मैत्र: भाग २

                
                    गंधार, मिहिर, शंतनू, पुष्कर, अभिजित या 'पंचकडीच्या' जोडीलाच ऋतुजा, अदिती आणि अंकिता आता कट्ट्याच्या मेंबर झाल्या. आमच्याप्रमाणेच रोज कट्ट्यावर हजेरी लावायच्या. त्या दिवशीच्या पहिल्या भेटीनंतर  आठवडाभरात दोन सिनेमे आणि कॉफी हाउसच्या अनेक वाऱ्या झाल्या. मी आणि अभ्या सकाळी नऊपासून संध्याकाळी पाच पर्यंत क्लासमध्ये बसून  आंबून जातो. पाच वाजता क्लास सुटला कि मोजून पाचव्या मिनिटाला कट्ट्यावर हजर. आल्या आल्या शेजारच्या टपरीवरचा 'कटिंग' घशाखाली ओतला की तबियत खुश व्हायची. साडेपाच -सहापर्यंत मिहिर, पुष्कर, शंत्या, अदिती, अंकिता, ऋतुजा हजर व्हायचे. मग सात-साडेसात पर्यंत गप्पाटप्पा चालायच्या. त्या तासा-दोन तासात  पाचेक 'सुट्ट्या'चे फिल्टर चिरडलेले असायचे. टपरीवरच्या चहाच्या खात्यात ८-९ कटिंग मांडलेले असायचे. असा एकंदर कार्यक्रम होता. 
        नेहमीप्रमाणे मी आणि अभिजीत कट्ट्यावर आलो होतो. आज क्लासमध्ये हिंदी सिनेमाच्या भाषेत सांगायचं तर, 
        'दिमाग का दही हो चुका था!'
थकूनभागून बसलो होतो. तेवढ्यात अदिती, अंकिता आणि ऋतुजा आल्या. 
         "काय, बाकीचे कुठे आहेत?" ऋतुजा. 
        "येतील. तुम्ही कशा काय उगवला इतक्या लवकर?" मी. 
        "शेवटचं लेक्चर बंक मारलं.. " अंकिता. 
        "तू?" अभ्या. 
        "हो मग? का?"  
        "लागली हवा कॉलेजची… " अभ्या. 
        "Enviornment चं लेक्चर होतं.. " अदिती. 
       "वाटलच मला. नाहीतर तुम्ही कसल्या लेक्चर बंक करताय?" मी. आमचं  बोलणं सुरु असताना पुष्कर आणि शंत्या आले. 
       "मिहिर काका कडे गेलाय त्याच्या… " शंत्या. 
       "okay "
       "अरे अभ्या… " आता या मुलीही अभिजीत वगैरे वरून अभ्या, शंत्या इत्यादीवर आल्या होत्या. 
       "काय?"
       "नेहा पण आमच्याच कॉलेजला आली आहे. एका दुसऱ्या कोर्स साठी. " 
       "काय बोलते?" 
       "हो. ती विचारत होती तुमच्याबद्दल… "
       "ए, एक करा. तिला इथे आणू नका. मिहिर कसलं भडक डोक्याचं आहे… फुकटचे भांडणं नकोयेत कट्ट्यावर.. " अभ्या. 
       "एक, एक मिनिट… गोष्ट काय आहे?" मी. 
       " गोष्ट school days मधली आहे…"
       "मिहिर आणि नेहा दोघांचं सुरु होतं… "शंत्या. 
       "You mean, love? Relationship?" मी. 
       "हो… पुढची कथा तर ऐक. हा मिहिर माहिती आहे न कसा भडक डोक्याचा आहे… एक तर  शाळेतलं ते 'शाळा' टाईपच ते प्रकरण. त्यात हे असले अतरंग पात्र. एकाला झाकावा आणि दुसर्याला काढावा अशी गत. आणि अशा प्रकरणात भांडणं व्हायला कितीसा वेळ लागतो? तसे नेहमीचे भांडणं ठरलेले. 
      आणि एके दिवशी कसं कोण जाणे, तिच्या घरी सगळं समजलं. हे कोणत्यातरी 'कोणाचंच बरं न बघवणारया नाठाळ 'वर्ग बंधू' चंच काम असणार. काही का असेना, तिला तिच्या घरून सॉलिड दम दिला. त्याभरात ही मिहिरला काहीतरी बोलून बसली… आणि मिहिरला तेवढं कारण पुरेसं होतं. 
           '' कोण लागून गेली तू अशी? गेलीस उडत…… " अशी संतप्त प्रतिक्रिया देऊन मिहिरने नंतर आजपर्यंत तिचं तोंड पाहिलेलं नाही. अबे, तिचा विषय निघाला तर मिहिर खास ठेवणीतल्या असतात अशा शिव्या घालायचा. अर्थात माघारीच. "
          "तिला माहिती असेल ना बे, मिहिर पण इथे आहे.. " शंत्या. 
          " न माहिती असायला काय झालं? त्याच्याबद्दल विचारताना तिने  ' नालायक' एवढाच शब्द उच्चारला." ऋतुजाने माहिती पुरवली. 
         "क्या बात है!!  दोघेही तोडीस तोड आहेत म्हणजे… " मी. 
        "नाही तर काय?" अभ्या.  
       
               . " ए, ते सोडा. मी काय म्हणते कुठेतरी trip ला जाऊयात काय?" अदितीने प्रस्ताव मांडला. आणि एकमुखानं त्याला संमती मिळाली. 
          "कुठे जायचं पण?" 
         " कुठेही चला ना. पावसाळा सुरु आहे. मस्त वातावरण आहे सगळीकडे. "
         " सिंहगड?" अंकिता. 
        "सिंहगड सोडून काही पण बोला. " मी. 
        "मग तूच बोल ना. साल्या पुण्याचा ना तू?" पुष्कर. 
        "सकाळी लवकर उठाल काय?"   
        "पाल्हाळ लावू नको, लवकर बोल बे!" शंत्या. 
        "भीमाशंकर. १३० किमी आहे. भल्या पहाटे ५-६ला निघायचं. संध्याकाळी ७ पर्यंत वापस..!" मी. 
        "डन." एकमुखानं. 
        "मिहिरला फोन लव बे… आणि हां, गाड्या?" मी. 
        ''आमच्या दोन आहेत.'' 
       " माझी एक आणि अभ्याची एक. आपण आहोत ८ जण... "
       "माझी रूममेट पण येईल… "अदिती. 
       "मृण्मयी?" अंकिता. 
       "हो." 
        "ठीक आहे, एक गाडी होईल अरेंज. " असं करत करत ठरलं सगळं. रविवारी पहाटे साडेपाचला कट्ट्यावर जमायचं असं ठरलं आणि मिटिंग तुटली. 
   
        

            (क्रमशः ) 

Comments