक मोहवणारा, अधिक उल्हासित करणारा असतो. आयुष्यात असं फार कमी वेळा होतं जेव्हा एखाद्या मुलीकड़े पाहिल्यानंतर हिच्याशी मनाचा स्पर्श व्हावा, मनाचे सूर जुळावेत, तारा छेडल्या जाव्यात. धकाधकीनं भरलेल्या सध्याच्या आयुष्यात तिच्या रुपाने हळुवार झुळुक यावी. आयुष्य अधिक छान वाटावं. आणि हे उभयपक्षी असावं. एकतर्फीपणाला काही फारसा अर्थ नसतो. ती कुठल्या तरी एका बाजूने होणारी तडजोड असते. 
      असं फार थोड्या वेळी होतं जेव्हा अपघाताने तिची नी आपली नजरानजर होते. तो एक क्षण, खूप काही बोलून जातो. आसपासच्या कोलाहलाचा विसर पडतो. एकमेकांकड़े रोखलेली नजर बोलायला लागते. काय बोलते? ... वास्तविक दोघांनाही कळत नाही. आपल्याला कळत नसतं म्हणून असं वाटतं की तिलाही काही कळत नसेल. पण क्षणार्धात खूप मोठा संवाद साधला गेल्याची भावना निर्माण होते. अधिकाची ओढ़ लागते. पण घडतं ते,

     तुम तो दिल के तार छेड़कर, हो गए बेखबर
     चाँद के तले जलेंगे हम, रातभर...
ही भावना होते. 
       त्या बाजूला देखील असंच होत असेल का? आपण करत आहो तितका विचार ती करत असेल का? ती ओढ़ तिलाही वाटली असेल का?... वाटली असेलही. पण मग पुढे काय? काही घडण्याची शक्यता असते? जवळजवळ नाही. पुन्हा त्याच ठिकाणी किंवा इतर कुठल्या ठिकाणी, त्याच परिस्थितीत किंवा भिन्न परिस्थितीत पुन्हा समोरासमोर यायला आणि नजरेतून संवाद वगैरे व्हायला आपलं आयुष्य हा काही सिनेमा नसतो. तिथे वारंवार होणारी नजरानजर, अपघाताने होणारी. पण सिनेमातले अपघातदेखील घडवून आणलेले असतात. ती पटकथा कोणीतरी आधीच लिहिलेली असते. घडवून आणलेले अपघात अभिनीत करणाऱ्यांना देखील ती पटकथा ठावुक असते. पण आपल्याला नसते ना ठावुक! आपली पटकथा कोणी अज्ञ्यात शक्ती, अज्ञ्यात वेळी लिहीत असते. आपण त्याबरहुकुम अभिनय करत असतो. वास्तववादी वगैरे नाही तर वास्तवाचा अभिनय करत असतो. पण नक्की होतं ते,

तुमको नींद आएगी, तुम तो सो ही जाओगे
किसका ले लिया है दिल, यह भी भूल जाओगे
यह तो कह दो एक बार ख्वाब में तो आओगे..?

मनी वसे ते स्वप्नी दिसे असं म्हणतात. कवी विचारतो स्वप्नात दिसशील का? पण ह्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं की झोपच उडाली तर?.. तर कसलं स्वप्न आणि कसलं काय? त्या प्रश्नाचं उत्तर कवी देत नसला तरी आपण देऊ शकतो ना.. झोप उडाली असेल तर आपण असं तर म्हणुच शकतो ना 

      प्यारी तेरे लोचन...
      बसे मेरे मनमे ऐसे,
      उड़ गई निंदिया, आएआ ना चैन
      नैन मिटा लूँ तो, सामने आए तेरा मुख.... 
      प्यारी तेरे लोचन....!!!

Comments