अफगाणिस्तानचा सांगीतिक तारा



संगीत.. व्यक्ती, समाज, देश आणि संस्कृतीच्या विकासातला महत्वपूर्ण घटक आहे. जगात वेगवेगळ्या भागात प्राचीन ते अर्वाचीन काळात अनेक संस्कृती उदयाला आल्या आहेत. प्रक्रिया अजूनही सुरु आहे. जुन्यात अधिक भर पडत असते. दोन भिन्न संस्कृतींचा कळत अथवा नकळत संगम होऊन नवीनच काहीतरी सुरुवात होते. 

भारतीय संगीतात थेट सामवेदात उगम शोधणारे शास्त्रीय संगीत आहे. दर बारा कोसावर भाषा बदलते, त्याच न्यायाने बदलणारे स्थानिक लोकसंगीत आढळते. लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत यात वाद असण्याचे काही कारण नाही. असता कामा नये. कारण दोन्ही एकमेकांना पूरक आहे. म्हणूनच भारतीय शास्त्रीय संगीतात परंपरेविषयी कर्मठ असणारी 'घराणी' निर्माण होतात आणि लोकसंगीतातील धून शास्त्रीय कोष्टकात बांधू शकणारे कुमार गंधर्वही निर्माण होतात. 

एकाच वेळी शास्त्रकाट्याच्या चौकटीत असणारे भारतीय संगीत त्याचवेळी विलक्षण व्यापक आहे. समावेशक आहे. म्हणूनच पंडित रविशंकर जगभर हे संगीत पोचवू शकतात आणि अफगाणिस्तानचा सांगीतिक तारा उस्ताद हुमायून साखी ते संगीत पचवू शकतात. रबाब या सरोदच्या जवळ जाणाऱ्या मध्य आशियातील वाद्यातून भारतीय शास्त्रीय संगीत तसेच स्थानिक लोकसंगीताच्या धून ते जगभर पोचवत आहेत. पण माझी दृष्टी या वाद्यावर आणि या कलाकारावर कशी पडली? 

उत्तर आहे युट्युब या जादूच्या पेटाऱ्यामुळे! वाचन वगैरे करताना पार्शवभूमीवर संतूर, बासरी, पंडित जसराज, संजीव अभ्यंकर वगैरे असले की वेळ कसा जातो कळत नाही. राहुल शर्मा, उस्ताद झाकीर झाकीर हुसेन यांच्या साथीने संतूरवर अचाट करामत करत होते. ही करामत एका टिपेला जाऊन संपली आणि पुढे एक वेगळंच वाद्य ऐकू यायला लागलं. काही क्षण खटकलं पण लगेच संतूरही ऐकायला आली. काय झालं म्हणून वाचनातून लक्ष हटवून पाहिलं तर 'ऑटोप्ले' मधून 'रबाब मिट्स संतूर' असा व्हिडीओ सुरु झाला होता. 

पुस्तक बाजूला ठेवून लक्षपूर्वक हुमायून साखी आणि राहुल शर्मांची ही जुगलबंदी ऐकली. ऐकताना सारखं वाटत होतं, हे कुठेतरी ऐकलं आहे. आपल्या कानावरून गेलं आहे. आता उत्सुकता चाळवली गेली होती. म्हणून या हुमायून साखी यांचं आणखी काही मिळतं का ते पाहिलं. यादीत भारतीय रागांची नावं दिसली. बहुतेक ठिकाणी साथ तबल्याची. आणि तबला साथीदार सालार नादर. हे सालार नादर साक्षात उस्ताद झाकीर हुसेन यांचे शिष्य आहेत. यादीत अनेकांपैकी एक आवडता असलेला राग यमन दिसला. सुरु केला आणि पुन्हा पुस्तकात डोकं घातलं. 

 
(राग यमन) 

पुस्तकात डोकं घातलं खरं पण मग एका विलक्षण योगायोगाने थरारून गेलो. एका बाजूला हुमायून साखी यांचा यमन रबाब या अफगाणी वाद्यावर ऐकत होतो. दुसऱ्या बाजूला माझ्या हातात साक्षेपी संपादक गोविंद तळवलकर यांचं 'अग्निकांड' हे पुस्तक होतं. 

पुस्तकाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकरणात अफगाणिस्तानच्या गेल्या २०० वर्षातल्या आणि त्यातही प्रामुख्याने गेल्या ५० वर्षातल्या युद्धजन्य परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. कानात यमनचे सूर रुंजी घालत होते आणि पुस्तकात वाचत होतो ते, कशी मुल्ला ओमारच्या 'तालिबान'ने संगीत हराम ठरवून, घरात देखील ऐकण्यास-गाण्यास-वाजवण्यास बंदी घातली. डोक्यात वेगाने विचार येऊ लागले, या अशा परिस्थितीत हुमायून साखी सारखा संगीतकार निर्माण कसा झाला? 

त्याचं उत्तर गोविंद तळवलकरांनी पुस्तकात आकडेवारी मांडून दिलं होतं. तालिबान आणि इतर टोळ्या या संघर्षात ६० लाख अफगाण पाकिस्तानात निर्वासित म्हणून आले. त्यातच हुमायून आणि त्यांचे वडील उस्ताद गुलाम साखी हे देखील आले. फाळणीमुळे वेगळा देश झाला असला, ती फाळणी धर्माच्या आधारावर झालेली असली तरी पाकिस्तानात आणि एकंदरच भारतीय उपखंडात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची परंपरा कायम आहे. हुमायून यांनी पेशावर मध्ये संगीताचं पुढील शिक्षण घेतलं. २००१ मध्ये तालिबानचा अखेर पाडाव झाला असला तरी अफगाणिस्तानातली यादवी काही संपली नव्हती. ती आजही संपलेली नाही. २००२ हुमायून साखी यांनी निर्णय घेतला तो अमेरिकेत कॅलिफोर्नियात फ्रीमॉण्ट येथे जाण्याचा. तिथून आज अफगाण वाद्य रुबाब तबल्याच्या साथीने साखी यांच्या रूपाने अफगाणी संगीताची पताका जगभर मिरवत आहे. 


(जोश- रबाब, गिटार, तबला आणि डोयरा.. खरोखर जोश आणतात.)



सध्या वाचनासोबत रबाबाच्या सुरांची साथ आहे. विविध राग ऐकतो आहे. ऐकताना एक गोष्ट जाणवत राहते. रागाची साधारण चौकट हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची आहे पण मधूनच काहीतरी वेगळी सुरावट ऐकायला मिळते. त्यात विलक्षण कंप असतो. मग डोक्यात विचार खेळायला लागतो. असा कंप आणि अशी सुरावट एका भारतीय चित्रपट गीतात ऐकली आहे. ते गाणं काबुलीवाला चित्रपटातलं "ऐ मेरे प्यारे वतन.. " हे आहे हे लक्षात येण्यासाठी वेळ लागला नाही. 

संस्कृती वगैरे म्हणतात ती यापेक्षा काय वेगळी असते? सलील चौधरी यांच्या सारखा बंगाल मध्ये जन्मलेला संगीतकार, काबुलीवाला या चित्रपटात, जी रबिन्द्रनाथ टागोर या बंगालच्याच सुपुत्राची कथा आहे, त्यात अफगाणी वाद्य, सुरावटी यांचा अभ्यास करून "ऐ मेरे प्यारे वतन, तुझपे दिल कुर्बान" सारखं गाणं देतो. 

अफगाणिस्तानात जन्मलेला, निर्वासितांचे भोग भोगलेला संगीतकार अफगाणी वाद्यावर, तबल्याच्या साथीने, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत जगभर सादर करतो. धर्म आणि सीमारेषांमुळे वेगळे झालेल्या माणसांना एकत्र आणण्यासाठी इतर कशाही पेक्षा संगीतात वास करणारी ही संस्कृती हा प्रमुख घटक आहे. यादवी युद्धात होरपळणाऱ्या देशात साखी सारख्या कलाकाराला आणि त्याच्या कलेला फारसे पोषक वातावरण नसेल पण त्यांच्या कलेचे जगभर स्वागत होत आहे. हे स्वागतच त्यांच्या कलेला, त्यांच्या देशात पुन्हा उर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रेरणादायक ठरत असणार. अफगाणिस्तानात शांतता, स्थिरता नांदावी. सांस्कृतिक उर्जितावस्था प्राप्त व्हावी हीच प्रार्थना... 


Comments

  1. शौनक, तुझ्या व्यासंगाची व्याप्ति अचंभित करत आहे. प्रचंड वाचन, मनन, चिंतन यामुळे तुझ्या लिखानाची लांबी, रुंदी आणि विशेषत:खोली वरचे वर खोल जात आहे हे विशेष हा ब्लॉग वाचतांना वाटत आहे. छान Keep it up...

    ReplyDelete

Post a Comment