मैत्र: भाग १

पुणे. अतरंगी शहर आहे. शिक्षणाच माहेरघर. सांस्कृतिक राजधानी. पेन्शनरांच शहर. पेशव्यांचं शहर.  बऱ्याच काही गोष्टींच शहर. पुण्याची ही वैशिष्ट्य आहेत. किंबहूना  सगळं आहे म्हणूनच पुण्याला 'पुणेरी'पण लाभलं आहे आणि टिकून राहणार आहे. आता या सगळ्या वैशिष्ट्यांचा पुरावा हवा असेल तर, जरा मोकळा वेळ काढा आणि पुण्यातल्या नुसत्या पेठान्मधून चक्कर टाका. आणि त्यातही तुम्हाला जर  उच्च कोटीच 'पुणेरी'पण पहायचं असेल तर सदाशिव, नारायण, शनिवार इत्यादी पेठांमध्ये ते ठायी ठायी सापडेल. जुन्या वाड्यांच्या जागी आता अपार्टमेंट, बिल्डिंग आलेल्या असल्या तरी 

                'सभासदांशिवाय इतरांनी वाहने लावल्यास चाकाटली हवा काढून दिली जाइल 
                                                                                                  -हुकुमावरून '
असली पाटी हटकून गेटवर असणारच. बिल्डींगमधले लोक जर आणखीच कलात्मक असतील तर फक्त पुणेकरच बोलू शकतील अशा हिंदीत 
               'गाडी गेट के सामने लागओंगे, हमारे नाक मी दम लओंगे, तो टायर में  हवा काम पाओंगे'
                                                                                                  -हुकुमावरून 
 असल्या पाट्या सापडणारच. ह्या असल्या पाट्या पुणेरी संस्कृतीचाच भाग आहेत.
           
            पुण्याला शिक्षणाचं माहेरघर का म्हणतात? प्रश्न मौलिक आहे. उत्तरादाखल आपण लगेच फुले, टिळक, आगरकर, रानडे वगैरेंच्या कामाकडे जाणार. पुस्तकी उत्तरं देणार. वास्तविक ते सगळं आहेच. पण आणखी एक म्हणजे हिंदू नववर्ष जरी पाडव्याला सुरु होत असलं तरी पुण्यातलं वर्ष मात्र जून-जुलै-ऑगस्ट  मध्ये सुरु होतं. जून-जुलै मध्ये इतर कॉलेजेस आणि ऑगस्ट मध्ये इंजीरिनिअरिंग कॉलेजेस सुरु होतात. सांगण्याचं  आणि त्यासाठी इतकं पाल्हाळ लावण्याचं कारण इतकंच की आमचं वर्ष सुरु झालं. मिहिर,शंतनू, पुष्कर, अभिजीत आणि मी. 
              क्लासचा पहिला दिवस. महिना-दीड महिना सुट्टीनंतर क्लास-कॉलेज सुरु झाल्यानंतर जे वातावरण असतं. तसलं वातावरण होतं. पोरं सुट्टीची ओसरणारी धुंदी आणि क्लास ची उत्सुकता या दोन अवस्थांमध्ये तरंगत होती. काहींचा दंगा सुरु होता. त्यात मी निवडून शेवटल्या बाकावरच जाउन बसलो होतो. बाकी सगळी गर्दी वेगवेगळ्या मूडमध्ये दंग होती पण मी मात्र सर केव्हा येतात याची वाट याची पाहत होतो फक्त. काय करू शकणार होतो नाहीतरी? जे काही मोजके मित्र वगैरे होते ते इतर ठिकाणी क्लासेस ला होते. इकडे मी एकटाच. त्यामुळे इकडे-तिकडे पाहत बसलो होतो. इतक्यात क्लासची वेळ झाली. सर अगदी वेळेवर वर्गात दाखल झाले. 
             "Good morning friends …." आल्या आल्या सरांनी  स्वतःची 'ओळख परेड' सुरु केली. आधी स्वतःची आणि क्लासची यथेच्च तारीफ वगैरे करून विषयाला हात घातला. 
            "Today, we are going to see some basic concepts.....'' असं म्हणून सर बोर्डकडे वळणार तोच दारात एक मुलगा उभा असलेला त्यांना दिसला… अंगात लाल रंगाचा टी शर्ट, त्यावर साठच्या दशकापासून तरुणांच्या मनावर गारुड घालून असणारया, क्युबाचा बंडखोर चे गवेराचा फोटो. गुडघ्यापाशी फाटलेली पँट, हातात मोबाईल आणि कानात हेड फोन्स. सर पाहतच राहिले त्याच्याकडे… आणि सर पाहतात हे पाहिल्यावर वर्गातली सगळी गर्दी तमाम 'पीछे मूड!!' केल्यासारखी त्याच्याकडे पाहत होती. त्याला त्याचं काही नव्हतं. तो अत्यंत बेफिकीरीने आत आला, संपूर्ण क्लासला वळसा घालून माझ्या शेजारी येउन बसला. 
            क्लासची वेळ होती १० ची. हा मनुष्य आला ११. १५ ला. गेला सव्वा तास सरांना जे जमलं नव्हतं ते त्याने फक्त २ मिनिटात करून दाखवलं होतं. गेला सव्वा तास अखंड बडबड करूनही वर्गातल्या मुलाचं लक्ष आपल्याकडे वळवण्याचा अट्टाहास करूनही सरांना ते जमलं नव्हतं, तेच हा पहा.  येउन बसल्यानंतरही सरांसकट सगळ्यांच्या नजरा त्याच्यावरच. आणि पर्यायाने माझ्यावर देखील. 
        "Aren't you very early for the next lecture??" या सरांच्या प्रश्नवजा टोमण्याला याने, आम्ही बसलो होतो तिथल्या सगळ्या लोकांना ऐकू जाइल अशा आवाजात,
        "यालाच तर ग्रेट talent म्हणतात…… " एवढंच बोलून हशा पिकवून दिला. आणि लगेच लक्षात आलं हे खटलं काहीतरी वेगळंच आहे. नंतर उरलेल्या अर्ध्या तासात त्याने माझाशी मैत्री आणि बसलो होतो ती जागा fix करून टाकली. हा असा अत्रंग प्राणी म्हणजेच अभिजीत. 
         नंतर महिनाभर सकाळी ९. ४० ला मी त्याच्या होस्टेलवर जाणे त्याला फोन करून दमणे तो रोज १०च्या क्लास ला १०. १० ला बाहेर निघणे आणि मी त्याला त्याबद्दल क्लास येईपर्यंत बोलणे हा नित्याचा क्रम होऊन गेला. दरम्यान मी त्याला माझ्या घराजवळच पण एका आड बाजूची जागा दाखवली. शांत. निवांत. म्हटली तर रोड वर म्हटली तर नाही अशी. ती जागा आमचीच असल्या सारखी होती.
        " बस्स!! हा आपला अड्डा…… " असं अभ्याने जाहीर केलं. ऐकायला मी एकटाच होतो ही गोष्ट निराळी.  मग त्यानंतर १०. १० ला बाहेर पडणारा अभ्या मला ९. ३० लाच अड्ड्यावर दिसायला लागला. महिनाभरातच CET चे निकाल लागले. आणि नक्की झालं की अभिजीतचे शाळेतले मित्र Engineering ला पुण्यात येणार. त्यांच्या admission चे सोपस्कार पार पडल्यावर सगळे दाखल झाले. 
          ११वी-१२वी  अभ्यासू किडा वगैरे विशेषणांनी इतरांकडून सतत ज्याचा सन्मान व्हायचा तो पुष्कर एका most popular, reputed Engineering कॉलेजला लागला. त्याला होस्टेल मिळालं. आणि ११वी-१२वी ला 'अभ्यासू किडा' सोडून बाकी सगळ्या 'विशेषणांनी' गौरवले गेलेले शंतनू आणि मिहिर इतर कॉलेजेस मध्ये लागली. इतके दिवस हॉस्टेल वर राहणाऱ्या अभ्याने मग त्या दोघांसोबत एक रूम भाड्याने घेतली. सगळं स्थिरस्थावर झाल्यावर ते तिघेही अड्ड्याला  सामील झाले. त्यांनी आल्या आल्या अड्ड्याचा केला कट्टा. आणि मग रोज संध्याकाळी किमान अर्धा तास तरी तिथे आमच्या बैठकी होऊ लागल्या. कुचाळक्या, दंगा सुरु असायचा. शेजारच्या चहावाल्या काकांकडे खाते मांडले गेले. त्या दिवशी असेच सगळे बसलो होतो. पुष्कर फक्त यायचा होता.  
             "पुष्कर कुठं खपला बे?" मिहिर.  
            "कुठं गेलाय काय माहिती?" शंत्या 
      . अकरावी-बारावीला अत्यंत गरीब गाय, अभ्यासू, कुठं जाणं नाही काही नाही. पण त्यामुळेच पहा न! आता पुण्याच्या इतक्या रेप्यूटेड कोलेजला लागला होता. आणि आता. पुण्यात येउन जेमतेम महिनाही  झाला नसेल, पण तोपर्यंत त्याचं त्यालाही आठवत नसेल आपण गेले २ वर्ष कसे होतो, इतका बदलला होता. रात्री-अपरात्री भटकणं, टवाळक्या, सगळं शिकला होता. आणि कट्ट्यावर आल्यापासून 'सुट्टा' हि सुरु झाला होता.'कट्टा' आणि 'सुट्टा' यांचा सुंदर मिलाफ साधला होता. वास्तविक हा मिलाफ मी आणि शंत्या सोडून बाकीच्यांनी साधला होता. अचानक, 
            "हे आलं…… " अभ्या. पुष्कर धावत-पळत धापा टाकत आला. 
            "कुठं उलथला होता बे?" शंत्या. 
            "कॉलेज बे! कुठं जाणार आहे? ते सालं graphics चं मास्तर, आलं आणि 'Today we will have an extra lecture' असा म्हणून सुरु केलं…. पोरं पण असले चुत्या ना! बसले गुमान!!… सिगारेट घे बे… " पुष्करचं शेवटलं वाक्य अभ्याला उद्देशून होतं. आणि बोलता बोलता शंत्यान विषय काढला, 
           "अबे काल अंकिताचा फोन आला होता. ती, अदिती, ऋतुजा इथेच आल्या आहेत. भेटूयात काय म्हणत होत्या… "
          "बरं मग?" अभ्याचा साळसूदपणाचा आव. 
          "अं… " शंत्याला  कसं बोलावं कळत नव्हतं. " मी…"
          "काय बे?" 
         "त्यांना इथेच बोलावलं आहे… " असं शंत्याने नुसतं बोलण्याचा अवकाश कि लगेच, 
         "अबे चुत्या… !" हि आमची सामुहिक प्रतिक्रिया आली. 
        "इथे कशाला बोलावलं बे?"
        " चांगले सुखात आहोत, बघवत नाहीये का?"
         "म काय आता?फोन लावून सांगू का? येऊ नका म्हणून.. "शंत्या 
       " राहू दे आता… "
           "किती वाजता बोलावलं आहेस?" मी 
           "साडे-सहाला"
           "म्हणजे येतीलच आता… " पुष्कर 
  वास्तविक सात वाजत आले होते. पण स्त्रीधर्माला अनुसरूनच होतं. आम्ही आपले रस्त्याकडे डोळे लावून बसलो होतो. गाड्यांचे लाईट दिसले, पाठोपाठ गाड्या आल्या. मग गाड्या लाऊन त्या तिघी आल्या. 
           "Hi " तिघींचं सामुहिक शंत्याला. जणू आम्ही कोणी नव्हतोच तिथे. या मुलींचं मला काही कळतच नाही. ज्यांच्याशी ओळख नाही किंवा ओळख करून घ्यायची इच्छा नाही अशा व्यक्तींकडे ते जणू तिथे नाहीतच अशा प्रकारे वागण्याची एकजात सगळ्या मुलीनी साधना केलेली असते . इथे मी एकटा सोडलो तर बाकी सगळे त्यांच्या ओळखीचे होते. काही वेळानंतर ही साधना भंग पावली.पुश्कर, मिहिर, शंत्या अस्तित्वात आले. सगळ्यांचा कलकलाट सुरु होता. मी आपला 'कुत्ता जाने अन चमडा जाने' अशा थाटात पाहत बसलो होतो. म्हटलं चालू द्यात. 'मेले मे बिछडे है, काफी समय के बाद मिले है. ' इतक्यात पुष्करला आठवण झाली. 
            "अरे हां.. ए हा गंधार. CA चा student आहे."
            "hello " मी विष केलं तिघींना. आता त्यांच्याकडे मी पाहिलं. (म्हणजे त्या मला दिसल्या) तिघीही साक्षात engineering कॉलेजच्या च्या मुली दिसत होत्या. त्यातल्या दोघी ढापण्या. एक त्या बाबतीत सुस्थितीत आढळली. 
            "ही अंकिता… " पुष्करने एकीकडे निर्देश करत दाखवलं. हि थोडीफार पुष्करच्याच type ची वाटत होती. अभ्यासू, पुस्तकी किडा वगैरे. 
           "ही ऋतुजा. " ढापणी नसलेली हीच ती. लागलीच कशी काय त्या कोलेजला कोण जाणे. कारण चार डोळे असणं हा त्या कॉलेजचा जणू अलिखित नियमच होता. पण असो. काही का असेना. 
          "आणि ही, अदिती… " ढापणी असली तरी, त्या कोलेजच्या नियमाला अपवाद म्हणायला हरकत नाही अशी ती होती. 
         "तू पुण्याचाच आहेस?" अदिती.       
         "हो" मी. 
         "मग तुझी आणि यांची ओळख कशी काय?" अंकिता. 
         "अभ्यामुळे. अभ्या आणि तो एकाच क्लास मध्ये आहेत." शंत्या. 
         "okay" 
         "nice place… तुमचा अड्डा आहे वाटतं हा?" अदिती. 
         "खरच मस्त" ऋतुजा. 
         "गंधार आणि अभ्याकी खोज का नतीजा"मिहिरला हिंदीची उचकी का लागली देव जाणे. 
    मग त्या दिवशीची संध्याकाळ जवळच्याच 'कॉफी हाउस' मध्ये कारणी लागली.  
          कॉफी रिचवून कट्ट्यावर वापस आलो. साडे-आठ वाजले होते. 
         "ए आम्ही निघतो. "ऋतुजा 
         "हो! होस्टेल चा इन टाईम  ९ चा आहे. "अंकिता. 
         पण यार! मला हा कट्टा खूप आवडला. आम्ही पण आता रोज येणार इथे.!" अदितीच्या या वाक्यावर आमचे चेहरे कसनुसे झाले होते. पण पुष्कर,
         "No Problem!!!! आपलाच कट्टा आहे." वास्तविक शंत्याने जेव्हा सांगितलं, त्या कट्ट्यावर येणार आहेत, तेव्हा सगळ्यात पहिला निषेध पुष्करनेच नोंदवला होता. आणि आता हे पुष्करचं ऐकल्यानंतर शंत्याचा रागाने फुललेला चेहरा पाहून आम्हा सगळ्यांना मात्र हसूच आवरत नव्हतं.
                       
                                                                                                                                           (क्रमशः)

Comments

  1. Well done. Pay attention to 'MArathi spellings'. Consider a book seriously. Give details of characters. Keep writing.

    ReplyDelete
  2. waiting for the next parts.......

    ReplyDelete

Post a Comment