दुर्दम्य



 अवहेलना, अपमान.... माणूस ओढवून घेतो. कधी चूक इतर कोणाची असते तर बऱ्याच वेळा आपली असते. तो क्षण आणि निर्णयाची वेळ. काय होतं कोण जाणे? विवक्षित निर्णय घेऊन बसतो. त्याचे विलक्षण आणि बरे-वाईट परिणाम असतात. ते भोगायचे असतात. तेवढी मानसिक आणि शारीरिक शक्ती असायला हवी.
     शिरीष कणेकर देव आनंदना विचारतात, 'तुमचे सिनेमे एका मागोमाग एक पडत आहेत. प्रेक्षक निदान दिग्दर्शक म्हणून तरी तुम्हाला स्वीकारण्यास तयार नाहीत, असं वाटतं का? ' त्यांचं वय, त्यांची पूर्वीची कारकीर्द ह्यांचा मान राखता हा प्रश्न थेट पण सौम्य शब्दात विचारला गेला होता. त्यावर त्यांचं उत्तर होतं, 'सध्या माझे चित्रपट पडत आहेत. सर्व बाजूने टीका केली जात आहे. माझा एक चित्रपट चालु द्यात. सारी गणितं बदलतील. साऱ्या टीका बंद होतील...' उत्तर ऐकून कणेकर काहीसे भारावले पण दुसऱ्या बाजूस हेच उत्तर एक भाबडा आशावाद आहे असं नाही वाटत? वाटण्याचा प्रश्नच नाही. त्यांचं वय, एकंदर परिस्थिती पाहता तो एक भाबडा आशावादच होता. हा असा भाबडा आशावाद चांगला की वाईट? पिंडे पिंडे मतिर्भिन्न। कोणाचं काय मत असू शकतं कोणाचं काही. एका बाजूला हा आशावाद तुम्हाला जिवंत राखतो. ह्या जिवंत आशावादाचं एक उदाहरण पुन्हा एक सिनेमा. उड़ता पंजाब. बिहारी तरुणी. कामाच्या शोधात पंजाब मध्ये येते. एका विलक्षण चक्रात अडकते. अंमली पदार्थ, तिचा एक भोगवस्तू म्हणून होत असलेला वापर, ह्यात एक विचित्र आशावाद तिला जिवंतच राखत नाही तर तिच्यात माणसाला जीवन मरणाच्या परिस्थितीत जिवंत राहण्यासाठी निर्माण होणारी आक्रमकता येते. तो आशावाद म्हणजे, पंजाबच्या कुठल्याशा खेड्यात एका भयाण खोलीच्या खिड़कीतून गोव्याच्या समुद्रकिनाऱ्याची, आनंदाची जाहिरात असणारं पोस्टर.
           आशावादाच्या पलीकडे एक गोष्ट असते ती दुर्दम्य इच्छाशक्ति. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस काय करू शकतो? त्याचं उदाहरण हॉकी खेळाडु संदीप सिंग. चुकीने उडालेली बंदुकीची गोळी, कमरेखालचं शरीर निस्तेज झालं. पुन्हा म्हणून हॉकी खेळता येणार नाही, स्वतःच्या पायावर उभं राहता येणार नाही. एका खेळाडुच्या आयुष्यात याहुन दुसरा आघात कोणता असणार? त्याला पुन्हा पायावर उभं करण्यासाठी कुटुंब, विविध संस्था मदत करतात. भारतात तसं पाहू गेल्यास फार दुर्मिळ घटना असते ही. हे सर्व ठीक आहे पण त्या माणसाचीच इच्छा नसेल. इच्छाशक्ती नसेल, मनातली उमेद संपली असेल तर काय उपयोग? पण त्याची न संपलेली उमेद आणि दुर्दम्य इच्छाशक्ती त्याला ना की फ़क्त आपल्या पायावर उभी करू शकली पण पुन्हा भारतीय संघात घेऊन गेली. अर्जुन पुरस्कारापर्यंत घेऊन गेली. ह्या घटना, उदाहरणे एक बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला प्रचंड गरीबी आहे. विचारपण करू शकणार नाही अशा भयाण परिस्थितीत लोक राहतात. त्या तुलनेत आपली दुःख आणि विवंचना काहीशा बालीश वाटायला लागतात.
        पुन्हा विचार करायला लागतो. तुलना खरीच योग्य आहे? कारण परिस्थिती भिन्न, घटना भिन्न, परिणाम भिन्न. सध्या, वाचन आणि अभ्यासामुळे विचाराचा परीघ वाढला आहे. खूप गोष्टी माहिती होत आहेत, डोक्यात विचारांचा भुंगा होतो आहे. असो...... विचार, विचार..!! उत्तर काय? दुर्दम्य इच्छाशक्ती, आशावाद आणि सातत्य!
करूयात काय..??? होय!!

Comments