काहीजणांची आयुष्यं संथ-स्थीर असतात. कुठल्यातरी सरकारी खात्यात चिकटतात आणि मग वर्षानुवर्ष तिथेच चिकटून राहतात. ह्या बाबतीत शिक्षक-प्राध्यापक लोकांचं कायमच कौतूक वाटत आलं आहे. एकामागून एक बॅच येतात आणि जातात. शिक्षक-प्राध्यापक तोच एक विषय वर्षानुवर्ष शिकवत राहतात. त्या त्या वर्षातील त्यांचे आवडते विद्यार्थी-विद्यार्थिनी तयार होतात. वर्ष संपलं की ते आवडते विद्यार्थी आपापल्या वाटेने निघून जातात. जाणाऱ्या प्रत्येक बॅचला, त्यातल्या आवडत्यांना आपणच शिक्षकांचे आवडते असं वाटत असतं. पण शिक्षक मात्र 'हाच खेळ पुन्हा उद्या' या चालीवर पुन्हा पुढल्या वर्षीच्या कामाला लागतात. चिकाटीला दाद द्यायला हवी. वैयक्तिक आयुष्यात आपले काही छंद-आवडी वगैरे जरूर असतील त्यांच्या पण एकसूरीपणाबद्दल खंतदेखील असेल. एका बाजूला ह्या प्रकारचे लोक तर दुसऱ्या बाजूला बनत असलेला डाव, बसलेली घड़ी विस्कटुन पुन्हा नवा खेळ सुरू करणारी असतात. अशी नवी खेळी सुरू करण्याची संधी, वेळ कधी एकदाच येते तर कधी पुनःपुन्हा येत राहते. हा नविन खेळ काम-धंदाच नाही तर माणसांच्या, नात्यांबाबतही सुरू असतो. त्यातही हल्लीच्या अस्थिर, वेगवान, इंस्टंटच्या जमान्यात नात्यांच्या घडण्याचं आणि विसकटण्याचं, बिघडण्याचं प्रमाण आणि वेग खूप वाढला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर 'तो' कसा आहे?.... 'तो'ला डोळ्यासमोर आणला की कोणत्या प्रकारात घालावा हा प्रश्न पडतो. असं का???
'तो'. एका अर्थी तो स्थितिवादी आहे. घडणारे सामाजिक, तांत्रिक बदल आत्मसात करण्याचा त्याचा वेग खूप कमी आहे. खूप जास्त चिकित्सक वृत्ती आहे. बदलत्या वर्तमानाची आणि त्यावरून संभाव्य भविष्याची चिकित्सा करण्यात, त्यावर विचार करण्यातच त्याचा खूप वेळ जातो. आयुष्याचं म्हणावं तर काहीसा स्थिर प्रवृत्तिचा आहे. रोजच्या जगण्यातली घाई-गडबड त्याला आवडत नाही. दैनंदिन आयुष्यातील काहीशा निवांतपणाकड़े त्याचा ओढा आहे. याचं स्वरुप म्हणून त्याच्या स्वभावाकड़े एकदा पाहिलं की लक्षात येईल.
लहानपणापासून काहीसा बुजरा, चार लोकात चटकन न मिसळणारा परंतू प्रसंगानुरूप चटकन बदलू शकणारा तो आहे. सततच्या बदल्या आणि त्यामुळे खूप वेळा बदललेली शाळा यामुळे न मिसळण्याचा (अव)गुण वाढीला लागला. पण याचीच दूसरी बाजू म्हणजे बदललेल्या वातावरणात लगेच अडजस्ट होउन शिक्षक-शाळेचं व्यवस्थापन इथे जाउन बोलणे, माहिती घेणे, विविध उपक्रमात स्वतःहून भाग घेणे या गोष्टी तो करू शकायचा. त्याचा न मिसळण्याचा स्वाभाव की आसपासच्या समवयीन मुलांचा हेकेखोर आड़मूठेपणा हा प्रश्न आहे पण कोलोनित मित्र-मैत्र होऊ शकलं नाही. त्याची भरपाई वाढलेल्या एकलकोंडेपणाने आणि वाचनाच्या गोडीने झाली. प्रसंगानुरूप आणखी मोठा बदल म्हणजे व्यापक स्तरावर टेबल टेनिस सराव, जिल्हा-विभाग-राज्य स्तरावरील स्पर्धा यातील सहभाग. ही सर्व घडी बसते असं वाटेपर्यंत पुन्हा विस्कटते.
आता? नवं शहर. खूप मोठं. शिक्षणाचं माहेरघर वगैरे. तो आला. वसतिगृहात राहिला. दोन वर्षं. वाचन, मनन, चिंतन, व्याख्याने, परिसंवाद, संगीत सभा यातील हजेरी, वक्तृत्व स्पर्धांमधील सहभाग असं क्षितिज विस्तारलं. पण 'तो' ज्या मूळ कारणासाठी आला होता ते कारण काहीसं मागे पडलं. आणि इथून त्याच्या आयुष्यातील वेगवान बदलांची, बसत येणारी घड़ी विस्कटण्याची गती वाढली. त्याने कला-नाट्यक्षेत्रात मुशाफिरी केली. तिथलं बरंच काही तो शिकला. उत्तमोत्तम कलाकृती पाहण्याची दृष्टी त्याने मिळवली. एक मोठा मित्रपरिवार मिळवला. त्यांच्यात कधी नव्हे इतका तो मिसळला, तिथली घड़ी बसते आहे असं वाटायच्या आत विसकटली. 'तो' पुन्हा Back to Square one..
आता?... तो एका उत्तम संस्थेत दाखल झाला. इतर कशाहीपेक्षा व्यक्तिमत्वाला पैलू पाडण्यासाठी. तिथे गेल्यानंतर एक आजवर न पाहिलेलं क्षितिज त्याला दिसलं. त्याला ध्यास लागला. ते धसास लावण्यासाठी तो झटतो आहे. हे झटत असताना विविध काळात विविध व्यक्ती त्याच्या आयुष्यात आल्या. त्या व्यक्तीचं त्याच्या आयुष्यातील अस्तित्व असंच अल्पजीवी ठरत आलेलं आहे. अशा खूप मोजक्या व्यक्ती आहेत ज्या दीर्घकाळपर्यंत फक्त त्याच्या संपर्कातच नाही तर नजीकच्या वर्तुळात आहेत. आता 'तो' ला कायम एक भीती वाटत असते. अर्थात ती पूर्वानुभवांमुळेच आहे की, आता हे वर्तुळ नजीकचं वगैरे वाटत आहे पण अचानक काही कळायच्या आत पुन्हा विसकटलं तर??........ पुन्हा Back to square one..?.....
Comments
Post a Comment